(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दलित पँथर पुन्हा एकदा डरकाळी फोडण्याच्या तयारीत, राज्यभर बैठकांचं सत्र सुरू
Nagpur News Update : दलित पँथर संघटना पुन्हा एकदा डरकाळी फोडण्याच्या तयारीत आहे. संघटनेकडून राज्यभर बैठकांचं आणि मेळाव्यांचं आयोजन करण्यात येत आहे.
Nagpur News Update : राज्यात आक्रमक बाण्याने काम करणारी दलित पँथर संघटना (Dalit Panther organization) पुन्हा एकदा डरकाळी फोडण्यास तयार होत आहे. सत्तरच्या दशकात महाराष्ट्राच्या समाजकारण आणि राजकारणात डरकाळी फोडून "जशास तशे उत्तर देऊ" अशी भूमिका या संघटनेची होती. आता पुन्हा एकदा त्याच भूमिकेतून संघटना आपले काम सुरू करणार असल्याची माहिती मिळत आहे. विदर्भातील काही जुन्या पॅंथर्सनी एकत्र येत दलित पँथरच्या पुनर्बांधणीचा संकल्प केला आहे. त्याच अनुषंगाने विदर्भात आणि महाराष्ट्रात ठिकठिकाणी बैठकांचे सत्र सुरु झाले आहे. दलित पॅंथरचे अनेक जुने आणि वयोवृद्ध कार्यकर्ते ठिकठिकाणी कामाला लागले आहेत.
विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात, मोठ्या तालुक्यात बैठका सुरु आहेत. त्यामध्ये जुने पॅंथर्स आपल्या संघटनेला पुनर्जीवित करण्यासाठी धडपड करत आहे. एखाद्या ठिकाणी बैठक निश्चित झाल्यानंतर पंचक्रोशीतील सर्व जुन्या पॅंथर्सला त्या ठिकाणी बोलावले जात असून बदलत्या काळात पुन्हा एकदा दलित पँथर या संघटनेच्या आवश्यकतेवर चर्चा केली जात आहे. 'आज कायद्याचं राज्य असले तरी आणि दलित अत्याचाराच्या घटना पहिल्या सारख्या होत नसल्याचे वाटत असले तरी आता दलित अत्याचाराच्या स्वरूपात बदल झाल्यामुळे पुन्हा एकदा लढाऊ संघटनेची गरज असल्याचे दलित पँथर पुनर्घटन प्रक्रियेचे संयोजक विनोद मेश्राम यांनी म्हटले आहे. '
दलित पँथरची पुर्नबांधनी होत असल्याची माहिती मिळताच अनेक वृद्ध पँथर कार्यकर्तेही जोमाने कामाला लागले आहेत. काळ बदलला असला, प्रश्नांचे स्वरूप बदलले असले तरी त्याकाळी दलित पँथरच्या आक्रमक बाण्यामुळे मिळालेला समाजाचा पाठिंबा आता ही मिळेल असे दलित पँथरचे ज्येष्ठ नेते आर. एम. पाटील यांनी म्हटले आहे.
दलित पँथरचा इतिहास आणि कार्य
1972 ला दलितांमधील सुशिक्षित तरुण नामदेव ढसाळ, ज. वी. पवार, राजा ढाले, अविनाश महातेकर, भाई संगारे आणि इतर अनेकांनी एकत्रित येऊन दलित पँथरची स्थापना केली होती. तेव्हा जागतिक मंदी आणि त्यामुळे महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या रोजगार आणि आर्थिक परिस्थितीवर झालेला विपरीत परिणाम, संसदेत इलिया पेरूमल समितीचा अहवाल, महाराष्ट्रातील दलित आताचाराच्या काही घटना. या सर्वांमुळेच दलित पँथरची स्थापना झाली होती.
दलित पॅंथरवर अमेरिकेतील 1966 च्या ब्लॅक पॅंथर चळवळीचा परिणाम होता. त्यामुळेच दलित पॅंथर या संघटनेसाठी ब्लॅक पॅंथरचे "tit for tat" म्हणजे "जशाच तसे" असे आक्रमक घोषवाक्य स्वीकारण्यात आले होते. त्याकाळात दलित पँथरने महाराष्ट्रात अनेक आक्रमक आंदोलने केली. त्यात वरळीच्या दंगलीनंतरचे आंदोलन, इंदापूरमधील बावड्यात झालेल्या दलित बहिष्कार विरोधातील आंदोलन प्रमुख आहे. मुंबईत शिवसेनेच्या विरोधात केलेलं गीता दहन आंदोलन आणि महाविद्यालयीन तरुणांसाठी केलेला कॅपिटेशन फी संदर्भातील आंदोलनाने दलित पँथरची लोकप्रियता वाढविली होती. दलित पँथरने आक्रमकपणे मागणी करत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अप्रकाशित साहित्य प्रकाशित करण्यासाठी सरकार भाग पाडले होते. त्यामुळेच समग्र आंबेडकराचे 24 खंड, मूकनायक, बहिष्कृत भारत हे साहित्य प्रकाशित झाले असे म्हटले जाते.
सत्तर आणि ऐंशीच्या दशकात दलित पँथरचा एक विशेष जाहीरनामा होता. दलित पँथरचे सर्व आक्रमक आंदोलन आणि चळवळ त्यानुसारच चालायचे. आता पुर्नबांधणीच्या प्रक्रियेनंतर दलित पँथरला दिशा देण्यासाठी त्याच जाहीरनाम्याचा स्वीकार करण्याचे ठरविण्यात आले आहे. दरम्यान, 1984 च्या सुमारास ज्या रिपब्लिकन पक्षातील विविध गटांच्या ऐक्याच्या नावाखाली दलित पँथर संघटना विसर्जित करण्यात आली होती त्याच रिपब्लिकन नेत्यांनी दलित तरुणांची घोर निराशा केली. ते त्यांच्या प्रश्नांसाठी लढले नाहीत. उलट त्या सर्वानी आपापले राजकीय संस्थान उभे केले असे अनेक पँथर्सला वाटत आहे. त्यामुळे यंदा रिपब्लिकन नेत्यांपासून काही अंशी दूर राहण्याचे ठरविण्यात आले आहे, अशी माहिती दलित पँथरचे कार्यकर्ते प्रा. विनोद राऊत यांनी दिली.
दलित पँथरच्या सध्याच्या प्रक्रियेत आणि त्यानंतरही आम्ही कुठल्या देखील राजकीय पक्षाच्या जवळ जाणार नाही. शिवाय कोणत्याही राजकीय पक्षाला जवळ देखील करणार नाही असा निर्धार करण्यात आला आहे. रिपब्लिकन पक्षाच्या विविध गटांनी एकत्रितरित्या एकोप्याने आमच्या मंचावर येण्याचे ठरविले तर आम्ही त्यांचं स्वागत करू, अन्यथा आमचा त्यांना जय भीम, असे दलित पँथरचे संयोजक विनोद मेश्राम यांनी म्हटले आहे.