Nanded : माजी मंत्री डी.पी.सांवंत यांच्या घरात दिवसाढवळ्या बंदुकधारी गुंड घुसले, 50 हजार रुपयांची मागणी करत नोकराला मारहाण
Nanded Crime : डीपी सावंत यांच्या घरातील नोकराला या गुंडानी मारहाण केली, त्यामध्ये त्या नोकराच्या डोक्याला मोठी दुखापत झाली आहे.
नांदेड : राज्याचे माजी मंत्री डीपी सावंत यांच्या घरातमध्ये बंदूकधारी शिरले आणि त्यांनी 50 हजार रुपयांची मागणी केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली आहे. या गुंडांनी घरातील नोकराला मारहाण केल्याचं समोर आलं आहे. मात्र या सर्व प्रकरणात डीपी सावंत हे सुखरुप असल्याचं समजतंय. डीपी सावंत हे काँग्रेसचे माजी मंत्री असून ते अशोक चव्हान यांचे निकटवर्तीय आहेत.
आज दुपारच्या वेळी नांदेड शहरातील शिवाजी नगर परिसरातील आणि राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरासमोरील माजी मंत्री डी. पी. सावंत यांच्या घरात दोन बंदूकधारी गुंडांनी घुसखोरी केली. या गुंडांनी त्यांच्याकडे 50 हजाराची मागणी केली. दरम्यान, बंदुक घेऊन किचनमध्ये शिरत या गुंडांनी नोकराला मारहाण केली असून त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. सदर गुंड घरात घुसले त्यावेळेस सावंत हे घरातच अराम करत होते, यावेळी गुंडांनी बंदुकीचा धाक दाखवत 50 हजार रुपयांची मागणी केलीय.
माजी मंत्री डीपी सावंत यांच्या घरी दोन बंदुकधारी का शिरले, त्यांचा उद्देश काय होता याबद्दल अधिक माहिती समजू शकली नाही. नांदेड पोलीस याबाबत अधिकचा तपास करत आहेत.
डीपी सावंत यांच्या डोक्याला बंदुक लावली
दरम्यान, डीपी सावंत यांच्या घरी शिरलेले हे दोन बंदुकधारी गावगुंड असल्याची माहिती समोर येत आहे. डीपी सावंत दुपारी आराम करत असताना हे गुंड घरात शिरले, त्यांनी त्यांच्या नोकराला मारहाण केली. यावेळी सुरू असलेल्या गोंधळामुळे डीपी सावंत जागे झाले, तर या गुंडांनी त्यांच्या डोक्याला बंदुक लावत त्यांच्याकडून 50 हजार रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास जीवे मारण्याचीही धमकी दिली.
नांदेडमध्ये गेल्या काही दिवसांपासून कायदा आणि सुव्यस्थेचे धिंडवडे निघाले असून व्यावसायिक संजय बियांनी यांना दिवसाढवळ्या गोळ्या घालण्यात आल्या. तसेच नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात गावठी बंदुका असल्याचीही माहिती समोर येत आहे.