सांगलीतील शिराळा येथील नागपंचमी उत्सवाला कोरोनाचं ग्रहण, नागपंचमी साध्या पद्धतीने साजरी
नागपंचमी उत्सवाची शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खंडीत झाली आहे. मात्र शिराळामधील नागरिकानी देखील वन विभाग आणि पोलिसाच्या आवाहनास प्रतिसाद देत शांततेने आणि घरीच प्रतिकात्मक नागाचे पूजन करत साजरी केली.
सांगली : बत्तीस शिराळामध्ये यंदा नागपंचमी सणाच्या आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतली गेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज साजऱ्या होणाऱ्या नागपंचमीला शिराळामधील अंबामाता मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. मंदिरात फक्त 5 लोकांना पूजेसाठी परवानगी तर पालखी सोहळ्यासाठी 10 लोकांना परवानगी दिली गेलीय. नागपंचमी उत्सवाची शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर खंडीत झाली आहे. मात्र शिराळामधील नागरिकानी देखील वन विभाग आणि पोलिसाच्या आवाहनास प्रतिसाद देत शांततेने आणि घरीच प्रतिकात्मक नागाचे पूजन करत साजरी केली.
सांगली जिल्ह्यातील शिराळा गावामध्ये दरवर्षी श्रावण शुद्ध पंचमीला नागपंचमी उत्साहात साजरी केली जाते. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे मात्र मागील काही वर्षांपासून नागपंचमी साजरी करण्यावर अनेक बंधने आली आहेत. त्यात जिवंत नागाची पूजा करण्यास न्यायालयाने बंदी घातली आहे. त्यामुळे आता शिराळाकर हे प्रतिकात्मक नागाची पूजा करतात. मात्र यंदा कोरोनामुळे या नागपंचमीवर आणखी एक सावट निर्माण झाले. कोरोनामुळे शिराळामधील अंबामाता मंदिर बंद ठेवण्यात आले. यंदा मंदिरात जाऊन नाग प्रतिमेच्या पूजेला बंदी आली असली तरी हे सर्व बदल शिराळकर मोठ्या धैर्याने आत्मसात करून नागपंचमी त्याच उत्साहाने साजरी करत आहेत.
कोरोनामुळे प्रथमच अंबामाता मंदिरात लोकांच्याकडून होणारी नागप्रतिमा पूजा खंडित होणार आहे. ज्यावेळी जिवंत नागाची पूजा केली जात होती. त्यावेळी नागमंडळे प्रथम अंबामाता मंदिरात नागाची पूजा करून नंतर घरोघरी पूजा केली जात होती. जिवंत नागपूजेवर बंदी आल्यानंतर नागप्रतिमेची मंदिरात पूजा करून नंतर घरी प्रतिकात्मक नागाची पूजा करण्यास सुरुवात झाली.. सध्या कोरोना असल्याने अंबामाता मंदिरात नागप्रतिमेची पूजा करण्यास व दर्शन घेण्यासाठी बंदी असल्याने आता पहिल्यांदाच मंदिरात न जाता घरीच नागप्रतिमेची पूजा करून घरातूनच अंबामातेचे दर्शन घेऊन नैवेद्य दाखवावा लागत आहे. वनविभागाचे आणि पोलीस विभागाचे 164 अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या भागात 24 ते 26 जुलैपर्यंत तीन दिवस ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवण्यात येणार आहे. वन विभागाने ड्रोन कॅमेऱ्याने नजर ठेवण्याची ही पहिलीच वेळ आहे.
शिराळाच्या नागपंचमीला मोठा इतिहास
शिराळा येथे हजारो वर्षांपासून जिवंत नागाची पूजा केली जात होती. शिराळामध्ये महाजनांच्या घरी गोरक्षनाथ भीक्षा मागण्यास आले होते. यावेळी भीक्षा घालण्यास वेळ झाला आणि गोरक्षनाथ यांनी वेळ का झाला विचारला. त्यावेळी महाजन यांच्या पत्नीने आपण नागाची पूजा करत होते असे सांगितले. त्यावेळी गोरक्षनाथ यांनी जिवंत नागाची पूजा कर असे त्या महिलेला सांगितले आणि तेव्हापासून ही परंपरा शिराळामध्ये सुरू झाली. ही नागपंचमी पाहण्यासाठी काही वर्षांपूर्वी अनेक राज्यातून लोक येत होते. शिराळ्याच्या नागपंचमीचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी सर्व घरांमध्ये जिवंत नागांची पूजा करण्याची परंपरा होती. शेकडो वर्षापासून चालत आलेली ही परंपरा न्यायालयाच्या निर्णयानंतर खंडित झाली. त्यामुळे पारंपरिक पद्धतीने आम्हाला नागपंचमी करण्यास मिळावी, अशी भावना आजही व्यक्त करतात.