संपत्तीसाठी दोन बहिणींची हत्या, जावयाला अटक, महिनाभरानंतर प्रकरणाचा उलगडा, लातूरमधील घटना
जावयाने संपत्तीच्या कारणासाठी आपल्या सासू आणि त्यांच्या बहिणीची हत्या करत मृतदेह शेततळ्यात पुरून ठेवला होता. एक महिन्याच्या तपासानंतर किल्लारी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

लातूर: महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या दोन बहिणींच्या हत्येप्रकरणातील आरोपीस पोलिसांनी जेरबंद केलं आहे. जावयाने संपत्तीच्या कारणासाठी आपल्या सासू आणि त्यांच्या बहिणीची हत्या केली होता. मृतदेह शेततळ्यात पुरून ठेवला होता. एक महिन्याच्या तपासानंतर किल्लारी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
लातूर जिल्ह्यातील गोटेवाडी शिवारात 82 वर्षीय शेवंताबाई सावळकर या 85 वर्षीय बहीण त्रिवेणीबाई सोनवणे यांच्यासह राहत होत्या. शेवंताबाई यांना मुलगा नाही. त्यामुळे शेत जमीन त्यांनी मुलीच्या नावावर केली होती. जावई त्र्यंबक नारायणकर यामुळे नाराज होता. यातच सात जुलै रोजी शेवंताबाई आणि त्रिवेणीबाई दोघी बेपत्ता झाल्या. घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडले होते. यामुळे त्यांचे अपहरण झाले असावे अशी शंका नातेवाईकांना आल्याने पोलिसात तक्रार देण्यात आली होती.
यानंतर किल्लारी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. अनेक बाजूने तपास सुरू झाला. नातेवाईकांचे जबाब घेण्यात आले. बरेच दिवस झाले यात पोलिसांना यश येत नव्हते. याच काळात जावई त्र्यंबकबाबत पोलिसांना माहिती मिळाली. यात शेत जमिनीच्या वादाची माहिती समोर आली. त्र्यंबक हा मानखुर्द मुंबई येथे काम करत असल्यामुळे पोलीस पथक रवाना करण्यात आले. चौकशी दरम्यान बराच काळ उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या त्र्यंबकला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला.
सात जुलैला त्र्यंबकचा सासू शेवंताबाई यांच्या बरोबर वाद झाला. शेत जमीन माझ्या नावावर न करता मुलीच्या नावे का केली असा जाब विचारत त्र्यंबकने सासू शेवंताबाई यांची कोयत्याचा वार करत हत्या केली. यावेळी त्रिवेणीबाई तेथेच होत्या. त्या आपल्या कृत्याची माहिती सांगतील या भयापोटी त्रिवेणीबाई यांची कोयत्याचा वार हत्या केली. मृतदेह नष्ट करण्यासाठी दोन्ही मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले आणि स्वत:च्या शेतातील शेततळ्याच्या कपारीत मृतदेह पुरून टाकले. मृतदेह कुजून वास आला तर गुन्हा उघड होईल या भीतीने त्याने एक गाय मारून मृतदेहावर पुरली होती. ह्या कृत्याची माहिती दिल्यानंतर किल्लारी पोलिसांनी जेसीबीच्या मदतीने शेततळ्याच्या पाळूत पुरलेले मृतदेह बाहेर काढले. पोस्टमार्टम केल्यानंतर
दोन्ही पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
किल्लारी पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी त्र्यंबक यास न्यायालयात हजर केले असता कोर्टाने त्यास 14 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे.























