एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur Mayor | नागपूर महानगरपालिकेत भाजपने महापौर पद सव्वा-सव्वा वर्षासाठी विभागले
विधानसभा निवडणुकीत भाजपला बसलेला फटका महापालिका निवडणुकीत बसू नये याचीही काळजी भाजपने घेतली आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज भाजपतर्फे अर्ज दाखल करण्यात आले असून 11 नोव्हेंबरला निवडणूक घेण्यात येणार आहे.
नागपूर : नागपूर महानगरपालिकेत पुढील अडीच वर्षांसाठी महापौर पद सव्वा - सव्वा वर्षासाठी विभागण्यात आले आहे. पहिले सव्वा वर्ष संदीप जोशी तर नंतरचे सव्वा वर्ष दयाशंकर तिवारी हे महापौर असतील, असा निर्णय आज भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. महापौर पदासाठी झालेल्या सोडतीत नागपूर महापालिकेचे महापौर पद खुल्या वर्गासाठी जाहीर झाले. तेव्हापासूनच नागपूर महापालिकेचे महापौर कोण असणार याबाबत सगळ्यांनाच उत्सुकता होती. 149 नगरसेवक असलेल्या नागपूर महापालिकेत भाजपचे 106 नगरसेवक असल्याने महापौर हा भाजपचाच असणार एवढे निश्चित होते. मात्र भाजपतर्फे महापौरपदी कुणाची वर्णी लागणार हा चर्चेचा विषय होता.
भाजपने पुढील अडीच वर्षाचा कालावधी सव्वा वर्षात विभागून दोन महापौर देण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी पहिले सव्वा वर्ष पालिकेतील विद्यमान सभागृह नेते संदीप जोशी तर त्यानंतरचे सव्वा वर्ष पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आणि माजी स्थायी समिती सभापती दयाशंकर तिवारी हे राहणार आहेत. तसेच उपमहापौर पदही सव्वा वर्षांसाठी विभागण्यात आले असून पहिले सव्वा वर्ष मनीषा कोठे यांच्याकडे तर त्यानंतरचे सव्वा वर्ष उपमहापौर कोण असणार हे नंतर ठरवण्यात येणार आहे. तसेच सभागृह नेते (सत्तापक्ष नेते) पदावर संदीप जाधव यांची वर्णी लागणार आहे.
संदीप जोशी हे भाजपचे महापालिकेतील ज्येष्ठ नगरसेवक असून लघु उद्योग विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत. शिवाय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणूनही ओळखले जातात. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघात प्रचाराची जबाबदारी ही संदीप जोशी यांच्यावरच होती. तर दयाशंकर तिवारी हे देखील भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असून माजी स्थायी समिती सभापती राहिले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत हिंदी भाषिकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून पश्चिम नागपूर मतदारसंघातून भाजपच्या उमेदवारीसाठी दावेदारीही केली होती. परंतु पक्षाने त्यांची उमेदवारी नाकारली होती. पक्षामध्ये कुठलाही गटबाजी नसून सर्वच नेत्यांना संधी मिळावी म्हणून सव्वा-सव्वा वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आल्याची माहिती संदीप जोशी यांनी दिली.
विधानसभा निवडणुकीत हिंदी भाषिकांचा फटका भाजपला बसला होता. त्यामुळे पुढील सव्वा वर्षासाठी दयाशंकर तिवारी यांच्या रूपात हिंदी भाषिक महापौर देऊन हिंदी भाषिक मतदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत भाजपला बसलेला फटका महापालिका निवडणुकीत बसू नये याचीही काळजी भाजपने घेतली आहे. महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज भाजपतर्फे अर्ज दाखल करण्यात आले असून 11 नोव्हेंबरला निवडणूक घेण्यात येणार आहे.
महापालिकेतील पक्षीय बलाबल -
भाजप - 106
काँग्रेस - 29
बहुजन समाज पक्ष - 10
शिवसेना - 02
राष्ट्रवादी - 01
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement