सरकारी नोकरी, पुरेसं अन्न फक्त आश्वासनांपुरतंच; राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेत्या हाली बरफवर लॉकडाऊन मध्ये उपासमारीची वेळ
शहापुर तालुक्यातील धाडसी महीला व राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेती हाली बरफ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपासमारीत जगते आहे
शहापूर : शहापूर तालुक्यातील अती दुर्गम भागात राहणाऱ्या हाली बरफ हिनं आपल्या मोठ्या बहिणीची बिबट्याच्या हल्यापासुन देत आपल्या सुटका केली होती. तेव्हा तिची दखल घेत 2012 मध्ये केद्रं सरकारने तिला बाल शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. माञ आजही ती शासनाच्या सोयी सुविधांपासून वंचित आहे. घरची परिस्थिती बेताचीच असुन एका छोट्याशा झोपडीत ती कुटुबांसह राहत आहे.
उदरनिर्वाहासाठी हाली एका आश्रम शाळेत रोजंदारी वर झाडू मारण्याचं काम करत होती मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लॉकडाउन जाहीर केल्याने हाताला असलेलं काम ही बंद झालं . काम नसल्यामुळे उपासमार होऊ लागली, रास्त धान्य दुकानातून मिळणारे धान्य हे कार्ड ऑनलाईन न झाल्यामुळे 3 महिने रेशनिंग मिळाले नसल्याने कुटुंबाच्या उपासमारीत आणखी भर पडली. पिण्याच्या पाण्यासाठी 4 ते 5 किलोमीटर अंतरावर जाऊन पाणी आणावे लागत आहे. पाणी मिळालं तर ठीक नाहीतर पाण्यासाठी वणवण करावी लागते. विजेचे खांब न लावल्याने घरात वीज ही नाहीये. घरात अन्न धान्य नसल्याने उपाशीपोटी जगावं लागत आहे.
परिस्थिती खूप बिकट असल्याने घरात भांडी नाहीत, कपडे नाहीत, जेवण बनवण्यासाठी एक दाणा ही नसल्याने दुसऱ्यांच्या घरातून मागून खाण्याची वेळ हालीवर आली आहे . अशा अनेक समस्यांना सध्या हाली तोंड देत आहे . या राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेतीला फक्त आश्वासन दिलं जातंय. मात्र प्रत्यक्षात त्याची पूर्तता केली जात नाही, प्रशासन असो किंवा लोकप्रतिनिधी तसेच कोणत्याही कर्तुत्व असलेल्या व्यक्तीने अथवा सामाजिक संस्थेने हालीकडे लक्ष दिलेला नाही ही एक दुःखद बाब आहे.
Kantabai Satarkar | ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांची कारकीर्द फोटोच्या माध्यमातून
एखाद्या तालुक्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त व्यक्ती म्हणजे तालुक्याचा अभिमान असते. शीरपेचातील तुऱ्याप्रमाणे त्या व्यक्तीला वागणूक मिळालीच पाहिजे. पण शहापूर तालूक्याने हाली बरफ या नावाचा वापर फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठीच केला आहे. पुरस्कारापूर्वीची हाली आणि आताची हाली यात दोन टोकाचे अंतर असलेच पाहिजे होते. एका आदिवासी वस्तीत कारव्याच्या घरात राहणारी हाली राष्ट्रीय शौर्य पुरस्कार जिंकल्यानंतर अनेक वृत्तपत्रात झळकली, वृत्तवाहिन्यांनी हालीवर मोठेमोठे रिपोर्ट बनवले. अनेक नेतेमंडळी हालीची भेट घेऊन तिला आम्हीच तारणार या आविर्भावात स्वतः ची प्रसिद्धी करताना निदर्शनास आले.
वास्तव वेगळे होते आणि अजूनही वेगळेच आहे. ज्या मुलीला प्रवाहात आणायची गरज होती ती मुलगी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याच्या अगदी काही महिन्यातच लग्नबंधनात अडकली. आदिवासी समाजात होणाऱ्या अल्पवयीन मुलींच्या लगाच्या चालीरितींतून हाली सुद्धा वाचली नाही. पंधराव्या वर्षी लग्न झालेल्या हालीला आज तीन मुलं आहेत. २०१२ला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळालेल्या हालीची माहेरची परिस्थिती जशी गरीबीत होती तशी सासरची सुद्धा गरीबच होती. अनुसूचित क्षेत्र असलेल्या शहापूर विधानसभेचे आमदार सुद्धा आदिवासी समाजातून निवडून येतात. पण याचा फायदा हाली ला होऊ शकला नाही.
सध्या एक राष्ट्रीय शौर्य पुरस्कार विजेती महिला अनुसूचित विधानसभा क्षेत्र असलेल्या तालुक्यात कसे जीवन जगते याबद्दल माहिती उघड करणे गरजेचे आहे. सध्या ती आणि तिचा नवरा राम कूवरे आणि संग्राम, छाया आणि माया ही तीन मुलं रातांधळे पाडा येथे राहत आहेत. मुलांचं पोट भरण्यासाठी पतीपत्नी खूप प्रयत्न करीत आहेत. मात्र लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावल्याने तेही शक्य होत नाहीये. काही दिवस उपाशी पोटीच झोपावं लागत असं हालीने सांगितले आहे.
प्रशासनामधील राष्ट्रीय पुरस्कार विजेतीची कोणालाच आठवण नसल्याने तिच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. हालीच्या घरात आज सुद्धा वीज पुरवठा अखंडपणे करण्याची तसदी कोणी घेतली नाही. तीन चार विजेचे खांब टाकण्याची गरज असूनही त्याबाबत इतक्या वर्षांत काही करता आले नाही. हालीला पाण्याची प्रचंड मोठी समस्या आहे. पाण्याचा प्रश्न का सोडवला जात नाही. हालीला राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळून आठ ते नऊ वर्ष उलटत आली पण या पूरस्काराचा दर्जा शहापूर तालुक्याला अजूनही कसा कळला नाही ? इतक्या वर्षांत हालीला फक्त नोकरीची आश्वासने मिळाली पण कायमस्वरूपी सरकारी नोकरी का कोणीच मिळवून देऊ शकले नाही? तिला घरकुल आणि रेशन कार्ड मिळण्यात इतकी वर्ष का लागली? शहापूर तालुक्याची शान असलेल्या महिलेच्या घरापर्यंत अजूनही विजेची खांब टाकून वीज का पोहोचली नाही? तिला पाण्याची व्यवस्था करण्यात अजून कोणीच का धजावले नाही? आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे नेते प्रसिद्धीचे भांडवल खर्च करीत असतात त्यांपैकी कोणीही हालीचे कुटुंब दत्तक घेऊन त्याना जीवनावश्यक सुविधा पुरविण्याचा मोठेपणा का दाखवला नाही? आज ही हाली मदतीच्या अपेक्षेत आहे. लॉकडाऊनमुळे हालीचा रोजगार बंद आहे. पूर्ण तालूक्याने व्हॉट्सप आणि फेसबूक वरील अन्न दान करतांना काढलेल्या फोटो मध्ये गर्दी केली. हाली सारख्या राष्ट्रीय शौर्य पुरस्कार मिळवलेल्या महिलेकडे दुर्लक्ष केली जाते याची खंत आहे.