'हैदराबाद मुक्ती संग्राम दिना'निमित्त नांदेडमध्ये 75 हजार नागरिकांचे लसीकरण होणार, जिल्हा प्रशासनाचा संकल्प
Nanded : जिल्हा प्रशासनाने विविध संस्थाच्या माध्यमातून लसीकरणासाठी व्यापक मोहिम हाती घेतली असून सार्वजनिक गणेश मंडळानाही यात पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे.
नांदेड : भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हैदराबाद मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यात 17 सप्टेंबर रोजी 75 हजार लोकांच्या लसीकरणाचा संकल्प जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाने विविध संस्थाच्या माध्यमातून लसीकरणासाठी व्यापक मोहीम हाती घेतली असून सार्वजनिक गणेश मंडळानाही यात पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे. आरोग्य विभाग, महानगरपालिका, विविध सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमातून 75 हजार लसीकरणाचा हा संकल्प पूर्ण करु असा विश्वास नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातील या लसीकरण मोहिमेसाठी शहरी व ग्रामीण असे दोन भाग करण्यात आले असून महानगरपालिका, नगरपरिषदा, ग्रामीण आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्ह्यातील आरोग्य विभागातर्फे याचे नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळाशी या पूर्वीच समन्वय साधून ठिकठिकाणी लसीकरण शिबिराचे ही आयोजन केले गेले आहे.
महानगरपालिका पातळीवर सर्व वार्डनिहाय सुक्ष्म नियोजन करुन 17 सप्टेंबर रोजी 10 हजार, शहरी कार्यक्षेत्रातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि नगरपालिका कार्यक्षेत्रातील इतर शासकीय रुग्णालय याठिकाणी 32 हजार डोस लसीकरण करण्याच्या दृष्टीने संबंधित तहसिलदार, गटविकास अधिकारी, वैद्यकीय अधिक्षक, मुख्याधिकारी यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ग्रामीण भागातील 68 प्राथमिक केंद्राच्या अंतर्गत किमान 750 लसीकरण या सुत्रानुसार 51 हजार डोस लसीकरणाची जबाबदारी प्राथमिक आरोग्य केंद्राकडे सुपूर्द केली आहेत.
कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सदर व्यापक लसीकरणाचा संकल्प जाहीर करण्यात आला असून जिल्ह्यातील विविध संस्था आणि नागरिकांनी या मोहिमेला उत्स्फुर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Nitin Gadkari : गडकरी घेणार 'दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे'च्या कामाचा आढावा; दोन दिवसांचा दौरा आजपासून सुरु
- Elon Musk's SpaceX Inspiration 4 : इलॉन मस्क यांच्या SpaceX नं रचला इतिहास, पहिल्यांदाच घडवली चार सामान्य लोकांना अंतराळाची सफर
- Ganeshotsav 2021 : विसर्जनासाठी आलेल्या 3744 भाविकांची कोरोना टेस्ट; 2 जण पॉझिटीव्ह, ठाणे महापालिकेची माहिती