Ajit Pawar on Raj Thackrey: काकांवर लक्ष ठेवा! राज ठाकरेंच्या सल्ल्याला अजित पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले...
Ajit Pawar on Raj Thackrey: मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिलेल्या सल्ल्यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले.
Ajit Pawar on Raj Thackrey: विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी जसं त्यांच्या काकांवर लक्ष ठेवलं, तसं मी माझ्या काकांवर लक्ष ठेवेन, असं अजित पवार म्हणाले आहेत. राज ठाकरे यांनी बुधवारी एका जाहीर मुलाखतीत अजित पवारांना सल्ला दिला होता. त्यावर, पत्रकारांनी आज अजित पवारांना प्रश्न विचारला. त्यावर बोलताना अजित पवारांनी अतिशय सूचक वक्तव्य केलं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काकांकडे लक्ष देण्याच्या दिलेल्या सल्ल्यावर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी राज ठाकरेंना त्याच भाषेत प्रत्युत्तर दिलं आहे. 'लोकमत'च्या महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात अमोल कोल्हे आणि अमृता फडणवीसांनी राज ठाकरेंची मुलाखत घेतली. त्यावेळी अमृता फडणवीसांच्या रॅपिड फायर प्रश्नावर राज ठाकरेंनी अजितदादांना सल्ला दिला होता.
राज ठाकरे आणि अजित पवार यांच्यामधलं शाब्दिक द्वंद्व महाराष्ट्राला चांगलंच परिचित आहे. याआधी राज ठाकरे यांनी राज्यात आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर अजित पवार यांनीदेखील आपल्या खास शैलीत राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले होते. पण, आता राज ठाकरेंच्या मुलाखतीच्या निमित्तानं त्या दोघांमधल्या वाग्युद्धाची नवी ठिणगी पडली आहे.
राज ठाकरे हे कायम त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. त्यांची भाषणं व मुलाखती कायम चर्चेचा विषय असतात. राज ठाकरेंनी कालच्या मुलाखतीत नेत्यांना दिलेले सल्ले हे सध्या चांगलेच चर्चेत आहे. अमृता फडणवीसांनी घेतलेल्या रॅपिड फायरमध्ये उत्तर देताना राज ठाकरेंनी शिंदे, फडणवीस, अजित पवारांना सल्ले दिले आहेत. अजित पवार यांना काय सल्ला द्याल, असा प्रश्न केल्यानंतर राज ठाकरे यांनी काकांवर (शरद पवार) लक्ष ठेवा असे म्हटले होते.
मागील काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. याआधी अजित पवार हे राष्ट्रवादीच्या आमदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात होते. मात्र, शरद पवार यांनी अजित पवार यांना नकार दिल्याने हे नवं राजकीय समीकरण मागे पडले असल्याची चर्चा सुरू झाली. तर, दुसरीकडे अजित पवार यांनी या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. मरेपर्यंत आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता, राज ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याच्या टायमिंगमुळे पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: