नाशिकमध्ये 'नो हेल्मेट नो एंट्री' मोहिमेअंतर्गत थेट प्राचार्यांवर गुन्हा दाखल
विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या नाशिकमधील प्राचार्यांवर आता कॅम्पसमध्ये फिरून विद्यार्थ्यांनी हेल्मेट आणलं आहे की नाही हे तपासण्याची वेळ आली आहे.
नाशिक : आजवर जो हेल्मेट परिधान करत नाही त्यावर कारवाई होताना तुम्ही बघितलं आहे. पण नशिकमध्ये विद्यार्थ्यांनी हेल्मेट परिधान केले नसल्याने थेट प्राचार्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी केलेल्या चुकी बद्दल शिक्षा देण्याची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्याच प्राचार्यवर आता विद्यार्थ्यांनी केलेल्या चुकीची शिक्षा भोगण्याची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या प्राचार्याबर आता कॅम्पसमध्ये फिरून विद्यार्थ्यांनी हेल्मेट आणलं आहे की नाही हे तपासण्याची वेळ आली आहे. त्याला कारण ठरलंय नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचा नो हेल्मेट नो एन्ट्री हा आदेश.
शहरातील शाळा महाविद्यालय, सरकारी कार्यालाय अशा प्रत्येक ठिकाणी ज्यांनी हेल्मेट परिधान केले नसेल त्यांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. तरी कोणी विना हेल्मेट आढळून आला तर त्या कार्यलयाच्या मालमत्ता अधिकाऱ्याला जबाबदार धरून त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा पोलीस आयुक्तांनी दिला होता. त्यानुसार नाशिकचे एचपीटी महाविद्यालय, आयटीआय, पंचवटी महाविद्यालय, पिन्याकल मॉल या चार ठिकाणी वाहतूक शाखेच्या भरारी पथकाला विना हेल्मेट दुचाकीस्वार आढळून आल्याने चारही ठिकाणच्या मालमत्ता अधिकाऱ्यांवर पोलीस अधिनियम कलम 131 ब नुसार करावाई करण्यात आली आहे. या कारवाई अंतर्गत आठ दिवसाचा तुरुंगवास आणि 1200 रुपयांच्या दंडाची तरतूद आहे.
पोलिसांच्या हेल्मेटसक्तीच्या कारवाईचे प्राचार्य स्वागत करत आहेत. पण त्यांच्यावर दाखल गुन्ह्याबाबत नाराजी व्यक्त होत आहे. प्राचार्यानी महाविद्यालयाचे व्यवस्थापन बघायचे की हेल्मेटसक्तीची अंमलबजावणी करायची. एखाद्या विद्यार्थी हेल्मेट परिधान करून आला नसेल तर त्याला समज दिली जाते. मात्र प्रवेश नाकारून त्याचे शैक्षणिक नुकसान कसे करणार हा प्रश्न प्राचार्य उपस्थित करत असून चोर सोडून संन्याशाला फाशी देणं ही कारवाई संयुक्तिक नसल्याची खंत व्यक्त केली आहे. तर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनीही पोलिसांचे कान टोचत कारवाईचा अतिरेक करू नका असा इशारा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या