Mumbai Crime : मुंबईतील वसतिगृहातील मुलीच्या हत्येनंतर सरकार अलर्ट मोडवर, राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांच्या सुरक्षा तपासणीचे आदेश
Mumbai Crime Latest Update : राज्यातील वसतिगृहांच्या तपासणीसाठी उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून ही समिती 14 जून पर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे.
मुंबई: चर्नी रोड येथील शासकीय वसतिगृहात झालेल्या एका मुलीच्या हत्येनंतर (hostel girl murder) आता राज्य सरकार अलर्ट मोडवर गेलं आहे. राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांची सुरक्षा तपासणीचे आदेश राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचनी दिले आहेत. यासाठी उच्च शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली पाय सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असून एका आठवड्यात ही समिती आपला अहवाल सादर करणार आहे.
एका आठवड्यात राज्यातील सर्व शासकीय वसतिगृहांचे ऑडिट करण्यात येणार आहे आणि 14 जूनपर्यंत आढावा घेत अहवाल सादर करण्यात येणार आहे.
मुंबईतल्या चर्नी रोड येथील शासकीय वसतिगृहात एका 18 वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेनं सारा महाराष्ट्र हादरला. या घटनेनंतर आता महिला आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून राजकीय आरोपप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यानंतर आता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
या घटनेला वसतिगृह प्रशासन जबाबदार, मृत मुलीच्या वडिलांचा आरोप
मुंबईतल्या चर्नी रोड येथील शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या 18 वर्षाच्या विद्यार्थिनीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणातल्या संशयित आरोपीनं चर्नी रोड स्थानकात आत्महत्या केली. ओमप्रकाश कनोजिया नावाचा हा आरोपी वसतिगृहात वॉचमनची नोकरी करायचा. याच वसतिगृहात तो आधी धोबी म्हणून काम करायचा. वसतिगृह प्रशासनानं ओमप्रकाशला कोणाच्या परवानगीनं वॉचमनची नोकरी दिली?, असा प्रश्न भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. तसंच विरोधकांनी या घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे ओमप्रकाश कनोजियाच्या वसतिगृहातील मुलींसोबतच्या वर्तणुकीसंदर्भात हत्या झालेल्या मुलीनं आपल्याकडे तक्रार केल्याचं तिच्या वडिलांनी सांगितलं आहे.
वसतिगृह प्रशासनानं तिथल्या प्रकारांबाबत कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळं या घटनेला वसतिगृह प्रशासनातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप हत्या झालेल्या मुलीच्या वडिलांनी केला आहे.
Marine Line Hostel Girl Murder Case: काय आहे प्रकरण?
मरीन ड्राईव्हजवळील असलेल्या एका वसतिगृहात 18 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळला. या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर मरीन ड्राईव्ह पोलिसांनी (Marine Drive Police) घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. बुधवारी सायंकाळी वसतिगृहाच्या चौथ्या मजल्यावर मृतदेह आढळून आला. सूत्रांनी सांगितले की या मुलीची हाताने गळा दाबून हत्या (Marine Line Hostel Girl Murder) करण्यात आली आहे. या प्रकरणात वसतिगृहाच्या वॉचमनवर संशय होता आणि तो सकाळपासून बेपत्ता होता. ही हत्या झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच, बुधवारी रात्री त्या वॉचमनचा मृतदेह आढळला आहे. या वॉचमनचा मृतदेह हा चर्नी रोड पोलिस स्टेशनच्या (Charni Road Murder) जवळ असलेल्या रेल्वे ट्रॅकवर मिळाला. या वॉचमनचे नाव ओमप्रकाश कनौजिया असं असून त्याचं वय 53 वर्षे असल्याचं सांगण्यात येतंय.
ही संबंधित बातमी वाचा: