Hasan Mushrif : हसन मुश्रीफ चौकशीसाठी ईडीपुढे हजर राहणार, कारवाईची टांगती तलवार
Hasan Mushrif ED Raid : ईडीकडून मुश्रीफांच्या निवासस्थानी शनिवारी दिवसभरात कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना समन्स बजावण्यात आले आहे.

Hasan Mushrif ED Raid : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif ) यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) समन्स बजावण्यात आलं आहे. आज त्यांना मुंबईमधील ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे.
हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील निवासस्थानी शनिवारी ईडीकडून तब्बल साडे नऊ तास छापेमारी करत कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीनंतर अवघ्या काही तासांमध्येच ईडीकडून समन्स बजावण्याची कारवाई करण्यात आली. मुश्रीफ यांना आज ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना समन्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यात हसन मुश्रीफ यांच्यावर तिसऱ्यांदा ईडीची कारवाई झाली आहे. यामुळे हसन मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ होणार याची शक्यता निर्माण झाली आहे.
दीड महिन्यांत तिसऱ्यांदा मुश्रीफ यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तर शनिवारी तब्बल साडेनऊ तास ईडीचं पथक मुश्रीफांच्या घराची झाडाझडती घेत होतं. हे पथक दुपारी चार वाजेच्या सुमारास मुश्रीफांच्या घराबाहेर पडलं. त्याच दिवशी ईडीने हसन मुश्रीफ यांना चौकशीसाठी समन्स बजावले असून आज ईडी कार्यालयात त्यांना उपस्थित राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत.
पाच जणांचे जबाब
ईडीकडून मुश्रीफांच्या निवासस्थानी शनिवारी दिवसभरात कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यांनी कोणतीही कागदपत्रे यावेळी सोबत नेलेली नाहीत. मुश्रीफ यांच्या पत्नी सायरा तसेच मुलगा आबिद मुश्रीफ यांच्यासह पाज जणांचा जबाब घेतल्याची माहिती आहे. कोल्हापूर जिल्हा बँकेचे संचालक भय्या माने यांनाही बोलावून मुश्रीफ यांच्यासंदर्भात माहिती घेतली असल्याची माहिती मिळत आहेत.
‘सरसेनापती संताजी घोरपडे’ कारखान्याशी निगडीत कर्ज प्रकरण ईडीकडून हसन मुश्रीफ यांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. आतापर्यंत ईडीकडून हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान, पुण्यातील ब्रिक्स कंपनीशी निगडीत तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, मुलीचे घर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्यालय तसेच कागल तालुक्यातील सेनापती कापशी आणि गडहिंग्लज तालुक्यातील हरळी येथील जिल्हा बँकेच्या शाखेवर छापेमारी करण्यात आली आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल
दरम्यान, आतापर्यंत केलेल्या छापेमारीचा कोणताही तपशील समोर आलेला नाही. हसन मुश्रीफ यांच्याविरोधात आतापर्यंत ईडीकडून 35 कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच मुरगूड पोलिस ठाण्यातही त्यांच्यावर 40 कोटींचा फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
Hasan Mushrif ED Raid : साडे नऊ तास चौकशी, मुश्रीफांच्या पत्नीचा आक्रोश ते कार्यकर्त्यानं डोकं फोडून घेतलं
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
