एक्स्प्लोर
Advertisement
लॉकडाऊनबाबत कठोर भूमिका घेतली नसती तर न्यूयॉर्कसारखी अवस्था झाली असती : शरद पवार
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीत शरद पवार यांनी लॉकडाऊनबाबत राष्ट्रवादीची भूमिका तसंच या काळातले स्वत:चे अनुभव सांगितले.
मुंबई : सुरुवातीच्या काळात कठोरपणानं लॉकडाऊन करण्याची आवश्यकता होती. त्याची अंमलबजावणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात झाली. इथे तशी आवश्यकताच होती. एवढी कठोर भूमिका घेतली नसती तर कदाचित न्यूयॉर्कसारखी अवस्था इथे झाली असती. आपण न्यूयॉर्कसंबंधीची वृत्ते वाचतो की, हजारो लोकांना या संकटामुळे मृत्यूला सामोरे जाण्याची वेळ आली. तीच स्थिती इथे आली असती, असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे.
शिवसेना नेते तथा खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत शरद पवार यांनी महाराष्ट्रातील ‘ठाकरे सरकार’ला अजिबात धोका नाही, असंही सांगितलं. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सर्व आरोपांना पवारांनी उत्तरं दिली. ही मुलाखत 11, 12 आणि 13 जुलैला प्रसारित होत आहे. या मुलाखतीत लॉकडाऊन, कोरोना, चीनचे संकट, ढासळलेली अर्थव्यवस्था अशा सर्वच प्रश्नांवर शरद पवार यांनी संवाद साधला.
शरद पवार म्हणाले की, इथे कठोरपणे लॉकडाऊन राबवला आणि विशेष म्हणजे लोकांनी त्यांना सहकार्य केलं. त्यामुळे इथली परिस्थिती सुधारायला मदत झाली. नाहीतर अनर्थ झाला असता. पहिले दोन महिने-अडीच महिने याची आवश्यकता होती. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे आणि राज्य सरकारचा दृष्टिकोन शंभर टक्के बरोबर होता. आमचा सगळ्यांचा याला मनापासूनचा पाठिंबा होता, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा थोडा उशिरा घेतला असं काहींना वाटलं असेल, पण त्यांनी तो निर्णय योग्य वेळी घेतला. मुख्यमंत्र्यांचा जो स्वभाव आहे त्याच स्वभावाला साजेसाच हा निर्णय आहे. म्हणजे निर्णय घ्यायचाच, पण अत्यंत सावधगिरीने. निर्णय घेतल्यावर दुष्परिणाम होणार नाहीत याची खातरजमा जेवढी करून घेता येईल तेवढी करून घ्यायची आणि मग पाऊल टाकायचं. एकदा पाऊल टाकल्यावर मागे घ्यायचं नाही ही त्यांची कार्यपद्धती आहे, असं ते म्हणाले.
लॉकडाऊनसह कायम जगावं लागेल असं वाटत नाही
लॉकडाऊनसह कायम जगावं लागेल असं मला वाटत नाही. अलीकडेच मी काही तज्ञांशी बोलत होतो. त्यांनी सांगितलं की, साधारणतः जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून तो ट्रेंड खाली जाईल. ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पूर्ण खाली जाईल आणि पुन्हा नॉर्मलसी येईल, पण याचा अर्थ कोरोना कायमचाच संपला असं काही गृहीत धरण्याचं कारण नाही. कधी रिव्हर्सही होऊ शकतो. त्यामुळे यापुढे आपल्याला कोरोनाची काळजी घ्यावी लागेल आणि आपल्या सगळय़ा व्यवहारात काळजी घेण्याची गरज आहे, पण कोरोनासारखी अशी परिस्थिती पुन्हा उफाळून आली तर लॉकडाऊन करण्याची वेळ येते आणि लॉकडाऊन केल्यामुळे जे परिणाम झालेत, उदाहरणार्थ अर्थव्यवस्थेवर झालेत, कुटुंबात झालेत, व्यापारावर झालेत, प्रवासावर झालेत. हे सगळं आपण आता पाहिलंय. यापुढे अशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये अशी आपली प्रार्थना आहे, पण अर्थसंकट आलंच तरी आपली सर्वांची त्यासाठी तयारी असली पाहिजे.
ते म्हणाले की, लॉकडाऊनचे हे फायदेसुद्धा आहेत. संकट तर आहेच. पण त्यातून जे चांगलं करता येईल, सकारात्मक दृष्टिकोन ठेवता येईल ते करणं गरजेचं आहे. याचं महत्त्वाचं कारण की आता कोरोनाचं जे संकट जगावर आलंय त्यामुळे लॉकडाऊन आहे. सगळ्या गोष्टी बंद आहेत. दुर्दैवाने लॉकडाऊनसारखे जे काही निर्णय सगळ्यांना घ्यावे लागले त्याचा हा परिणाम आहे. समजा हा लॉकडाऊनचा काळ नसता, हे संकट नसतं तर कदाचित माझ्याबद्दल काही वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं हे नक्की, असं त्यांनी म्हटलं.
हेही वाचा- 'सरकारचे हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?', संजय राऊतांच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले...
मुख्यमंत्र्यांशी माझा उत्तम संवाद!
ते म्हणाले की, सुरुवातीच्या काळात कठोरपणानं लॉकडाऊन करण्याची आवश्यकता होती. त्याची अंमलबजावणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात झाली. इथे तशी आवश्यकताच होती. एवढी कठोर भूमिका घेतली नसती तर कदाचित न्यूयॉर्कसारखी अवस्था इथे झाली असती. मुख्यमंत्री ठाकरे यांनी घेतलेला निर्णय हा थोडा उशिरा घेतला असं काहींना वाटलं असेल, पण त्यांनी तो निर्णय योग्य वेळी घेतला. मुख्यमंत्र्यांचा जो स्वभाव आहे त्याच स्वभावाला साजेसाच हा निर्णय आहे. म्हणजे निर्णय घ्यायचाच, पण अत्यंत सावधगिरीने. निर्णय घेतल्यावर दुष्परिणाम होणार नाहीत याची खातरजमा जेवढी करून घेता येईल तेवढी करून घ्यायची आणि मग पाऊल टाकायचं. एकदा पाऊल टाकल्यावर मागे घ्यायचं नाही ही त्यांची कार्यपद्धती आहे, असं पवार म्हणाले.
हे ही वाचा- शिवसेना नसती तर भाजपचा आकडा 105 नाही 40-50 असता : शरद पवार
जुने संदर्भ आहेत. खासकरून काँगेस पक्षाचा इतिहास वाचताना. काँग्रेस पक्षाची स्थापना जी झाली त्याला एक इतिहास आहे. खरं तर काँग्रेसची स्थापना पुण्यात व्हायची होती 1885 साली आणि तिथं अधिवेशनही ठरलं होतं, पण प्लेगची साथ त्याच काळात मोठ्या प्रमाणावर आली. माणसं मृत्युमुखी पडायला लागली म्हणून पुण्याची जागा शिफ्ट झाली मुंबईमध्ये आणि आता ज्याला ऑगस्ट क्रांती मैदान म्हणतात किंवा गवालिया टँक, तिथे ते अधिवेशन झालं. त्या वेळचा प्लेगच्या साथीचा संपूर्ण इतिहास लिहिला गेलाय. त्यात असं चित्र होतं की राज्याच्या अनेक भागांत प्लेगमुळे माणसं मृत्युमुखी पडत होती. सगळे व्यवहार थांबलेले होते, पण ती वाचनात आलेली गोष्ट आहे. कारण त्या वेळी माझा जन्म झालेला नव्हता आणि आज कधी अपेक्षा केली नाही, कधी विचार केला नाही अशाप्रकारचं चित्र ते महाराष्ट्रपुरतं सीमित नाही. अवघ्या विश्वात आहे. हे कधी अनुभवास येईल असे वाटले नव्हते. पण परिस्थितीला सामोरे जावेच लागेल.
आज माणूस माणसाला घाबरतोय
पवार म्हणाले की, आज माणूस माणसाला घाबरतोय असं चित्र अगदी घराघरांत आहे. डॉक्टरांच्याही सूचना आहेत की एकमेकांपासून जेवढं दूर राहता येईल तेवढं दूर राहायला हवं. तुम्ही काळजी घ्या. नाही तर त्याचे दुष्परिणाम सहन करावे लागतील. त्यामुळे अवघे विश्व चिंतेत आहे. या सगळ्या कालखंडात एकच गोष्ट मोठ्या प्रमाणावर बघायला मिळतेय की समाजातल्या सगळ्या घटकांमध्ये एकप्रकारची घबराट आहे. आता हळूहळू ती कमी व्हायला लागलीय, हे खरं; पण या घबराटीमुळे घरातून माणूस घराबाहेर पडणार नाही असं कधी वाटलंही नव्हतं ते आपल्याला पाहायला मिळालं, असं ते म्हणाले.
पवारांनी सुरुवातीच्या लॉकडाऊन काळात काय केलं?
शरद पवारांनी सांगितलं की, सुरुवातीचा महिना दीड महिना मी अक्षरशः माझ्या घराच्या चौकटीच्या बाहेरसुद्धा गेलो नाही. अगदी प्रांगणातसुद्धा गेलो नाही. चौकटीच्या आतच होतो. त्याची काही कारणं होती. एक तर घरातून प्रेशर होतं. त्यानंतर सगळय़ा तज्ञांनी सांगितलं होतं की, 70 ते 80 या वयोगटातील सगळ्यांनी अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे किंवा हा वयोगट अतिशय व्हलनरेबल आहे. मी नेमका त्या वयोगटात येतो. त्यामुळे अधिक काळजी घेतली पाहिजे हा घरच्यांचा आग्रह होता आणि नाही म्हटलं तरी मनावर दडपण. त्यामुळे मी त्या चौकटीच्या बाहेर फारसा कुठे गेलो नाही. बराचसा वेळ टेलिव्हिजन, वाचन याच्याबाहेर काही दुसरं केलं नाही. या काळात खूप गाणी ऐकली. भीमसेन जोशींचे सगळे अभंग ऐकले. हे सगळे अभंग दोन-तीन-चार वेळा नव्हे, अनेकदा ऐकले. जुन्या काळात हिंदीमध्ये ‘बिनाका गीतमाला’ असायची. आता ती नव्याने उपलब्ध आहे. त्याही पुनः पुन्हा ऐकण्याची संधी यानिमित्ताने मिळाली. संपूर्ण गीत-रामायण पुन्हा ऐकलं. ग. दि. माडगुळकरांनी काय जबरदस्त कलाकृती या देशाच्या विशेषतः महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या सांस्कृतिक विश्वात निर्माण करून ठेवलीय याचा पुन्हा प्रत्यय आला, असं ते म्हणाले.
कोरोनासोबत जगायची तयारी ठेवली पाहिजे
पवार म्हणाले की, एक गोष्ट तर या काळात स्पष्ट झालेली आहे की, इथून पुढे तुम्हाला, मला, आपणा सर्वांना कोरोनासोबत जगायची तयारी ठेवली पाहिजे. कोरोना आपल्या दैनंदिन जीवनाचा एक भाग होतोय अशा प्रकारची भूमिका तज्ञांकडून मांडली गेली आहे. त्यामुळे आता आपणही हे स्वीकारायलाच हवं. ही परिस्थिती गृहीत धरूनच पुढे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. प्रश्न आहे तो लॉकडाऊनचा. चिंताजनक परिस्थिती निर्माण करतो तो लॉकडाऊन.
मुख्यमंत्र्यांच्या कानावर काही गोष्टी घालणं मतभेद नव्हे
ते म्हणाले की, लॉकडाऊन काळात मी अनेकांशी चर्चा केली. त्यात उद्योजकही होते, कामगार संघटनांचे लोक होते, त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर माझं एक मत बनलं ते मी मुख्यमंत्र्यांच्या नक्कीच कानावर घातलं. याला मतभेद म्हणत नाहीत. स्पष्ट सांगायचं म्हणजे काही ठिकाणी, उदाहरणार्थ दिल्ली. दिल्लीत रिलॅक्सेशन केलं. काय झालं तिथे? त्याची झळ बसली, पण व्यवहार हळूहळू सुरू झाले. कर्नाटकच्या सरकारने रिलॅक्सेशन केलं. त्याच्यातही काही परिणाम झाले, नाही असं नाही. पण कर्नाटकातील व्यवहार सुरू झाले. हे महत्त्वाचे. या पद्धतीने पावले टाकावी लागतील. कारण सबंध समाजाची, राज्याची, देशाची अर्थव्यवस्था कम्प्लिट उद्ध्वस्त झाली तर कोरोनापेक्षा त्याचे दुष्परिणाम पुढे काही पिढ्यांना सहन करावे लागतील. त्यामुळे ही अर्थव्यवस्था पुन्हा कशी सावरता येईल त्यादृष्टीने काळजी घेऊन आपण पुढे कसं जायचं याचा विचार करावा लागेल. तेवढ्यापुरता निर्णय घ्यावा लागेल. याचा अर्थ सगळं खुलं करा असा नव्हे, पण थोडीबहुत तरी आता हळूहळू मोकळीक द्यायला हवी. तशी ती दिली आहे. उदाहरणार्थ परवा मुख्यमंत्री ठाकरे यांनी सलून सुरू करण्याबाबत निर्णय घेतला, त्याची आवश्यकता होती. कारण अनेक आमचे मित्र भेटायचे. त्यांना पाहून त्यांच्या डोक्यावर एवढे केस आहेत हे पहिल्यांदाच कळलं. कोरोनाचा परिणाम! दुसरी गोष्ट अशी की या व्यवसायात असलेल्या लोकांच्या कौटुंबिक समस्या फार वाढायला लागलेल्या होत्या. त्यादृष्टीने सलून सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला तो माझ्या मते योग्य निर्णय होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement