रोहित पवारांची भगव्याशी अशीही जवळीक, ज्युनिअर पवार उभारतायत देशातला सर्वात उंच भगवा
यंदा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 15 ऑक्टोबरला कर्जतमधल्या खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यात हा ध्वज उभारण्यात येणार आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार त्यांच्या मतदारसंघांमध्ये देशातला सर्वात उंच भगवा ध्वज उभारणार आहेत. खरंतर भगव्या रंगापाठीमागे त्यागाची आणि शौर्याची एक वेगळी परंपरा आहे पण राजकारणामध्ये हा भगवा अनेकदा शिवसेना भाजप यांच्या हिंदुत्वाचं प्रतीक म्हणून वापरला जातो. राज्याच्या राजकारणात त्या अर्थाने राष्ट्रवादीची भगव्याशी जवळीक वाढलेली असताना आता ज्युनियर पवार हे देखील भगव्यासाठी एक अनोखा उपक्रम राबवताना दिसत आहेत.
या ध्वजाला स्वराज्य-ध्वज असे नाव देण्यात आले असून यंदा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर 15 ऑक्टोबरला कर्जतमधल्या खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यात हा ध्वज उभारण्यात येणार आहे. प्रतिष्ठापनेआधी या ध्वजाची देशातल्या 6 राज्यांमधून जवळपास 12 हजार किलोमीटर प्रवास करत वेगवेगळ्या ठिकाणांहून पूजन यात्रा होणार आहे. अयोध्या, मथुरा, बोधगया केदारनाथ, आग्रा किल्ला, अजमेर शरीफ अशा वेगवेगळ्या 74 ऊर्जा स्थानांवर नेऊन या ध्वजाचे पूजन होणार आहे. सलग 37 दिवस या ध्वजाचा प्रवास होणार आहे.
आज 14 सप्टेंबर रोजी ही पूजन यात्रा पवनार मधल्या विनोबा भावे यांच्या आश्रमात आहे तिथून ती नंतर नागपूर, दीक्षाभूमी ,रामटेक मंदिर येथेही जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या खर्ड्याच्या भुईकोट किल्ल्यांमध्ये निजामाविरोधात मराठी फौजांनी विजय मिळवला होता. या इतिहासाला नव्याने ओळख देण्यासाठी स्वराज्य ध्वज उभारण्याची संकल्पना रोहित पवार यांनी मांडली आहे.
"भगवा ध्वज हा सगळ्यांसाठी स्फूर्तिस्थान आहे.. त्यावर कुणा एकाची मालकी नाही.. उलट भगवा समानतेचा संदेश देतो.. सहिष्णुतेची शिकवण देणाऱ्या आपल्या वारकरी संप्रदायाने सुद्धा खांद्यावर जी पताका घेतली ती भगव्याचीच छटा असलेल्या काव रंगातली.. शीख धर्मामध्ये सुद्धा त्याला त्यागाचं चैतन्याचे प्रतीक मानलं जातं... त्यामुळे ही सर्वसमावेशकताच या ध्वजामधून प्रतीत होते" असं रोहित पवार यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक 1674 मध्ये झाला या गोष्टीचं स्मरण म्हणून या ध्वजाची उंची 74 मीटर ठेवण्यात आली आहे या ध्वजाचा आकार 96 बाय 64 फुट असून वजन 90 किलो आहे हा राज्यातच नव्हे तर देशातला सर्वात उंच भगवा ध्वज असणार आहे..15 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर हा ध्वज उभारण्यात येणार आहे.