Amol Mitkari : अजित पवार आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्यांना मुळातच लाज नाही त्यांच्याबद्दल काय बोलणार, अमोल मिटकरींचा हल्लाबोल
Amol Mitkari : निवडणूक आयोगाच्या निकालानंतर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. यावेळी बोलताना त्यांनी जितेंद्र आव्हाडांवर हल्लाबोल केलाय.
मुंबई : ज्यांना मुळातच लाज नाही, त्यांच्याबद्दल काय बोलणार अशी प्रतिक्रिया देत अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी जितेंद्र आव्हाडांवर (Jitendra Awhad) हल्लाबोल केला. अजित पवारांकडे राष्ट्रवादी (NCP) पक्ष आणि चिन्ह देण्यात आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election Comission) हा निकाल देण्यात आला आहे. दरम्यान या निकालानंतर अजित पवारांनी देखील प्रतिक्रिया देत स्वत:चा राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केला. अजित पवारच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं यावेळी अमोल मिटकरींनी म्हटलं.
निवडणूक आयोगाच्या निकालनंतर अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीमध्ये अजित पवारांकडून सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच या निर्णयानंतर सर्वत्र जल्लोष करा अशा सूचना देखील अजित पवारांनी दिल्या आहेत. पक्ष संघटन आणि वाढीसाठी काम करा असं देखील यावेळी अजित पवारांनी म्हटलं असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान दर मंगळवारी जशी पक्षाची बैठक होते, तशीच ही बैठक होती, असं स्पष्टीकरण अमोल मिटकरी यांनी दिली.
अमोल मिटकरी यांनी काय म्हटलं?
निवडणूक आयोगाने जो निकाल दिला त्याचा आम्ही सर्वांनी विनम्रपणे स्विकारतोय. अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, यावर आता शिक्कामोर्तब झालंय. यासाठी आम्ही सर्वांनी मेहनत घेतली होती. आम्ही ही लढाई जिंकली आहे. त्यासाठी मी अजित पवारांचे अभिनंदन करतो. आज पक्ष आणि चिन्ह मिळाल्यामुळे एक मोठं पाठबळ मिळालं आहे, अशी प्रतिक्रिया अमोल मिटकरी यांनी दिली आहे.
निवडणूक आयोगाचा निकाल विनम्रपणे मान्य - अजित पवार
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवारांकडे दिल्यानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीये. अजित पवारांनी ट्वीट करत ही प्रतिक्रिया दिलीये. निवडणूक आयोगाचा निर्णय आम्ही विनम्रपणे स्विकारतो, असं अजित पवारांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादीमध्ये बंड केल्यानंतर अजित पवारांची त्यांनी सत्ताधारी पक्षांसोबत जाण्याची भूमिका घेतली. त्यानंतर त्यांच्याकडून राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर देखील दावा करण्यात आला होता. निवडणूक आयोगात राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाची लढाई सुरु होती. पण आता अजित पवारांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे स्वागत करत स्वत:चा राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख देखील केला आहे.