Ravi Rana : नवनीत राणांपाठोपाठ आता रवी राणांचीही 12 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
Navneet Rana And Ravi Rana : आमदार रवी राणा यांची आज 12 दिवसांनंतर तळोजा कारागृहागातून सुटका झाली आहे.
मुंबई: खासदार नवनीत राणा यांच्यानंतर आता आमदार रवी राणा यांची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली आहे. रवी राणा यांची 12 दिवसांनंतर सुटका झाली आहे. राजद्रोहाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबईतील विशेष न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. त्यानंतर आज त्यांची सुटका झाली.
दरम्यान, खासदार नवनीत राणा यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास जाणवत असल्याने त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यामुळे आमदार रवी राणा आता तळोजातून बाहेर पडल्यानंतर थेट लीलावती रुग्णालयात जाणार आहेत. खासदार नवनीत राणा यांच्यावर उपचार सुरू असून डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर त्यांना रुग्णालयात ठेवायचं की डिस्चार्ज द्यायचा याचा निर्णय होणार आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील निवासस्थान 'मातोश्री'बाहेर 23 एप्रिल रोजी हनुमान चालीसाचे पठण करण्याची घोषणा केली होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्याचे कारण देत या जोडप्याने ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसाचे पठण करण्याची त्यांची योजना रद्द केली होती. त्यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश आर.एन.रोकडे यांनी बुधवारी राणा दाम्पत्याला जामीन मंजूर केला.
जामीन मंजूर करताना पाच अटी
दरम्यान, मुंबई सत्र न्यायालयाने राणा दाम्पत्याला जामीन मंजूर करताना पाच अटी घातल्या आहेत. न्यायालयाने घातलेल्या अटींनुसार, रवी राणा आणि नवनीत राणा यांना प्रसारमाध्यमांशी बोलण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच तपासात कोणतेही अडथळे आणू नये, असे आदेश न्यायालयाने त्यांना दिले आहेत. याशिवाय या घटनेशी संबंधित असलेल्या साक्षीदारावर कोणत्याही प्रकारचा दबाव आणायचा नाही, त्यांना प्रलोभने दाखवून त्यांच्यावर प्रभाव टाकायचा नाही अशीही अट घातली आहे. विशेष म्हणजे कोर्टाने राणा दाम्पत्याने अशा प्रकारच्या गुन्ह्यात पुन्हा सहभाग घ्यायचा नाही, असेही सांगितले आहे. न्यायालयाच्या या अटींचे पालन राणा दाम्पत्याला करावे लागणार आहे. जामिनावर सुटल्यानंतर अर्जदाराने असा कोणताही गुन्हा करू नये आणि प्रकरणाशी संबंधित कोणत्याही विषयावर माध्यमांशी बोलू नये, असे न्यायालयाने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या: