Navneet Rana : 12 दिवसांनंतर ते भेटले अन् अश्रूंचा बांध फुटला.., राणा दाम्पत्याची रुग्णालयातील भेट, व्हिडीओ होतोय व्हायरल
Navneet Rana And Ravi Rana : आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा याची 12 दिवसांनंतर भेट झाली आहे. यावेळी नवनीत राणा या ओक्साबोक्शी रडल्याचं दिसून आलं.
मुंबई: आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांची 12 दिवसांनंतर भेट झाल्यानंतर या दाम्पत्याचा अश्रूंचा बांध फुटला आहे. रवी राणा यांनी रुग्णालयात असलेल्या नवनीत राणा यांची भेट घेतल्यानंतर नवनीत राणा यांच्या डोळ्यातून अश्रू आले. राणा दाम्पत्यांची ही भावनिक भेट कॅमेरात कैद झाली असून सोशल मीडियावर या संबंधिचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होतोय.
आमदार रवी राणा हे खासदार नवनीत राणा यांना भेटण्यासाठी लीलावती रुग्णालयात येताच नवनीत राणांच्या अश्रूचा बांध फुटला. दोघेही एकमेकांच्या गळात पडले. दरम्यान, हा भावनिक प्रसंग कॅमेरात कैद झाला.
राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर खासदार नवनीत राणा यांना भायखळा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं तर रवी राणा यांना तळोजा तुरुंगात ठेवण्यात आलं होतं. बुधवारी न्यायालयाने या दोघांनाही जामीन मंजूर केल्यानंतर आज दोघांचीही सुटका झाली. दरम्यान, नवनीत राणा यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास असल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळेच रवी राणा यांनी तुरुंगातून बाहेर पडताच लीलावती रुग्णालय गाठलं.
नवनीत राणा या गेल्या सहा दिवसांपासून त्यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास आहे अशी तक्रार करत होत्या, पण प्रशासनाने त्याची दखल घेतली नसल्याचा आरोप आमदार रवी राणा यांनी केला.