शेतीतील नवदुर्गा: संगिता देशमुखांनी दाखवली 'स्वंयप्रेरणे'ची नवी पायवाट, प्रवास एका प्रेरणेचा
Navratri 2020 : अकोला जिल्ह्यातील भांबेरीमधील संगिता देशमुख या शेतीला जोडधंद्याची साथ घेत उद्योजिका बनल्या आहेत.त्यांनी बचतगटांच्या माध्यमातून गावातील मातृशक्ती संघटीत केली आहे. त्यांच्या या कार्याला एबीपी माझाचा सलाम...
अकोला : नवरात्र म्हणजे मातृशक्तीचा सृजनोत्सव. तिच्या मातृत्वासोबतच तिच्या कर्तृत्वाला सलाम करण्याचा सोहळा. कृषी क्षेत्रात अनेक महिलांनी भरीव योगदान देत यशाचे अनेक नवे अध्याय लिहिले आहेत. याच अध्यायातलं एक नाव म्हणजे अकोला जिल्ह्यातील भांबेरी गावातील महिला शेतकरी संगिता देशमुख. संगिताताईंनी स्वत:च्या शेतीला गृहउद्योगातून नवी ओळख दिली आहे. सोबतच गावातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून 'स्वंयप्रेरणे'ची नवी पायवाट दाखवली आहे. घर, शेती, उद्योगासह ग्रामविकासाला नवी दृष्टी देणाऱ्या या 'नवदुर्गे'ची ही यशोगाथा काही करू पाहणाऱ्या महिलांच्या पंखांत नवं बळ, उर्जा आणि प्रेरणा भरणारी आहे.
अकोला जिल्ह्यातील भांबेरी हे तेल्हारा तालुक्यातल्या मोठ्या गावांपैकी एक. गावाच्या प्राचीनपणाची साक्ष देणाऱ्या अनेक पाऊलखुणा या गावानं आजही जपल्या आहेत. गावातील देशमुख वेटाळात दिडशे वर्षांपूर्वीची अनेक घरं आजही अगदी सुस्थितीत आहेत. या गावानं आपल्या प्राचीन वारशाबरोबरच 'लोकसुधारणे'चा वारसाही प्राणपणानं जपला आहे. गावात आधीपासूनच 'मातृशक्ती'ला सन्मानाची वागणूक देण्याची परंपरा आहे. 'मातृसत्ताक पद्धती'चा हा वारसा अगदी अलीकडच्या पिढीपर्यंतही गावात झिरपलेला आहे. त्यामुळेच या गावातील विकासात महिलांचं योगदान अगदी पुरूषांच्या बरोबरीनं आहे. महिलांतील 'टॅलेंट'ला सन्मान देण्याची परंपरा आणि भावना असल्यानं या गावकऱ्यांसाठी संपूर्ण वर्षच अगदी नवरात्रासारखं असतं. या गावातील अनेक महिलांनी आपल्यासह घर आणि गावाची प्रगती साधत अनेक 'यशोगाथा' निर्माण केल्या आहेत. यातीलच एक नाव म्हणजे संगिताताई देशमुख.
संगिता सुधीर देशमुख... कधीकाळी भांबेरी गावातील एक सर्वसाधारण गृहीणी महिला अशी त्यांची ओळख. मात्र, संगिताताईंनी आपल्या प्रयोगशील कर्तृत्वातून स्वत:च्या अनेक ओळखी निर्माण केल्या आहेत. त्या कधी एक कुटूंबवत्सल स्त्री असतात, कधी आदर्श पत्नी, सून आणि माता असतात, कधी शेतीला नवी दिशा देऊ पाहणारी प्रगतीचा ध्यास घेतलेली एक महिला 'शेतकरी' तर कधी यशाचा नवा अध्याय लिहिणारी एक यशस्वी 'उद्योजिका', तर कधी गावातील महिलांमध्ये स्व:त्व जागवणारी एक संवेदनशील समाजप्रेरिका असतात. मात्र, या सर्व ओळखीचा पाया घातला त्यांच्यातील 'शेतकरी' या ओळखीनं.
गृहिणी संगिताताईंचा बांधापर्यंतचा प्रवास तेल्हारा तालुक्यातील मुंडगाव हे संगिताताईंचं माहेर. मुंडगाव पंचक्रोशीत मोठं नाव असलेल्या नरसिंगराव देशमुख यांच्या संगिताताई कन्या. गजानन महाराजांच्या परमभक्त संत बायजाबाईंचा वारसा या घराण्याला लाभलेला. माहेरी शेती असली तरी संगिताताईंचा लग्नाआधी शेतीशी फारसा संबंध न आलेला. पुढे 1992 मध्ये भांबेरी येथील शिक्षक असलेल्या सुधीर देशमुख या तरूणाशी त्यांचा विवाह झाला. घरी शेती असली तरी सासरीही त्यांचा शेतीशी विशेष संपर्क नव्हताच. पुढे दोन मुलं झालीत. मुलं झाल्यानंतर सामाजिक भान जपणाऱ्या सुधीर यांची घर, मुले, शेती, शाळा आणि सामाजिक काम करतांना 'तारेवरची कसरत' होऊ लागली. यातूनच हळूहळू संगिताताई पतीवरील भार कमी करण्यासाठी शेतीत लक्ष देऊ लागल्यात. पती सुधीरही त्यांना शेतीच्या कामासह त्यात नवीन प्रयोगांसाठी प्रोत्साहीत करायला लागलेत. त्यातूनच संगिता यांच्यामधील 'चिकित्सक' शेतकरी घडायला सुरूवात झाली. पुढे शेतीतील सर्व जबाबदारी आणि निर्णय संगिताताईंवरच सोपविण्यात आलेत. आधी शेतीशी जुजबी संबंध असलेल्या संगिताताई पतीला मदत म्हणून शेती करायला लागल्यात. पण, याच काळ्या आईनं त्यांना लळा लावला. अन त्यांना याच काळ्या आईनं ओळख दिली. आपल्या प्रयोगांतून शेतीत यशाचा नवा अध्याय लिहिणारी महिला 'शेतकरी' म्हणून.
अशी यशस्वी केली शेती पाच वर्षांपूर्वी संगिताताईंनी शेतीची सारी सूत्रं हाती घेतलीत. सर्वात आधी त्यांनी शेतातील पिक पद्धती आणि नियोजन बदलण्यावर भर दिला. त्यांच्या पतीकडे वडिलोपार्जित सात एकर शेती. त्यांनी शेतातील चार एकरात लिंबूची लागवड केली. यासोबतच शेतात कापूस, सोयाबीन, तूर या पिकांसोबत नगदी पिकं घ्यायलाही सुरूवात केली. मात्र, कधी कमी मिळणारा भाव. तर कधी पाचवीला पूजलेली नापिकी त्यांना नाऊमेद अन अस्वस्थ करायच्या. लिंबूचं महत्वाचं पिक त्यांना अपेक्षित मोबदला मिळवून देत नव्हतं. लिंबूच्या विक्रीतून मिळणारं कमी उत्पन्न त्यांना अस्वस्थ करायचं. अनेकदा शेती करणं त्यांना नकोसं वाटायचं, त्या अस्वस्थ होऊन जायच्या. मात्र, याच टप्प्यावर कृषी विभाग आणि कृषी विज्ञान केंद्राच्या काही मार्गदर्शन शिबिरं आणि प्रशिक्षण वर्गांनी त्यांच्या विचारांची दिशा बदलवत त्यांना व्यापक केलं. संगीता यांच्या शेतीतील प्रयोगांना कृषी विभागाच्या मदतीनं नवी ओळख मिळाली.
अस्वस्थतेतून रोवली 'वृंदावन गृह उद्योगा'ची मुहूर्तमेढ शेतीला जोडधंदा नव्हता. अन लिंबाला पुरेसा मोबादला मिळत नव्हता. याच अस्वस्थतेनं चार वर्षांपूर्वी जन्म दिला 'वृंदावन गृह उद्योगा'ला... आधी संगिता यांनी स्वत:च्या शेतातील लिंबांपासून घरीच लोणचं बनवून ते विकायला सुरूवात केली. उत्तम चवीमुळे मागणी वाढली. संगिताताईंच्या गृहउद्योगाची हळूहळू एक-एक नवं उत्पादन वाढायला लागलं. आता त्यांनी आवळे विकत घेऊन त्याच्यापासून विविध पदार्थ बनवायला लागल्यात. त्यांनी घरीच 'वृंदावन' नावानं गृहउद्योग सुरू केला. या 'ब्रँडनेम'खाली त्यांनी अनेक उत्पादनं बनवायला सुरूवात केली. लिंबू लोणचं, आवळा कँडी, ड्रायफ्रूट्स लोणचं, आंबा लोणचं, आवळा मुरंबा, आवळा पावडर, बेल मुरब्बा, धुपबत्ती अशी 'वृंदावन'ची उत्पादनं आता बाजारात मिळायला लागलीत. शेतकरी संगिताताई आता उद्योजिका म्हणूनही ओळखल्या जाऊ लागल्यात.
बचतगटांच्या माध्यमातून मातृशक्ती केली संघटीत आता संगिताताईंच्या कामाच्या कक्षा हळू-हळू रुंदावायला लागल्यात. त्यांनी गावातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून संघटीत करायला सुरूवात केली. गावातील सहाशे महिलांना त्यांनी 60 बचत गटांच्या माध्यमातून छोटे-छोटे गृह उद्योग करण्यासाठी प्रोत्साहीत केलं. गावात बचत गटाच्या माध्यमातून एक मोठी आणि 22 छोट्या परसबागा तयार केल्यात. आता या परसबागेतील भाजीपाला बचत गटांच्या माध्यमातून गावातच विकला जातो. आज बचत गटाच्या माध्यमातून याच्या सभासद महिलेला घरगुती उद्योग सुरू करण्याची प्रेरणा दिली. आज त्यांच्या नेतृत्वात काम करणारे गावातील सर्वच बचतगट नफ्यात आहेत. विशेष म्हणजे आता भांबेरीत महिलांच्या घरी बनलेली अनेक उत्पादनांसोबत 'वृंदावन'च्या उत्पादनांचं मार्केटींगही बचत गटातील महिलाच करायला लागल्यात. अनेक कृषी प्रदर्शनांमध्ये भांबेरीतील बचतगटांच्या उत्पादनाचाच बोलबाला असतो.
महिला झाल्यात ग्रामविकासात सक्रिय आज या गावातील महिला बचतगटांच्या माध्यमातून ग्रामविकासात सक्रीय भूमिका बजवायला लागल्या आहेत. गावात शौचालय बांधणीसाठी या बचतगटांच्या महिलांनी गावाचं स्वयंस्फूर्तीने सर्वेक्षण करीत कृती आराखडा ग्रामपंचायतीला सादर केला. आज गावात शौचालयाचं प्रमाण यातूनच 80 ते 85 टक्क्यांपर्यंत गेलं आहे. गावातील सकारात्मक कार्यातही या महिला हिरीरीने भाग घेतांना दिसत आहेत.
'वृंदावन'च्या उत्पादन विक्रीतून संगिताताई लखपती
संगिताताई दरवर्षी जवळपास सात ते 10 क्विंटल लोणचं विक्री करतात. यातून लोणचं आणि इतर उत्पादनं बनविण्यासाठी लागणारा खर्च वगळता त्या उद्योगातूनच वर्षाकाठी कमीत कमी सहा लाखांचा निव्वळ नफा मिळवतात. सोबतच लोणच्या व्यतिरिक्त उत्पादन विक्रीतूनही त्यांना एक-दिड लाखांचा नफा उरतो. शेतातीलच माल वापरत असल्याने अगदी किफायतशीर भावात त्या लिंबूचं लोणचं बनवू शकतात. सोबतच संगितातई कापूस, सोयाबीन, तूर या पारंपरिक पिकांतूनही लाखोंचं उत्पन्न दरवर्षी घेतात.
संगिताताईंच्या मागे कुटुबाचं खंबीर पाठबळ संगिताताईंच्या या आभाळभर कामाचं क्षितीज वाढलं ते कुटुबियांच्या वाढत्या सक्रीय पाठबळामूळेच. संगिताताईंचे पती सुधीर देशमुख पंचगव्हाणच्या विद्यालयात शिक्षक. तर दोन मुलांपैकी एक एमबीए झालेला. तर दुसरा बी.एस.सी. कंप्यूटर झालेला. सोबतच सासूबाईंचं पाठबळही त्यांना वेळोवेळी लाभत गेलं. पती सुधीर हे संगिता यांना सोबत घेत सातपुडा पर्वतरांगांतील आदिवासींमध्ये समाजकार्यही करतात. दरवर्षी हे दोघंही हजारोंचं साहित्य आदिवासींना देत असतात. तेथील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठीही हे दांपत्य सातत्यानं झटत असतं. आज संगिताताईमूळं कुटूंबाला मिळालेल्या ओळखीचा घरातील प्रत्येकाला अभिमान आहे.
संकटं आल्यावर त्याच्याशी दोन हात करीत अनेक महिलांनी आपले घर, संसार, शेती आणि समाज मोठा केला आहे. अनेक महिलांनी ही आव्हानं 'रणरागिणी', 'नवदुर्गा' बनत मोठ्या ताकदीने पेलली आहेत. 'संगिताताई ' त्याच 'नारीशक्ती'चे प्रतिक आहेत. शेतीसोबतच उद्यमशिलतेचा आवाज बुलंद करणाऱ्या संगिताताई देशमुख या 'नवदुर्गे'ला 'एबीपी माझा'चा सलाम.