अवघ्या दहा हजारांचा आवळा प्रक्रिया उद्योग आज पस्तीस लाखांवर नेणाऱ्या नवदुर्गेची यशोगाथा
गृहिणी ते उद्योजिका या प्रवासात संजीवनी जाधव यांची 11 वर्षाची मेहनत आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तसेच एकीच्या बळावर त्यांनी हा उद्योग उभा केला आहे.
जालना : शहरातील गोपिकिशन नगर भागात राहणाऱ्या संजीवनी जाधव यांचा 'अॅक्टीव्ह' आवळा प्रक्रिया उद्योगातील उत्पादन आज राज्यभर पसरली आहेत. दर्जेदार आणि शरीसासाठी उपयुक्त असलेल्या आवळ्याच्या वेगवेगळ्या उत्पादनाची मागणी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.
2009 साली संजीवनी जाधव यांनी अॅक्टीव्ह नावाने एका बचत गटाची स्थापना केली, घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीने संजीवनी जाधव यांना बचत गटाच्या माध्यमातून काहीतरी करण्याची जिद्द निर्माण झाली. शिवाय इतर महिला प्रमाणे स्वावलंबी होण्याच्या इच्छेने त्यांनी कॉलनीतील महिला एकत्रित करून हा बचत गट स्थापन केला. पुढे याच माध्यमातून काही महिलांना घेऊन त्यांनी आवळ्यावर प्रक्रिया करून आवळा सुपारी आणि आवळा कॅंडी तयार करण्याचा निर्णय घेतला. ज्यासाठी त्यांनी खरपुडी येथील कृषी केंद्रात आवळ्यावर प्रक्रिया करण्याचे प्रशिक्षण घेतले. सुरवातीला प्रयोग म्हणून त्यांनी घरी प्रक्रिया करत आवळ्यापासून तयार केलेल्या सुपारी, कॅंडीची विक्री केली ज्यात त्यांना चांगले उत्पन्न मिळाले.त्यामुळे त्यांच्या आत्मविश्वासात अधिकच भर पडली. पुढे बचतगटाच्या महिलांना एकत्रित करत प्रत्येकी 100 रुपये घेऊन 10 हजार रुपये उभे केले, ज्यातून 5 क्विंटल आवळ्यावर प्रक्रिया करून त्यापासून आवळा कॅंडी, पावडर तसेच मुरंबा करण्यात आला. तयार करण्यात आलेली उत्पादन बचत गटाच्या महिलांनी जत्रेत, स्टॉल वर तसेच कृषी प्रदर्शनात हातोहात विकली. ज्यातून आर्थिक आधार वाढू लागला. उत्पादचा दर्जा चांगला रखान्यात यश आल्याने मागणी वाढत गेली परिणामी कधी काळी 5 क्विंटल आवळ्या वर होणाऱ्या प्रक्रियेत भर पडली असून आता ही प्रक्रिया 18 टनावर गेलीय.
आता या आवळ्या पासून वेगवेगळी नऊ उत्पादने तयार होतात, ज्यात आवळा कॅण्डी, आवळ्याचं लोणचं, आवळा मुरंबा, आवळा सुपारी, आवळा ज्यूस, आवळा पावडर , आवळा मोरावळा याचा समावेश आहे. भविष्यात आवळ्यापासून वाईन बनवण्यासाठी सुद्धा या बचतगटाचा प्रयत्न आहे. मधल्या काळात उद्योगाच्या विस्तारीकरणासाठी महाराष्ट्र बँकेने या गटाला 4 लाखांचे कर्ज उपलब्ध करून दिले, त्यामुळे घरात चालणारा हा उद्योग आता औद्योगिक वसाहतीमध्ये स्थिरावला आहे. या बचत गटाच्या माध्यमातून संजीवनी जाधव यांनी12 महिलांना कायम स्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिलाय,ज्यातून या महिलांना घरचा गाडा हाकण्यास मदत मिळाली आहे. एकेकाळी 3 महिने सिजन नुसार चालणारा हा उद्योग आता बारही महिने चालत आहे. या गटात काम करण्याऱ्या नंदा उपाध्याय, आणि वंदना सोनवणे सारख्या इतर महिला सदस्य दिवसाला 300 पेक्षा जास्त रोजगार मिळवू लागल्या आहे.
अवघ्या दहा हजारांचा उद्योग आज पस्तीस लाखांवर
गृहिणी ते उद्योजिका या प्रवासात संजीवनी जाधव यांची 11 वर्षाची मेहनत आहे. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तसेच एकीच्या बळावर त्यांनी हा उद्योग उभा केला आहे. ज्यातून मागच्या वर्षी 30 ते 35 लाखांची उलाढाल झाली आजही एवढीच किंबहुना या पेक्षा जास्त उलाढाल होण्याची त्यांची खात्री आहे. त्यांच्या याच उद्योगशिल स्वभावाचे कौतुक करत अनेकांनी त्यांचा सन्मान केला. 2012 साली स्व.शारदाबाई गोविंद पवार या पुरस्काराने तात्कालिक केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. एकेकाळची आर्थिक चणचण आणि स्वकर्तृत्वा अभावी समाजात नसलेला सन्मान अनुभवनाऱ्या संजीवनीताई चा प्रवास महिला प्रतिकूल परिस्थितले महिला स्वावलंबनाचे उत्कृष्ट उदाहरण आहे.
संबंधित बातम्या :