MSRTC ST Bus : एसटीच्या 'त्या' जाहिरातीप्रकरणी भूमच्या तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे, कामावर रुजू होण्याचे आदेश जारी
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची जाहिरात असलेली खराब बस रस्त्यावर वाहतुकीसाठी सोडल्याचे कारण देत या कर्मचाऱ्यांना निलंबित केलं होतं.
धाराशिव: बसची दुरवस्था आणि त्यावरील राज्य सरकारची जाहिरात व्हायरल झाल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेल्या तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन अखेर मागे घेण्यात आले आहे. भूम एसटी डेपोतील तीन कर्मचाऱ्यांचे निलंबन माघार घेत अखेर त्यांना कामावर रुजू होण्याचे आदेश भूम डेपो मॅनेजरनी दिले आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची जाहिरात असलेली खराब बस रस्त्यावर वाहतुकीसाठी सोडल्याचे कारण देत या कर्मचाऱ्यांना निलंबित केलं होतं.
काय आहे प्रकरण?
एसटी महामंडळाची दुरवस्था झालेल्या बसवर राज्य सरकारची जाहिरात असलेला एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोची दखल घेत विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकार टीका केली होती. मात्र जुनाट बसवर लावण्यात आलेल्या जाहिरातीसाठी एसटी कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आलं आणि भूममधील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत बसची दुरावस्था व त्यावर शासनाची जाहिरात याचे विदारक सत्य विधीमंडळात मांडल्यानंतर खळबळ उडाली. दुरावस्था झालेल्या बसचा जाहिरातीसह फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्या जाहिरातीसाठी तीन कर्मचाऱ्यांना जबाबदार ठरवण्यात आले आणि त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं.
एसटी महामंडळाने केलेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली होती. बसच्या दुरवस्थेचा विषय मार्गी लागून नवीन बस मिळतील अशी आशा होती. मात्र उलट निलंबन करण्यात आलं. वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशाने ही बस प्रवाशांसाठी वापरण्यात आल्याचं कर्मचाऱ्यांनी सांगितलं होतं. सध्या बसचा तुटवडा आहे, त्यामुळे या बस वापरण्यात आल्या आणि त्यामध्ये आमची काय चूक आहे असा सवाल कर्मचाऱ्यांनी केला होता. विनाकारण कर्मचाऱ्यांना दोषी ठरवून निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे निलंबन मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती. आता ही मागणी मान्य करण्यात आली आहे. या निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना आता कामावर रुजू होण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
एसटी बस खरेदी करा, कर्मचाऱ्यांचा दोष काय?
एसटी महामंडळाच्या ताफ्यातील 11 हजार गाड्या या दहा वर्षे पेक्षा जास्त जुन्या आहेत. नवीन गाड्या उपलब्ध नसल्याने प्रवाशांची सोय व्हावी म्हणून अशा गाड्या मार्गावर द्याव्या लागतात. यात कर्मचाऱ्यांचा काहीही दोष नाही. सरकारने बजेटमध्ये तरतूद केलेली रक्कम न दिल्याने गाड्या घेण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत. यात कर्मचारी किंवा व्यवस्थापन या कुणाचाही दोष नाही असे महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटलं होतं.
ही बातमी वाचा: