National Doctors Day Exclusive : आईसाठी 'पैठणी' विणणारा डॉक्टर!
ABP Majha Exclusive : नेत्ररोगतज्ज्ञ असलेले डॉ. स्वप्नील मोडक हे आपल्या आईसाठी सध्या स्वतः 'पैठणी' लूमवर बसून तयार करीत आहे. ही पैठणी तयार करण्यासाठी आणखी तीन ते चार महिने लागणार आहेत.
औरंगाबाद : तुम्हाला विश्वास बसणार नाही, मात्र हे खरे आहे. औरंगाबाद येथील एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे नेत्ररोग विभागात काम करणारे डॉ. स्वप्नील मोडक हे आपल्या आईसाठी सध्या स्वतः 'पैठणी' लूमवर बसून तयार करीत आहे. त्यासाठी सध्या ते कार्यरत असलेल्या हॉस्पिटलच्या परिसराला लागून असणाऱ्या एमजीएम संस्थेतील इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन विभागाची मदत होत असून तेथे सध्या लूमवर बसून त्यांनी काम चालू केले आहे. ही पैठणी तयार करण्यासाठी आणखी तीन ते चार महिने लागणार असून ही पैठणी डॉ. मोडक आपल्या आईला वाढदिवशी भेट म्हणून देणार आहेत.
30 वर्षीय डॉ मोडक यांनी नेत्ररोग विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून सध्या ते एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातच निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. अनेक डॉक्टर आपले काम करता करता अनेक छंद जोपासत आपले कर्तव्य बजावत असतात. त्याचप्रमाणे डॉ. मोडक यांना पैठणी विणण्याचा छंद नसला तरी आईला आवडणारी पैठणी स्वतःचा हाताने बनविण्याचा निर्णय त्यांनी घेतला असून गेली तीन आठवडे ते त्यांचे रुग्णालयातील काम संपवून दोन ते तीन तास वेळ मिळेल तसे प्रशिक्षण घेत आहेत.
डॉ. स्वप्नील मोडक यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले की, "गेली वर्षभर आम्ही कोविडच्या रुग्णांना उपचार देत होतो. काही वेळा सर्व प्रयत्न केल्यानंतर सुद्धा रुग्ण दगावत होते. त्यामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना त्याचा दाखल केलेला रुग्ण दगावला आहे हे सांगण्याकरता त्यांचे समुपदेशन करावे लागते, हा प्रकार फार वेदनादायी असतो. या अशा परिस्थितीत एक वयस्कर कोविड रुग्ण दाखल झाला होता. त्याची विचारपूस करण्यासाठी रोज त्यांचा मुलगा रुग्णालयात येत असे. नेहमी तो त्याचे वडील कधी बरे होणार असे विचारत असे. त्यांनी एक दिवशी सांगितले की मला माझ्या वडिलांना विमानाने फिरायला घेऊन जायचे आहे. कृपया त्यांना लवकर बरे करा. आम्ही सर्व प्रयत्न करत होतो. काही दिवसाने त्या मुलांच्या वडिलांना दुसऱ्या आयसीयूमध्ये हलविण्यात आले. मात्र आठ दिवसाने मला कळले कि त्याच्या वडिलांचे निधन झाले. ही घटना तशी मनाला चटका लावून जाणारी होती. त्या मुलाला त्याची शेवटची इच्छा पूर्ण करता आली नाही. या घटनेने थोडं नैराश्य आले. मात्र या काळात अशा पद्धतीने वागून चालणार नव्हते. "
ते पुढे सांगतात, "त्या घटनेचा विचार करत असताना आपल्या आईला विविध प्रकारच्या साड्या आवडतात, त्यात तिला पैठणी तर खास आवडते, मग मी ठरविले तिला स्वतःच्या हाताने विणून पैठणी द्यायची. आमच्या कॅम्पसला लागून मी कार्यरत असलेल्या संस्थेचा दुसरा कॅम्पस आहे त्यामध्ये एमजीएम खादी आणि पैठणी प्रशिक्षण आणि संशोधन केंद्र आहे. आमच्या संस्थेचे प्रमुख अंकुशराव कदम, डॉ. पी एम जाधव आणि डॉ. प्रवीण सूर्यवंशी यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर त्यांनी मला या पैठणी संशोधन केंद्रात पैठणी विणण्याची परवानगी दिली."
डॉ. मोडक म्हणतात, "मी माझी 9 ते 4 ही कामाची वेळ संपल्यानंतर 4 ते 6 या केंद्रात जाऊन प्रशिक्षण घेऊ लागलो. तीन आठवड्याच्या प्रशिक्षणानंतर मला आता बुट्टी आणि पदर विणायला जमत आहे. या हॅन्डलूमवर काम करणे म्हणजे मेडिटेशन आहे कारण ते दोन तास कसे निघून जातात काही काळातच नाही. कारण या कामात तुमचे दोन्ही हात आणि पाय आणि नजर या कामासाठी वापरावी लागते. मन एकाग्र करून काम करावे लागते. येत्या काळात जर व्यवस्थित काम केले तर तीन महिन्यात मी माझ्या आईसाठी पैठणी विणून पूर्ण करेन असा मला विश्वास आहे. ती पैठणी तिला मी तिच्या वाढदिवसाच्या दिवशी भेट म्हणून देणार आहे. मला विश्वास आहे त्यावेळी तिच्या चेहऱ्यावरील आनंद निराळाच असेल. त्या आनंदासाठी हे सर्व सुरु आहे."
पैठणी साडीचे वैशिष्ट म्हणजे ही संपूर्ण साडी आणि त्यावरील नक्षी काम हे हाताने केलेले असते. ही पैठणी बनविण्यास तसे अवघड आणि वेळ खूप लागतो. ज्या पद्धतीने नक्षी काम त्याप्रमाणे साडीचे काम आणि वेळ वाढत असतो.
डॉ. मोडक यांच्या या पैठणी विणण्याच्या कामाबद्दल सांगताना, एमजीएम खादी आणि पैठणी प्रशिक्षण आणि संशोधन केंद्राच्या संचालिका शुभा महाजन सांगतात की, "पैठणी विणणे हे काम सोपे नाही यासाठी तुम्हाला काही वेळ प्रशिक्षण घ्यावे लागते. डॉ. मोडक नियमितपणे आमच्या केंद्रात त्यांचे रुग्णालयातील काम आटपून येत आहेत. आमच्या केंद्रातील कर्मचारी त्यांना प्रशिक्षण देत असून डॉ. मोडक यांचा या कामापोटी चांगला प्रतिसाद आहे. येत्या काही महिन्यात त्यांची पैठणी पूर्ण होऊ शकते. या अशा पद्धतीने स्वतःच्या आईसाठी पैठणी विणणारा माझ्या बघण्यातला हा पहिलाच डॉक्टर आहे."
महत्वाच्या बातम्या :
- महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या हातात राज्य सरकारशी लढण्याचं एकमेव हत्यार म्हणजे, केंद्रीय तपास यंत्रणा : संजय राऊत
- Gulshan Kumar Murder : मारेकरी अब्दुल रौफ कोणत्याही दयेच्या लायक नाही, जन्मठेपेची शिक्षा कायम; मुंबई उच्च न्यायालयाचा फैसला
- Dilip Kumar Health Update : दिलीप कुमार यांची प्रकृती स्थिर, पुढील काही दिवस डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवणार