Mumbai Konkan Ro-Ro boat Ferry : मुंबई ते कोकण रो-रो सेवा, साडेतीन तासांत रत्नागिरी, 5 तासांत सिंधुदुर्ग, तिकीटाचा दर किती, ए टू झेड माहिती
Mumbai Konkan Ro-Ro Ferry : मुंबई ते कोकण रो-रो फेरीच्या माध्यमातून कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक प्रवाशांना वेळेची मोठी बचत होणार आहे.

Mumbai Konkan Ro-Ro Ferry : गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला कोकणवासीयांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. भाजपचे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई ते कोकण रो-रो (Ro-Ro) फेरी सेवा लवकरच सुरु होणार असल्याची घोषणा केली. ही सेवा 1 किंवा 2 सप्टेंबरपासून सुरु करण्याचा सरकारचा मानस असून हवामान सुधारताच ही ऐतिहासिक सेवा कार्यान्वित होणार आहे.
देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना; आता प्रत्यक्षात उतरणार
नितेश राणे पत्रकार परिषदेत म्हणाले की, “कोकणात समुद्र मार्गे प्रवास करण्याची ‘रो-रो सेवा’ ही संकल्पना 2014 ते 2019 या काळात देवेंद्र फडणवीस यांनी मांडली होती. आज त्यांच्या या स्वप्नाची पूर्ती होत असल्याचा मला आनंद आहे.” या सेवेचा उद्देश मुंबई ते कोकण प्रवास जलद, सुरक्षित आणि आरामदायी करणे आहे.
M2M बोट कोकणच्या दिशेने सज्ज; जयगड व विजयदुर्ग येथे थांबे
‘M2M’ नावाची बोट ही सेवा मुंबईतील भाऊच्या धक्क्यावरून सुरु होईल. या बोटीसाठी 147 विविध परवानग्या मिळाल्या आहेत, अशी माहिती राणे यांनी दिली.
पहिला थांबा: जयगड
दुसरा थांबा: विजयदुर्ग
याठिकाणी लवकरच ट्रायल फेऱ्या देखील घेण्यात येणार आहेत.
दक्षिण आशियातील सर्वात वेगवान फेरी सेवा
ही बोट 25 नॉट्स इतक्या वेगाने धावणार असून, ती दक्षिण आशियातील सर्वात वेगवान प्रवासी बोट असणार आहे.
मुंबई ते रत्नागिरी प्रवास : ३ ते ३.५ तास
मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास : ५ तास
यामध्ये वेगवेगळ्या श्रेणीचे प्रवासी वर्ग असतील – एकोनोमीपासून फर्स्ट क्लासपर्यंत.
प्रवाशांसाठी दर निश्चित – वाहनांनाही परवानगी
दर खालीलप्रमाणे असतील:
| श्रेणी | दर (₹) |
|---|---|
| इकोनॉमी | ₹2,500 |
| प्रीमियम इकोनॉमी | ₹4,000 |
| बिझनेस क्लास | ₹7,500 |
| फर्स्ट क्लास | ₹9,000 |
| चारचाकी वाहन | ₹6,000 |
| मिनी बस | ₹13,000 |
एकावेळी ५० चारचाकी गाड्या या बोटीत नेता येणार असून, वाहनांसाठी खास डेकची व्यवस्था करण्यात आली आहे.
हवामानामुळे थोडा विलंब, मात्र सेवा कायमस्वरूपी सुरु होणार
सध्या हवामान ढगाळ असल्यामुळे काही दिवस सेवेला विलंब होणार आहे. “हवामान खात्याचा अलर्ट पाहता 1 किंवा 2 सप्टेंबरनंतर सेवा सुरु करू. कोणतीही रिस्क घेणार नाही,” असं राणे यांनी स्पष्ट केलं. मात्र ही सेवा कायमस्वरूपी चालू राहणार असून, कोकणातील प्रवाशांसाठी ती मोठा दिलासा ठरणार आहे.
कोकणवासीयांसाठी प्रवासाचा नवा अध्याय
या सेवेच्या माध्यमातून कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक प्रवाशांना वेळेची मोठी बचत होणार आहे. रस्त्याचा त्रास आणि ट्रॅफिकपासून दूर जाऊन, समुद्रमार्गे कोकणात जलद आणि आरामदायी प्रवास करणं शक्य होणार आहे.
आणखी वाचा



















