जिल्हाधिकारी परिसरात घोडा बांधण्याची परवानगी मागणाऱ्या अधिकाऱ्याचं पुढं काय झालं?
दुचाकीवरुन येण्यास त्रास होत असल्याने जिल्हाधिकारी परिसरात घोडा बांधण्याची परवानगी देण्यासाठी एका अधिकाऱ्याने नांदेड जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला आहे.
नांदेड : कोण कधी कशाची मागणी करेल याचा काही नेम नाही. अशीच एक विचित्र मागणी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली. नांदेड जिल्हाधिकारी कार्यालतील एका अधिकाऱ्याने ही मागणी केली. त्यांनी ऑफिसला येण्यासाठी घोड्याची योजना आखली. त्यानुसार त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी परिसरात घोडा बांधण्याची परवानगी मागितली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
Maharashtra govt official urges Nanded district collector to allow him to tie his horse in collectorate campus, says cannot use two-wheeler owing to problem in spine
— Press Trust of India (@PTI_News) March 3, 2021
नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजनेचे सहाय्यक लेखाधिकारी असलेल्या सतीश पंजाबराव देशमुख यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, मला पाठीच्या कण्याचा त्रास असल्याने दुचाकीवरुन येताना त्रास होत आहे. यावर उपाय म्हणून मी घोडा खरेदी करण्याचे ठरवले आहे. जेणेकरुन मला वेळेत घोड्यावर येणं शक्य होईल. त्यामुळे घोडा बांधण्याची मला परवानगी मिळावी. देशमुख यांनी पाठवलेल्या पत्राला पोहोच देण्यात आली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी काय निर्णय देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. मात्र, ही मागणी आता मागे घेण्यात आली आहे.
अचानक मागणी मागे.. सहाय्यक लेखाधिकारी असलेल्या सतीश पंजाबराव देशमुख यांच्या मागणीचा अर्ज सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहे. दरम्यान, सहाय्यक लेखाधिकारी देशमुख यांनी आणखी एक अर्ज जिल्हाधिकाऱ्यांना लिहून ही मागणी मागे घेत असल्याचे सांगितले आहे. मात्र, त्यांनी असा अर्जा का केला? आणि तो नंतर मागे का घेतला? ही बाब मात्र गुलदस्त्यात राहिली आहे. पण, त्यांच्या एका अर्जामुळे सोशल मीडियावर मात्र चर्चांना उधाण आले आहे.