Sharad Pawar EXCLUSIVE : शरद पवार यांचे मोठे वक्तव्य, सध्या तरी भाजपसोबत जाण्याची मानसिकता नाही...
Sharad Pawar: भाजपसोबतच्या आघाडीबाबत शरद पवार यांनी भाष्य करताना महत्त्वाचे वक्तव्य केले.
Sharad Pawar: मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपबाबत मवाळ भूमिका घेतली जात असल्याचे चित्र दिसत होते. त्यावरून राज्यात महाविकास आघाडीत फूट पडणार असल्याची चर्चा रंगली होती. भाजपसोबतच्या आघाडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. भविष्यात कोणी काय निर्णय घेईल, याबाबत आता सांगता येणार नाही. महाविकास आघाडी सध्या तरी एकत्र असल्याचे शरद पवार यांनी म्हटले. 'एबीपी माझा'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी अनेक प्रश्नांवर भाष्य केले.
शरद पवार यांनी मुलाखतीत म्हटले की, कोण कशी भूमिका घेईल, हे आज सांगता येणार नाहीत. पण हे जे तीन पक्ष आहेत, त्यांच्या सहकाऱ्यांची एकत्रित काम करण्याची मानसिकता आहे. जोपर्यंत ही मानसिकता कायम आहे. तोपर्यंत मला काळजी नाही, असे शरद पवार यांनी म्हटले. जर कोणी वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला तर तो त्यांचा निर्णय असेल. महाविकास आघाडीतील पक्षाचा निर्णय नसणार असेही पवार यांनी सांगितले.
मविआत जागा वाटपाचे काय?
लोकसभेच्या निवडणुकीसाठी वर्षभराचा काळ उरला आहे. महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षातील जागा वाटपांबाबत चर्चा अद्याप सुरू झाली नसल्याचे चित्र आहे. महाविकास आघाडीतील जागा वाटपाबाबत शरद पवार यांनी म्हटले की, आघाडीच्या राजकारणात जागा वाटप, खाते वाटप या सहजपणे होत नाही. त्यात दावे होतात. मात्र, चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातील आणि जागा वाटप होईल. जागा वाटप करताना काही जागा सोडाव्या लागतील तर काही जागा या घ्याव्या लागतील. त्याला आघाडीतील लोकांची तयारी असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
फडतूस-काडतूसवर पवारांनी कान टोचले
राज्यात फडतूस शब्दावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जोरदार सामना पाहायला मिळाला. परंतु फडतूस आणि काडतूस शब्दावरुन शरद पवार यांनी सर्वच नेत्यांचे कान टोचले. वैयक्तिक टीकाटिप्पणी करु नका, असे खडेबोल शरद पवार यांनी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांना सुनावले. "मला जो महाराष्ट्र माहित आहे, जी संस्कृती माहित आहे, जनतेची मानसिकता माहित आहे, अशा गोष्टी शक्यतो टाळा. वैयक्तिक हल्ला नको, राजकीय विषय घ्या, लोकांचे विषय घ्या, त्यावर आक्रमक व्हा, परंतु वैयक्तिक हल्ला, चिखलफेक ही स्थिती येता कामा नये. हे टाळण्याचं काम जाणीवपूर्व केलं पाहिजे, असं शरद पवार म्हणाले.