(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महिला अत्याचार रोखण्यासाठी 'भोकर पॅटर्न' आवश्यक; केवळ 62 दिवसात खटला निकाली आणि आरोपीला फाशी
Nanded : 'दिवशी अत्याचार' प्रकरणात भोकर न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत 62 दिवसात आरोपीला फाशी सुनावली होती. खटल्यांचं काम असं फास्टट्रॅक चालवून निकाल लावला तर महिला अत्याचारावर अंकुश ठेवता येईल.
नांदेड : राज्यात साकीनाका अत्याचार प्रकरण आणि त्यामागोमाग एकेक अत्याचाराची प्रकरणं घडताना दिसत आहेत. सातत्याने घडणाऱ्या या घटनांवरुन गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचं दिसून येतंय. न्यायालयीन प्रक्रिया एवढी गुंतागुंतीची आहे की गंभीर अत्याचाराच्या प्रकरणातही आरोपीला शिक्षा सुनावण्यास मोठा कालावधी लागतोय. अशा वेळी भोकर येथील दिवशी अत्याचार प्रकरणात अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल दिशादर्शक ठरतो. भोकर येथील दिवशी अत्याचार प्रकरणात भोकर अतिरिक्त सत्र न्यायालयाने 62 दिवसात खटला निकाली काढून आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली होती.
नांदेड जिल्ह्यातील दिवशी या गावात 20 जानेवारी 2021 या दिवशी एका पाच वर्षीय चिमुकलीवर घरगड्याने पाशवी अत्याचार करून तिची निघृण हत्या केली होती. या प्रकरणी भोकर पोलिसात पोक्सो अॅक्ट व इतर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
भोकर पोलिसांनी या घटनेत तात्काळ कार्यवाही करत आरोपीस ताब्यात घेऊन, सदर घटनेचा 12 दिवसात संपूर्ण तपास केला व पुरावे गोळा केले. या प्रकरणात 21 दिवसात चार्टशीट दाखल करण्यात आली होती. त्यानुसार सदर प्रकरण भोकर न्यायालयाच्या समक्ष घेऊन दाखल 62 दिवसात माननीय न्यायालयाने निकाल देत आरोपीस फाशीची शिक्षा सुनावली होती.
नांदेड जिल्ह्यातील दिवशी अत्याचार प्रकरणात पोलीस, न्यायपालिका, आरोग्य विभाग यांच्या समन्वयाने हे प्रकरण जलदगतीने घेऊन 62 दिवसात खटला निकाली निघून आरोपीस शिक्षा झाली होती. या प्रकारे जुन्या कायद्याचीच प्रभावी अंमलबजावणी केली तर संबंध महाराष्ट्रातील खटले निकाली निघतील.
संपूर्ण महाराष्ट्रातील अत्याचाराचे खटले जर पोलीस, न्यायपालिका, आरोग्य विभाग यांचा समन्वय साधून, न्यायालयात फास्टट्रॅक पद्धतीने चालविले गेले तर असे असंख्य खटले मार्गी लागतील आणि अनेक अत्याचारित स्त्रियांना न्याय मिळेल.
महत्वाच्या बातम्या :