Municipal Corporation Election 2026 : नगरसेवक होण्याची पात्रता काय? उमेदवारी अर्ज भरताना कोणती कागदपत्रे गरजेची? A To Z माहिती
राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, इच्छुकांना २३ ते २९ डिसेंबर या कालावधीत आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येतील.

राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, इच्छुकांना २३ ते २९ डिसेंबर या कालावधीत आपले उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. तुम्हीही निवडणूक लढवण्यास इच्छुक असाल, तर खालील नियम आणि अटी जाणून घेणे आवश्यक आहे.
१. उमेदवाराची पात्रता (Eligibility)
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम ९ नुसार, उमेदवारामध्ये खालील पात्रता असणे आवश्यक आहे:
वय: उमेदवाराचे वय किमान २१ वर्षे पूर्ण असावे.
मतदार नोंदणी: ज्या महानगरपालिकेची निवडणूक लढवायची आहे, त्या शहराच्या मतदार यादीत उमेदवाराचे नाव असणे अनिवार्य आहे.
२. आरक्षणाचे नियम
जातीचा दाखला: राखीव जागेसाठी निवडणूक लढवत असल्यास सक्षम प्राधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र आणि जात पडताळणी समितीचे वैधता प्रमाणपत्र (Validity) आवश्यक आहे.
महिला आरक्षण:महिलांसाठी राखीव असलेल्या जागांवर संबंधित प्रवर्गातील स्त्रिया अर्ज करू शकतात.
स्थलांतरित: इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या व्यक्तींना राज्यातील राखीव प्रभागातून निवडणूक लढवता येणार नाही.
३. अपात्रतेच्या अटी (Disqualification)
कलम १० नुसार खालील परिस्थितीत उमेदवार अपात्र ठरू शकतो:
फौजदारी गुन्हा:न्यायालयाने २ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा सुनावली असल्यास, शिक्षेच्या मुदतीनंतर पुढील ६ वर्षे निवडणूक लढवता येत नाही (जोपर्यंत उच्च न्यायालय शिक्षेला स्थगिती देत नाही).
सामाजिक सलोखा: समाजात तेढ निर्माण करणाऱ्या गुन्ह्यांत (IPC १५३-A, ५०५) दोषी ठरल्यास ६ वर्षांची बंदी.
थकबाकीदार: महापालिकेची कोणतीही थकबाकी असल्यास आणि नोटीस देऊनही ३ महिन्यांत ती न भरल्यास उमेदवार अपात्र ठरतो.
अपत्य नियम: १२ सप्टेंबर २००१ नंतर तिसरे अपत्य झाले असल्यास संबंधित व्यक्ती निवडणूक लढवण्यास अपात्र ठरते.
४. उमेदवारी अर्जासोबत द्यायची माहिती व कागदपत्रे
अर्ज भरताना उमेदवाराला प्रतिज्ञापत्राद्वारे (Affidavit) खालील माहिती द्यावी लागते:
मालमत्ता: स्वतःची, पती/पत्नीची आणि अवलंबितांची जंगम व स्थावर मालमत्ता.
उत्पन्न: मागील ३ वर्षांच्या उत्पन्नाचा तपशील (Income Tax Returns).
गुन्हेगारी पार्श्वभूमी: न्यायालयात सुरू असलेले खटले किंवा प्रलंबित गुन्ह्यांची माहिती.
अनामत रक्कम: अर्जासोबत ठराविक अनामत रक्कम (Deposit) भरावी लागेल.
५. निवडणूक खर्च आणि आचारसंहिता
खर्च मर्यादा: प्रत्येक मनपासाठी खर्चाची मर्यादा वेगळी असून, निकालानंतर ३० दिवसांच्या आत खर्चाचा हिशोब निवडणूक आयोगाला देणे बंधनकारक आहे.
बाजार भाव:प्रचार साहित्याची खरेदी चालू बाजारभावाप्रमाणे (Market Price) दाखवणे आवश्यक आहे; अन्यथा आक्षेप घेतला जाऊ शकतो.
आचारसंहिता: अर्ज भरताना दिलेल्या नामनिर्देशन पत्रातील आचारसंहितेच्या सर्व नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
























