सत्यजीत तांबेंना भाजपचा छुपा पाठिंबा, विखे समर्थकांकडून सोशल मीडियावर प्रचार
Nashik : नाशिक पदवीधर निवडणुकीत तांबेंना पाठिंबा देण्याचा स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा निर्णय, राधाकृष्ण विखे पाटलांचं मोठं वक्तव्य, तर पक्ष म्हणून भाजपची भूमिका अजूनही गुलदस्त्यात
Nashik Graduate Constituency : नाशिक पदवीधर निवडणुकीत पहिल्या दिवसापासूनच चर्चेत आगे. अनेक धक्कादायक राजकीय घडामोडी घडल्यामुळे नाशिकची राज्यभर चर्चा आहे. सत्यजीत तांबे यांच्या उमेदवारीवरुन विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु होते. सत्यजीत तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांना अनेक संघटनांनी पाठिंबा दिला आहे. आता भाजपाने सुद्धा छुपा पाठिंबा देत सत्यजीत तांबे यांच्या मागे उभे राहण्याची भूमिका घेतली आहे. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांनी सत्यजीत तांबे यांचा प्रचार सोशल मीडियातून सुरू केला आहे.
नाशिक पदवीधर निवडणुकीत उद्या (सोमवारी) मतदान होणार आहे. मतदानापूर्वीच गेल्या अनेक दिवसांपासून अनेक राजकीय घडामोडी या मतदारसंघात घडल्या आहेत. भाजपने कोणालाही जाहीर पाठिंबा अद्यापही दिलेला नाही आणि अशा परिस्थितीच राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समर्थकांनी आज सत्यजीत तांबे यांचे स्टेटस ठेवत सोशल मीडिया मधून पाठिंबा दिला आहे.. भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असे आदेश दिले आणि त्यानंतर आज विखे समर्थकांनी सत्यजीत तांबे यांना पाठिंबा दिल्याने मोठ्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
तांबे आणि विखे यांच्यामध्ये यापूर्वी अनेकदा राजकीय कुरघोडी झालेली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकित हा संघर्ष शिगेला गेला होता. काँग्रेसचे नेते व सत्यजीत तांबे यांचे मामा बाळासाहेब थोरात यांनी अद्यापही कोणती भूमिका जाहीर केली नाही. अशातच राधाकृष्ण विखे पाटील समर्थकांनी सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देत राजकीय कुरघोडीच केल्याचे दिसून येतंय. तांबेंना केलेली मदत ही भविष्यकाळात वेगळी राजकीय समीकरणे घडवण्यासाठी असेल, असं मत विखे समर्थकांनी बोलून दाखवले आहे.
सत्यजीत तांबे यांनी सुद्धा अनेक वेळा मला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा पाठिंबा असल्याचे सांगितलं होतं. गेल्या अनेक दिवसांपासून विविध संघटनांसोबत सर्व पक्षाचे कार्यकर्ते माझ्यासोबत आहेत. असाच दावा सत्यजीत तांबे यांनी केला आणि आज विखे समर्थकांनी दिलेला पाठिंबा यावरून बऱ्याच काही गोष्टी स्पष्ट होत आहेत.
भाजपाचे खासदार सुजय विखे यांनी भूमिपत्रांच्या पाठीशी राहावे अशी भावना बोलून दाखवली होती. त्याच अनुषंगाने आज विखे समर्थकांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे आगामी काळात पदवीधर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सत्यजीत तांबे कोणता निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले तर विखे परिवाराला दिलेला पाठिंबा ही सुद्धा नवीन राजकीय समीकरणांची नांदी ठरेल का? हे पाहण महत्वाचं आहे.