राष्ट्रवादीच्या तक्रारीनंतर पंतप्रधान आवास योजना अडचणीत! राज्यमंत्र्यांच्या शेऱ्यामुळं लॉटरी रखडणार?
राष्ट्रवादीच्या तक्रारीनंतर पंढरपूरमधील पंतप्रधान आवास योजना अडचणीत आली आहे.26 जानेवारी रोजी होणाऱ्या लॉटरीचे भवितव्य अंधारात असल्याने नोंदणी केलेले नागरिक चिंतेत आहेत.
पंढरपूर : पंढरपूर परिसरातील गोरगरीब नागरिकांना स्वस्तात घर मिळावे यासाठी सुरु झालेल्या 176 कोटीच्या पंतप्रधान योजनेबाबत राष्ट्रवादीने तक्रार केल्याने आज जिल्हाधिकाऱ्यांनी याची पाहणी केली. पुराचे पाणी येते आणि काळ्या मातीत असलेली जागा याबाबत राष्ट्रवादीने नगरविकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारींवर मंत्री महोदयांनी हिरव्या पेनाने उच्यस्तरीय चौकशी करावी, चौकशी अहवाल येईपर्यंत योजनेस स्थगिती देण्यात यावी असा शेरा मारल्यावर आज जिल्हाधिकाऱ्यांनी या बांधकामाची पाहणी केली.
वास्तविक मंत्रालयातून अद्याप कोणताही स्थगितीचा आदेश प्रशासनाला प्राप्त झाला नसला तरी आज जिल्हाधिकाऱ्यांनी ही पाहणी केली. आता उद्या पुन्हा इतर विभागाच्या तज्ज्ञांना घेऊन या बांधकामाची पाहणी केली जाणार असली तरी एकूण 2092 घरांपैकी तयार झालेल्या 892 घरांची 26 जानेवारी रोजी निघणारी लॉटरी आता पुढे ढकलली जाण्याची भीती या घरांसाठी नावे नोंदविलेल्या नागरिकांना वाटू लागली आहे.
वास्तविक ही योजना सुरु करण्यापूर्वी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध विभागांच्या सचिवांकडून या सर्व धोक्यांची खातरजमा करून हा 176 कोटी रुपयांचा प्रकल्प सुरु करण्यात आला होता. आता याला स्थगिती देण्याचा अधिकार राज्यमंत्र्यांना आहे का? असाही प्रश्न विचारला जात आहे. सध्या तरी चौकशी सुरु असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले असले तरी केवळ दोन दिवसावर या घरांच्या लॉटरीचे भवितव्य मात्र लटकणार असे दिसत आहे.