Pune NCP News : भाजपला दिलेलं प्रत्येक मत गुजरातच्या प्रगतीसाठी; महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवण्यावरुन राष्ट्रवादी आक्रमक
राज्यात नव्याने सुरु झालेल्या "मुंबई - अहमदाबाद रोजगार भगाओ एक्सप्रेस" चे चालक, मालक शिंदे आणि फडणवीस म्हणत सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने मामलेदार कचेरी येथे आंदोलन करण्यात आले.
Pune NCP News : महाराष्ट्राला रोजगार मिळवून देणारे महत्वाचे प्रकल्प राज्याबाहेर जात आहेत. त्यामुळे पुण्यातील (Pune) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आक्रमक झाली आहे. राज्यात नव्याने सुरु झालेल्या "मुंबई-अहमदाबाद रोजगार भगाओ एक्सप्रेस"चे चालक, मालक शिंदे आणि फडणवीस म्हणत सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मामलेदार कचेरीजवळ आंदोलन केलं. भाजपला दिलेलं प्रत्येक मत गुजरातच्या प्रगतीसाठी आणि महाराष्ट्राच्या अधोगतीसाठी अशा आशयाचं बॅनर हाती घेत त्यांनी हे आंदोलन केलं.
वेदांता फॉक्सकॉन, मरिन अकॅडमी, बल्क ड्रग पार्क, मेडिकल डिवाईस पार्क हे सर्व मोठे उद्योग महाराष्ट्र बाहेर गुजरातला हलवल्यानंतर आता टाटा एअरबस प्रकल्प देखील बडोद्याला गेला आहे. यावरुन राजकीय वातावरण पेटलं आहे. राजकीय नेत्यांनी एकमेकांना दोष देत फटकेबाजी सुरु केली आहे.
महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यात उत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चर, चोवीस तास वीज, मुबलक पाणी आणि सुशिक्षित तरुण या सगळ्या सोयीच्या गोष्टी असताना देखील, या राज्यातून प्रकल्प बाहेर जात आहेत. कारण राज्यातील सत्ताधारी सरकार जरी महाराष्ट्र सरकार असले तरी केंद्रातील गुजराती मालकाच्या इशाऱ्यावर काम करणारे सरकार आहे. राज्यातील जनतेच्या हितापेक्षा केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या नेत्यांचे हित जपणं, हे या सरकारचं कर्तव्य असल्याची आठवण त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला करुन दिली आहे.
महाराष्ट्रातील प्रकल्प इतरत्र जात असल्याने राज्यातील तरुणांचं मोठं नुकसान होत आहे. टाटा-एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातच होणे गरजेचे होते. महाराष्ट्रातील प्रकल्प पळवले जात आहेत, ही महाराष्ट्रातील नागरिकांसाठी चिंताजनक बाब आहे. सुमारे 22 हजार कोटींहून अधिक गुंतवणूक असलेला एअरबस प्रकल्प महाराष्ट्रात होणे अपेक्षित असताना सदरचा प्रकल्प गुजरातला होत आहे, असंच सुरु राहिलं तर महाराष्ट्रातील तरुणांना गुजरातमधील कंपन्यांकडे नोकरीसाठी हात पसरावे लागणार असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.
शिंदे फडणवीसांच्या स्वप्नातील महाराष्ट्रात तरुणांनी केवळ आरत्या, मोर्चे, दहीहंडी आणि फटाके फोडणे हेच आहे का? याचा खुलासा देखील राज्याच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडून होणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी दिल्लीत काम करणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्रात अधिकाधिक गुंतवणूक कशी येईल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किमान कुठलाही प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जाणार नाहीत. तसेच अधिक गुंतवणूक येईल याकडे लक्ष द्यावे, असा सल्लादेखील त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे. राज्यातील काही प्रकल्प राज्याबाहेर गेल्याने राज्यातील नेत्यांनी एकमेकांवर फटकेबाजी सुरु केली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना यासाठी कारणीभूत असल्याचे आरोप करत आहेत.