Nandurbar Lok Sabha Elections 2024 : नंदुरबार लोकसभेत डॉ.हीना गावित विजयाची हॅटट्रिक करणार? की गोवाल पाडवी वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार?
Nandurbar Lok Sabha Constituency : राज्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये हायव्होल्टेज मतदारसंघ म्हणून गणल्या जाणाऱ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात यंदा कोण बाजी मारणार, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
Nandurbar Lok Sabha Constituency : राज्यातील लोकसभा निवडणुकांमध्ये हायव्होल्टेज मतदारसंघ म्हणून गणल्या जाणाऱ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघात (Lok Sabha Elections 2024) यंदा कोण बाजी मारणार, याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कारण या मतदारसंघात डॉक्टर विरुद्ध वकील अशा दोन सुशिक्षित उमेदवारांमध्ये हा सामना रंगणार आहे. शिवाय यंदा या मतदारसंघात मतदानच्या टक्केवारीत देखील वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे या वाढत्या टक्केवारीचा फायदा भाजपच्या महायुतीची उमेदवार डॉ. हीना गावित (Heena Gavit) यांना विजयाची हॅटट्रिक मारण्यास उपयुक्त ठरतो. की कधीकाळी काँग्रेसचा (Congress) पारंपारिक बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या या मतदारसंघात विजय मोहर उमटवत गोवाल पाडवीं (Gowaal Padavi) आपल्या वडिलांच्या पराभवाचा वचपा काढणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हीना गावित विरुद्ध गोवाल पाडवींमध्ये थेट लढत
नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा पारंपारिक काँग्रेसचा बालेकिल्ला होता. 2014 च्या निवडणुकीत भाजपाने काँग्रेसच्या बालेकिल्लाला खिंडार पाडत नंदुरबार लोकसभा मतदारसंघावर आपला झेंडा फडकवला होता. भाजपा उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांचा पराभव केला होता. मात्र दहा वर्षानंतर नंदुरबार लोकसभा मतदारसंघात यावर्षी झालेल्या निवडणुकीत मोठ्या चुरशीची लढत पाहण्यास मिळत आहे काँग्रेसकडून नवखा चेहरा असलेले गोवाल पाडवी आणि भाजपा कडून विद्यमान खासदार हिना गावित यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आले आहे.
नंदुरबार मतदारसंघातील मतदारांचा कौल कुणाला?
या निवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये सरळ लढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. हिना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, तर गोवाल पाडवी यांच्या प्रचारासाठी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची जाहीर सभा नंदुरबार मध्ये झाली. नंदुरबार हा लोकसभा मतदारसंघ आदिवासी बहुल असून या मतदारसंघात आदिवासी मतदारांच्या अनेक समस्या आहेत. या भागात रस्ते, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि शेतीसाठी सिंचनासह अनेक मूलभूत समस्यांचा समावेश आहे. या मतदारसंघात यावर्षी मोठ्या प्रमाणात विद्यमान खासदारांच्या बाबतची नाराजी दिसून येत होती. महायुतीच्या मित्रपक्षांनीही भाजप उमेदवाराच्या विरोधात वेगळी चूल मांडल्याचे चित्र नंदुरबार लोकसभा मतदारसंघात होते. तर महाविकास आघाडीच्या वतीने सर्वसामान्य कार्यकर्ते आणि सर्व घटक पक्षाचे नेते एकत्र गोवाल पाडवी यांच्या प्रचारात दिसून आलेत. मात्र राज्यस्तरावरून एकही मोठा नेता प्रचारासाठी आला नसल्याचे चित्र होतं. तर दुसरीकडे भाजपाच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघात दोन सभा घेतल्यात.
मतदानाच्या टक्केवारीत 4 टक्क्यांनी वाढ
मतदारसंघाचा राजकीय विचार केल्यास या लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे त्यापैकी चार विधानसभा मतदारसंघ हे महायुतीच्या ताब्यात आहेत. 2019 मध्ये या मतदारसंघात 68 टक्के मतदान झाले होते. तर यावर्षी मतदानाची आकडेवारी चार टक्क्यांनी वाढली असून मतदान 72 टक्के झाले आहे. हे वाढलेले चार टक्के मतदान कुणाच्या फायद्याचे हा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. तर अनेक राजकीय हवे दावे सोडून धडगाव, अक्कलकुव्यात राजकीय हाडवैरी असलेले पराडके आणि पाडवी एकत्र झाल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे भाजपाचे अंतर्गत कलहाचे वातावरणही या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारासाठी अडचणीचे ठरू शकते. मात्र असे असले तरी यंदा या मतदारसंघातील लढतीत मोठी चुरस पाहण्यास मिळत आहे. त्यामुळे नेमका विजय कोणाचा होईल हे आता तरी सांगणे शक्य नसल्याची स्थिती नंदुरबार लोकसभा मतदारसंघात आहे.
मित्र पक्ष आणि पक्षांतर्गत नाराजी
नंदुरबार लोकसभा मतदार संघात भाजपचे नेते डॉ. विजयकुमार गावित आणि त्यांच्या कन्या खासदार डॉ. हीना गावित आणि जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ सुप्रिया गावित यांच्या कार्यपद्धतीवर पक्षांतर्गत आणि महायुतीच्या घटक पक्षात नाराजी आहे. मित्र पक्षांच्या विकास कामांना नेहमी कात्री लावण्याचा आरोप देखील झाला आहे. तर शिंदे गटाचे संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी जिल्ह्याच्या विकासासाठी टोलमुक्त असणारा खासदार द्यावा अशी मागणी केली आहे. मित्र पक्षांनी उमेदवार बदलाची मागणी करत उघड नाराजी व्यक्त केली आहे .त्याला भाजपांतर्गत एका गटाच पाठींबा असल्याची चर्चा असल्याने राजकीय वातावरण तापत आहे.
2014 ची परिस्थिती आणि पार्श्वभूमी
नंदुरबार लोकसभा मतदार संघ पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला होता. माणिकराव गावित यांनी सलग नऊ पंचवार्षिक या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. 2014 च्या निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश केलेल्या ज्येष्ठ नेते डॉ विजयकुमार गावित यांच्या कन्या डॉ. हीना गावित यांना उमेदवारी देण्यात आली. त्यांनी या मतदार संघात पहिल्यांदा भाजपला यश मिळवून दिले. 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसकडून के सी पाडवी यांना या मतदार संघात उमेदवारी देण्यात आली त्यांनी चांगली लढत दिली. राज्यात विजयी झालेल्या भाजपा उमेदवारांचे मताधिक्य लाखांच्या पुढे आसताना मात्र या मतदार संघात भाजपच्या उमेदवाराचा लीड कमी झाला होता या गोष्टींचा विचार करत काँग्रेसकडून निवडणूक रणनीती ठरवली जात असून त्यासाठी तयारी झाली आहे. या मतदार संघात खासदार डॉ. हीना गावित यांना पुन्हा उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित आहे. कारण त्या पंतप्रधान मोदींच्या गुड बुक मधील खासदार असल्याचे त्यांचे कार्यकर्ते सांगतात तर दुसरीकडे पक्षांतर्गत मोठी नाराजी असल्याचे दिसून येते. तर महायुतीच्या मित्र पक्षाच्या वतीने उमेदवार बदलण्याची मागणी करण्यात येत आहे .
नंदुरबार जिल्हा पहिल्यापासून काँगेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र 2014 च्या मोदी लाटेत काँग्रेसच्या या किल्ल्याला सुरंग लागला. भाजपच्या डॉ. हीना गावित खासदार झाल्या त्यांनतर 2019 निवडणुकीत पुन्हा विजयी झाल्या. मात्र 2019 सालच्या निवडणुकीत 2014 च्या निवडणुकीपेक्षा त्यांचे मताधिक्य कमी झाले होते. या मतदार संघात 2024 च्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. खासदार डॉ. हीना गावित यांच्याबद्दल महायुतीतील मित्रपक्षांची नाराजी आणि पक्ष अंतर्गत असलेली धुसफुस याचा सामना करावा लागणार आहे.या मुळे या वर्षी होणारी निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.
कोणत्या पक्षाचे किती आमदार?
नंदुरबार लोकसभा मतदार संघाचा विचार केल्यास या मतदार संघात सहा विधानसभा मतदार संघाचा समावेश आहे. नंदुरबार जिल्ह्यातील चार तर धुळे जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदार संघाचा यामध्ये समावेश आहे. यात अक्कलकुवा आणि नवापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार आहेत तर साक्री मतदार संघात शिंदे गटाचा आमदार आहे .नंदुरबार, शहादा आणि शिरपूर विधानसभा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहेत. नंदुरबार मतदार संघात भाजपाचे नेते आणि विद्यमान मंत्री डॉ. विजयकुमार गावित शहादा तळोदा मतदारसंघात भाजपाचे राजेश पाडवी आमदार आहेत. तर शिरपूर मतदारसंघात भाजपाचे काशिनाथ पावरा हे आमदार आहेत. अक्कलकुवा विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के सी पाडवी हे आमदार आहेत. नवापूरमध्ये आमदार शिरीष नाईक हे आमदार आहेत. तर साक्री विधानसभा मतदार संघात शिंदे गटाच्या मंजुळा गावित या आमदार आहेत पक्षीय बलाचा विचार केल्यास या लोकसभा मतदार संघात महायुतीच्या बोलबाला दिसून येत आहे. यामध्ये सहा पैकी चार मतदार संघ महायुतीच्या ताब्यात आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या