गंभीर आरोपांच्या फैरीनंतर नागपुरात फडणवीस-अनिल देशमुख एकाच मंचावर आले, पण अंतर राखून बसले
Nagpur News : माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक युद्ध रंगल्यानंतर एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आज पहिल्यांदाच एका मंचावर आले आहेत.
Nagpur News नागपूर : गेल्या काही दिवसांपासून राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि सध्याचे विद्यमान गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यामध्ये मोठे शाब्दिक युद्ध रंगले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत अतिशय गंभीर आरोप करत निशाणा साधला होता. त्यानंतर हे दोन्ही नेते आज एका शासकीय उद्घाटन सोहळ्याच्या निमित्याने पहिल्यांदा एकाच मंचावर आमोरासामोर आले आहेत. नागपूर (Nagpur News) येथील सुरेश भट सभागृहामध्ये हा उद्घाटनाचा सोहळा संपन्न होतं आहे. नागपूर जिल्ह्यातील तीन आरोग्य केंद्रांचा नागपूर शहराचे पालकमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण आज होत आहे.
या तिन्ही आरोग्य केंद्रांचा वर्चुअल पद्धतीने आज लोकार्पण सोहळा होत आहे. या तीन पैकी दोन आरोग्य केंद्र हे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदारसंघातील आहे. त्याच पार्श्वभूमीवर अनिल देशमुख हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मात्र या कार्यक्रमाच्या निमित्याने मंचावर देखील या दोन्ही नेत्यांमधील नाराजीनाट्य उघडपणे दिसून आले आहे.
मंचावरही दोन्ही नेत्यांमधील नाराजीनाट्य उघड
कार्यक्रमाची सुरुवात होत असताना सर्व मान्यवर एकाच वेळेस मंचावर उपस्थित झाले. मात्र, अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये अद्याप तरी कुठलेही बोलणे अथवा तसा प्रयत्न झाल्याचे दिसून आलेले नाही. मंचावर स्थानपन्न होत असतानाही या दोन्ही नेत्यांमध्ये तीन इतर मान्यवरांचे अंतर असल्याचे बघायला मिळाले. तर या मंचावर भाजपच्या नेत्यांसोबत अनिल देशमुख यांचे जुजबी वार्तालाप झाला आहे.
मात्र महत्त्वपूर्ण बाब म्हणजे या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस मोबाईल वाटप करायला उभे राहताच मंचावर सगळे नेते ताडकन उभे राहिलेत. मात्र अनिल देशमुख हे जागच्या जागीचं बसून असल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे दोन्ही नेत्यातील नाराजी नाट्य हे या निमित्ताने प्रकर्षाने दिसून आले आहे.
आजी-माजी गृहमंत्री एकाच मंचावर
नागपूर जिल्ह्यातील झिल्पा, भोरगड आणि घाटपेंढरी या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वर्चुअल (ऑनलाईन) लोकार्पण सोहळा संपन्न होत आहे. आज उद्घाटन होत असलेल्या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी झिल्पा आणि भोरगड या दोन प्राथमिक आरोग्य केंद्र राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या काटोल मतदारसंघातील आहेत. त्यामुळे ज्या सुरेश भट सभागृहातून प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ऑनलाइन उद्घाटन फडणवीस करणार आहे, त्या सुरेश भट सभागृहामध्ये अनिल देशमुख हेही उपस्थित झाले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये गेले काही दिवस एफीडेविट आणि पेनड्राईव्हच्या मुद्द्यावरून शाब्दिक वाद सुरू आहे. त्यानंतर पहिल्यांदाच दोन्ही नेते एका कार्यक्रमात एका मंचावर समोरासमोर आले आहेत. मात्र मंचावर दोन्ही नेत्यांमध्ये काहीशी अस्वस्थाता दिसून आली आहे. आजचा कार्यक्रम जरी शासकीय असला तरी दोन्ही आजी-माजी गृहमंत्री समोरासमोर आल्याने राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
हे ही वाचा