(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यात लढला, आता मुलगा-सुनेकडून होतोय शारीरिक अन् मानसिक छळ, स्वातंत्र्यसैनिकांची व्यथा
Nanded : थिजलेले डोळे अन् वाळल्या देहावर एक सुन्न बधिरता..., आपल्या मृत्यूची वाट पहाणारा हा पहिला स्वातंत्र्यसैनिक असेल.
नांदेड : शहरातील रस्त्यावर फिरताना एक वृद्ध गृहस्थ दिसले. म्हातारे गृहस्थ खूप थकून गेलेले होते, बोलताना गळा भरून येत होता. ते होते नांदेड शहरातील यशवंत नगर परिसरात वास्तव्यास असणारे, मराठवाडा मुक्तीसंग्राम लढ्यातील थोर स्वातंत्र्य सैनिक आणि सेवा निवृत्त पोलीस निरीक्षक बालाजीराव नागोराव जोशी.
पायात चप्पल, अंगावर साधा मळकट असणारा सदरा, खांद्यावर दस्ती, अंगावर आणि तोंडावर मार लागलेल्या खुणा. त्यांची ही अवस्था पाहून कुणालाही वाईट वाटेल. कधी काळी या व्यक्तीने मराठवाडा मुक्ती संग्रामात आपले अनमोल योगदान दिले होते. त्याच्या वृद्धपकाळात त्याची ही अवस्था झाली.
नाव बालाजीराव नागोराव जोशी ,वय 97 वर्ष, मुक्तीसाठी लढा दिलेला. पुढे पोलीस खात्यात नोकरी, आता निवृत्ती. पेन्शन 40 हजार रुपये मिळतात, आर्थिक अडचण नाही. काल सुनेने आणि मुलाने मारहाण केली. भर उन्हात उभे केले, दिवसभर काही खायला दिले नाही. मुलगा व सून हे दोघे मिळून मारहाण करतात. तर स्वत: काही करून खावं तर गॅस संपलेला होता. त्यात गॅस सिलेंडरवाल्याला सून घरात येऊ देत नाही. त्यामुळे यांनी मरावे याची सून व मुलगा वाट पहातायत. पण मरण येत नाही. त्यामुळे नांदेडच्या रस्त्यावर दिवसभर भटकत होते. तर रस्त्यात काही कुठंतरी थोडं भेटलं तर खायचं.
स्वातंत्र्य सैनिक असणाऱ्या जोशी काकांना तीन मुलं आहेत. त्यातील दोघे बाहेर आहेत. तर एक मुलगा येथे वास्तव्यास आहे. स्वतः मेहनतीने बांधलेल्या घरात रहतात, पण घर त्यांच्या नावावर नाही. पोरगा असं करेल हे ठाऊक नव्हतं असं ते म्हणाले, त्यांची बायको जाऊन खूप वर्ष झालीत. मोठा नातू आहे घरी, तो काही मारत झोडत नाही. पण मायबापाला काही बोलतही नाही.
बाजूनं वाहनांची वर्दळ, फिरणारी लोकं, मध्यमवयीन, वृद्ध बायामाणसं होती. त्यातलाच हा एक वृद्ध, आपल्या मरणाची वाट पहाणारा, पैसा आहे पण प्रेम अन् माया काही नाही. एक भयंकर नकोसे वाटणारे वातावरण होतं.
पोलीस तक्रार नाही केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. पोलीस आले होते, काहीतरी थातूरमातूर चौकशी केली आणि पुन्हा पहिल्यासारखे चालू झाले.
एका स्वातंत्र्य सैनिकाची ही अवस्था पाहून मन सुन्न झालं. मुलाने आणि सुनेने मारल्याने काकांचे बोट फुटलेले होते. तर पायजम्यावर रक्त सांडून, वाळून गेलेले होते. थिजलेले डोळे, एक सुन्न बधिरता वाळल्या देहावर पसरलेली होती. आपल्या मृत्यूची वाट पहाणारा हा पहिला स्वातंत्र्य सैनिक असेल.