मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; आता 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करणं शक्य!
Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अजून अर्ज केला नाही? आता सरकारनं मुदतवाढ दिली आहे. झटपट अर्ज करा, 31 ऑगस्टपर्यंत योजनेचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ.
Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana : मुंबई : महाराष्ट्र सरकारनं (Maharashtra Government) 2024-25 चा आर्थिक अर्थसंकल्प सभागृहात सादर करताना राज्यातील महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना 2024' (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana 2024) जाहीर केली. त्याद्वारे राज्यातील महिलांना 18 ते 60 वर्ष वयोगटातील सर्व महिलांना दरमाहा आर्थिक मदत जाहीर केली जाणार आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी गावागावंत महिलांनी मोठी गर्दी केली. महाराष्ट्र सरकारच्या वतीनं या योजनेचा फॉर्म भरण्यासाठी 31 जुलैपर्यंतची मुदत दिली होती. राज्यभरातील महिलांची गर्दी पाहता आता सरकारनं लाडकी बहिण योजनेचा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. आता ज्या-ज्या महिलांनी अद्याप या योजनेसाठी अर्ज दाखल केला नाही, त्यांना 31 ऑगस्टपर्यंत या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री कार्यालयाचं अधिकृत सोशल मीडिया हँडल @CMOMaharashtra वरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे की, "राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार... ताई तुमच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली. त्याला तुम्हा सर्वांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद, ताई कुणालाही किती विरोधात बोलू देत, तू काळजी करू नकोस, राज्यातील महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभं आहे. तुझ्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, आरोग्यासाठी, पोषणासाठी तुला दरमाहा दीड हजार रुपये म्हणजेच, वर्षाला 18 हजार रुपये देण्याचा निर्णय तुझ्या भावानं घेतला आहे. योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून आणि नाव नोंदणीसाठी झालेली गर्दी पाहून आम्ही अर्ज भरण्याची मुदत वाढवून 31 ऑगस्ट केली आहे. त्यामुळे ज्या बहिणी 31 ऑगस्ट रोजी अर्ज करतील, त्यांनाही जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येणार आहे."
तसेच, मुख्यमंत्र्यांचा हा व्हिडीओ शेअर करताना एक कॅप्शनही लिहिण्यात आलं आहे. त्यामध्ये लिहिलं आहे की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद. अर्ज भरण्याची मुदत आता 31 ऑगस्ट. अंतिम मुदतीत नोंदणी करणाऱ्यांना देखील मिळणार जुलैपासून लाभ मिळणार. योजनेचा लाभ घेण्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलं आहे.
View this post on Instagram
अर्ज भरण्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक?
- आधारकार्ड
- रेशनकार्ड
- उत्पन्नाचा दाखला
- रहिवासी दाखला
- बँक पासबुक
- अर्जदाराचा फोटो
- अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र
- लग्नाचे प्रमाणपत्र
कोण असणार पात्र?
- महाराष्ट्र रहिवासी
- विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
- 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल
अपात्र कोण असेल?
- 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
- घरात कोणी Tax भरत असेल तर
- कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
- कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
- कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर (ट्रॅक्टर सोडून)