एक्स्प्लोर
Advertisement
स्वसंरक्षणासाठी तडीपार गुंडाचा प्रतिकार, नागपुरात कुटुंबाला अटक
अखिल वांद्रेची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून मे महिन्यात पोलिसांनी त्याला नागपुरातून तडीपार करत वर्ध्याला पाठवलं. मात्र स्थानिक पोलिसांच्या मदतीने अखिल सातत्याने नागपुरातच फिरत राहायचा.
नागपूर : नागपुरात तडीपार गुंडाने पूर्ववैमनस्यातून काकाच्या कुटुंबावर हल्ला केला, मात्र त्याचा प्रतिकार करताना गुंडच जखमी झाला. परंतु गुंडाला गजाआड करण्याऐवजी पीडित कुटुंबावर गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे पोलिसांविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. नागपूरच्या जयभीम नगरमधील गल्ली नंबर 3 मध्ये मध्यरात्री ही घटना घडली.
अखिल वांद्रेची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहून मे महिन्यात पोलिसांनी त्याला नागपुरातून तडीपार करत वर्ध्याला पाठवलं. मात्र स्थानिक पोलिसांच्या मदतीने अखिल सातत्याने नागपुरातच फिरत राहायचा. बुधवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास अखिल वांद्रे आणि त्याच्या पाच ते सहा सहकाऱ्यांनी अखिलचे काका सुरेश वांद्रे यांच्या घरावर हल्ला केला.
घराच्या दारावर लाथा मारत दगडफेक करुन दार तोडण्याचे प्रयत्न केले. सुरेश वांद्रे आणि त्यांचे कुटुंबीय घाबरलेल्या अवस्थेत घराबाहेर निघताच अखिल आणि त्याच्या सहकाऱ्यांनी सुरेश वांद्रेंवर हल्ला चढवला. स्वसंरक्षणासाठी सर्व वांद्रे कुटुंबिय आणि शेजाऱ्यांनी मिळून अखिलचा जोरदार प्रतिकार केला. हल्ल्यात अखिल जखमी झाला. परिसरातील नागरिक आपल्यावर हल्ला करतील, या भीतीने गुंडांनी तिथून पळ काढला.
जो गुंड नागपुरातून तडीपार करण्यात आला होता, तो सातत्याने नागपुरातच कसा काय राहायचा, वारंवार जयभीम नगरात येऊन लोकांना कसं धमकावयाचा, तडीपार गुंडाला नागपुरात नियमबाह्य पद्धतीने राहण्यात पोलिसच मदत करत होते का, असे अनेक प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केले आहेत.
'एबीपी माझा'ने या संदर्भात अजनी पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना विचारलं असता अखिल वांद्रे तडीपार असतानाही नागपुरात राहत असल्याचं त्यांनी मान्य केलं. मात्र त्यासंदर्भात कॅमरासमोर बोलण्यास त्यांनी नकार दिला.
धक्कादायक म्हणजे, काल रात्रीच्या घटनेसंदर्भात अजनी पोलिस स्टेशनमध्ये सुरेश वांद्रे, त्यांची पत्नी आणि मुलगा या तिघांविरोधात गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली गेली. तडीपार गुंडावर पोलिसांनी योग्य वेळी कारवाई न केल्यामुळेच एक सामान्य कुटुंब गुन्हेगार ठरल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement