Ajit Pawar: आता स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का...नाराजीच्या प्रश्नावर अजित पवारांचा उलट प्रश्न
Ajit Pawar: सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड झाल्याने आपण नाराज नसल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचे (NCP Foundation Day) औचित्य साधत आज पक्षाने कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांची नियुक्ती केल्यानंतर विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली. मात्र, पुण्यात दाखल झाल्यानंतर अजित पवार यांनी आपण नाराज नसल्याचे म्हटले. आपल्याला राज्याच्या राजकारणात रस असून आता तुम्हाला स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असा प्रश्न पवार यांनी केला.
दिल्लीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर पुण्यात (Pune) पत्रकारांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. अजित पवार यांना नाराजी बद्दल विचारले असता त्यांनी म्हटले की, नाराजीच्या असल्या बातम्या देणं बंद करा. सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला. मला वाईट वाटलं. माझी फ्लाईट होती, बोलता आलं नाही. मी समाधानी आहे, असं त्यांनी म्हटले.
त्यांनी पुढे म्हटले की, आमची एक समिती होती. त्यावेळी मी सांगितले की, दोन निर्णय घेतले एक तर राजीनामा मागे घ्या आणि कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळेंना घ्या. तेव्हा सगळ्यांनी आता फक्त राजीनाम्याच्या मुद्यावर इतकचं मुद्दा मांडा सूचना करण्यात आली. त्यावेळी लोकशाही म्हणून त्यावेळी भाष्य करणं टाळलं, असे अजित पवार यांनी म्हटले.
अजित पवार यांनी म्हटले की, प्रफुल पटेल आणि मी एकाच वर्षी खासदार झालो. सुप्रिया सुळे या अनेक वर्ष दिल्लीत आहेत. माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्षाची जबाबदारी आहे. ती मी पार पाडत असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले. आपल्याला महाराष्ट्रातल्या राजकारणात रस आहे. आता, स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? असंही त्यांनी म्हटले.
राष्ट्रवादी काँग्रेसला आज 24 वर्ष पूर्ण झाली. या 24 वर्षात पहिल्यांदा मी दिल्लीला गेलो. कोणी कोणाला शह देत नाही. आमच्या पक्षातंर्गत प्रश्न आहे, इतर कोणी नाक खुपसण्याचे कारण नाही असेही अजित पवार यांनी म्हटले. पवार एका पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेतं ते त्यांचं आणि फडणवीस त्यांचं मत व्यक्त करतात. प्रत्येकाला आपापल्या प्रश्न मांडायचा अधिकार आहे. कोणी काय म्हणाल म्हणून नाराज व्हायचं कारण नाही, असेही पवार यांनी म्हटले.