कंगनाच्या चौकशीचा अहवाल सादर करण्यात मुंबई पोलिसांकडून दिरंगाई
कोर्टानं 5 जानेवारीची मुदतवाढ दिली होती. मात्र मंगळवारीही हा अहवाल सादर होऊ न शकल्यानं कोर्टानं नाराजी व्यक्त केली. आणि हा अहवाल सादर करण्यासाठी 5 फेब्रुवारीपर्यंतची अंतिम मुदतवाढ दिली आहे.
मुंबई : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगना रणौतच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. एखाद्या समाजाबद्दल सोशल मीडियावर द्वेषपूर्ण व अवमानकारक पोस्ट टाकल्या केल्याप्रकरणी कंगना व तिची बहीण रंगोली चंडेल या दोघींची चौकशी करा असे आदेश मुंबई महानगर दंडाधिकारी कोर्टानं मुंबई पोलिसांना दिले आहेत. एवढेच नव्हे तर चौकशीचा प्राथमिक अहवाल 5 डिसेंबरपर्यंत कोर्टात सादर करा असेही न्यायाधीश भागवत झिरपे यांनी पोलिसांना बजावले होते.
त्यासुनावणीला आंबोली पोलिसांनी कंगना चौकशीसाठी उपलब्ध न झाल्याचं कारण देत कोर्टाकडे वेळ वाढवून मागितला. तेव्हा कोर्टानं त्यांना 5 जानेवारीची मुदतवाढ दिली होती. मात्र मंगळवारीही हा अहवाल सादर होऊ न शकल्यानं कोर्टानं नाराजी व्यक्त केली. आणि हा अहवाल सादर करण्यासाठी 5 फेब्रुवारीपर्यंतची अंतिम मुदतवाढ दिली आहे.
काही महिन्यांपूर्वी तबलिगी समाजाबद्दल कंगनाची बहीण रंगोली हिनं द्वेषयुक्त व अपमानकारक ट्विट केले होते. याविरोधात अॅड. अली काशिफ खान देशमुख यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी केवळ तिची सोशल मीडियावरील तिची सेवा खंडित केली व त्या व्यतिरिक्त तिच्यावर काहीच कारवाई केली नाही. याप्रकरणी आपल्या बहिणीला पाठिंबा दर्शवत कंगनाने एक व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला होता, ज्यात तिनं रंगोलीचं समर्थन केलं होतं. याविरोधात अॅड. देशमुख यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टात तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत या प्रकरणातील पुरावे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्याने पुढील कारवाईसाठी चौकशी होणं आवश्यक असल्याचे कोर्टाने स्पष्ट केलं. तसेच संबंधित व्यक्तीची या प्रकरणात नेमकी भूमिका काय होती?, हे कळणं गरजेचं असल्यानं याबाबतचा चौकशी अहवाल दिलेल्या मुदतीत पोलिसांनी सादर करावा असा आदेश देत न्यायाधीशांनी आंबोली पोलीस स्थानकाला चौकशीचे आदेश दिले आहेत.