शेतीतील नवदुर्गा : शिक्षकी पेशाला बगल देत कृषी पर्यटनाला चालना
पालघरच्या डहाणू सह परिसरात कृषी पर्यटनाला चांगला प्रतिसाद असून ज्योती सावेंप्रमाणे आणखी महिलांनी पुढे येऊन या व्यवसायात पुढाकार घ्यावा अस आवाहन कृषी विज्ञान केंद्राकडून करण्यात येत आहे.
पालघर : चिकूच माहेरघर असलेल्या डहाणू पासून 10 किमी अंतरावर रामपूर डोंगरीपाडा येथे सुभाष सावे यांच्या 4 एकर जागेत मालती बाग नावाचं कृषी पर्यटन केंद्र वसलय. याचं खर श्रेय जातं ते सुभाष सावे यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती ज्योती सावे यांना शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करणं हा त्यांचा छंदच जणू! बीए बीएड असं उच्च शिक्षण घेऊन लग्नानंतर आपल्या शेतीतच काहितरी नवीन कराव असं ठरवलं. आणि आपल्या शिक्षकी पेशाला बगल देत त्यांनी आपल्या कृषी पर्यटन केंद्रात लक्ष घातलं.
ज्योती सावे यांनी शिक्षकी पेशा सोडून शेतीत मन घातलं. नोकरीनंतर चार एकर जागा विकत घेतली, आपल्या चार एकर जागेत कृषी पर्यटनाला चालना देण्याचा निश्चय केला. पारंपारिक शेती ऐवजी आधुनिक शेती करुन फळबागेतून उत्पन्न घेण्यास सुरुवात केली. बोर्डी सोसायटीकडून कर्ज काढून त्यांनी प्रथम चार एकर माळरान विकत घेतले आणि ते जिद्दीने फुलवलेही. शास्त्रीय पद्धतीने आंबा, चिकू, नारळ, सीताफळ, लिंबू, पेरु, जांभूळ, सफेद जाम, विविध मसाला पिके, औषधी वनस्पती आदींची लागवड केली.
कोसबाड, बोर्डी, घोलवड हा परिसर पर्यटनासाठी प्रसिद्ध असल्याने राहण्यासाठी फॅमिली रुम, सांस्कृतिक उपक्रमासाठी प्रशस्त हॉल बांधला. हौशी तरुणांसाठी ट्रेकिंगची सोय केली. येणाऱ्या प्रत्येकाला शेत शिवारफेरी, शेतातीलच सेंद्रीय भाजीपाला वापरून तयार केलेलं चवदार जेवण, वैशिष्ट्यपूर्ण आदरातिथ्य यामुळे अल्पावधीतच मालती बाग हे कृषी पर्यटन केंद्र प्रसिद्ध झाले. त्यातून अर्थार्जन चांगले होऊ लागले. शेती व्यतिरिक्त अन्य कोणत्याही व्यवसाय नसल्याने कृषी पर्यटन उद्योगातून मुलांचे शिक्षण पूर्ण केले. या मालती बाग मध्ये शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी सहली नेहमी येतात,याच ठिकाणी त्यांना ट्रेकिंगसह इतर प्रशिक्षण कॅम्प ही होतात.
ज्योती सावे यांचा हा उपक्रम इतरांसाठी आदर्श ठरत आहे.ज्योती सावेंच्या या उल्लेखनीय कामामुळे कृषी उद्योजकांना देण्यात येणारा राज्यस्तरीय कृषीथॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. ज्योती सावे यांना यात महत्वाचा हातभार लागला तो कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्राचा. कृषी पर्यटन सुरू करत असताना ज्योती सावे यांना या कृषी केंद्राच मोलाचं मार्गदर्शन लाभलं. कृषी पर्यटन सुरू करण्यापासून ते आता पर्यंत कृषी केंद्रातून विविध लागवडी आणि पिकांच्या लागवडीसाठी सावे नेहमी कृषी केंद्राच मार्गदर्शन घेऊन प्रयोग करत असतात. पालघरच्या डहाणू सह परिसरात कृषी पर्यटनाला चांगला प्रतिसाद असून ज्योती सावेंप्रमाणे आणखी महिलांनी पुढे येऊन या व्यवसायात पुढाकार घ्यावा अस आवाहन कृषी विज्ञान केंद्राकडून करण्यात येत आहे. ह्या शेतीत काम करत असताना आपल्या शिक्षणाचा फायदा उचलत ज्योती सावे यांनी पर्यटनात हात घालत आपली आर्थिक घडी मजबूत करत कुटुंबाला मोठा आधार दिला आहे. त्यामुळेच शेतीतील या नवदुर्गेचा उपक्रम सार्थकी लागला आहे.