धक्कादायक... प्रवाशांच्या जीवाशी खेळ; लाईट नसतानाही रात्री धावतेय महामंडळाची बस
प्रवाशांच्या सेवेसाठी...हात दाखवा गाडी थांबवा...असं एस टी महामंडळाचं ब्रीदवाक्य आहे. एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास या ब्रीदवाक्यानुसार एसटी महामंडळ प्रवाशांना घेऊन प्रवासासाठी निघते
गोंदिया : एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास हे ब्रीद घेऊन महामंडळाची लालपरी गेल्या कित्येक वर्षांपासून धावत आहे. गावखेड्यात दुचाकी, चारचाकी वाहनांची कमतरता होती, किंवा ती वाहने नव्हती तेव्हा एसटीनेच सर्वात मोठा आधार दिला. विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसाठी महामंडळाची लालपरीच (Bus) ओझं वाहण्याचं काम करत. आजही गावखेड्यात जाणारी एसटी (ST) म्हणजे आपलं हक्काचं वाहन असल्याची भावना प्रवाशांमध्ये आहे. मात्र, अलिकडील काळात एसटी बसची झालेली दूरवस्था सातत्याने उघडकीस येत आहे. कधी पत्रा तुटलेली, कधी पावसाळ्यात गळती लागलेली, कधी सीटकव्हरच नसलेली तर कधी खिळखिळी झालेली बस प्रवाशांच्या सेवेत असते. मात्र, गोंदिया (Gondia) जिल्ह्यात चक्क हेडलाईट नसलेली बस रात्री महामार्गावर धावत असल्याचं दिसून आलं. त्यामुळे, कधी काळचा सुरक्षित प्रवास हा आज प्रवाशांच्या जीवाशी खेळ झाल्याचं दिसून आलं.
प्रवाशांच्या सेवेसाठी...हात दाखवा गाडी थांबवा...असं एस टी महामंडळाचं ब्रीदवाक्य आहे. एसटीचा प्रवास, सुखाचा प्रवास या ब्रीदवाक्यानुसार एसटी महामंडळ प्रवाशांना घेऊन प्रवासासाठी निघते. मागील काही दिवसांमध्ये एसटीचं छप्पर उडालेलं, किंवा बस चालवताना चालक मोबाईलवर बोलतानाचे व्हिडिओ समोर आलेत. पावसाळ्यात एसटी घडत असल्यानं छत्री घेऊन बसमधून प्रवास करणारे प्रवासी बघितलेत. त्याही पलीकडे जाऊन गोंदिया आगाराच्या एसटी बसचा एक धक्कादायक व्हिडिओ आज समोर आलाय. गोंदिया आगाराची बस क्रमांक MH 40-9573 ही लालपरी दुपारी नागपूर येथून गोंदियाकडे प्रवासी घेऊन निघाली. भंडारा येथे पोहोचल्यानंतर सायंकाळ झाल्याने रस्त्यावर सर्वत्र अंधार पसरला होता. भंडाऱ्यातून काही प्रवाशांना घेऊन ही बस गोंदियाकडे निघाली. मात्र, बसच्या समोरील लाईट बंद असतानाही बसच्या चालकानं बस भरधाव गोंदियाकडे पळविली. समोरील काहीही दिसत नसतानाही बसच्या चालकानं ही बस भरधाव पळविली. यावेळी बसमधून प्रवास करणारे विद्यार्थी आणि नागरिकांची चांगलीच भंबेरी उडाली.
बसमधील सर्चच प्रवाशांनी अक्षरशः जीवमुठीत घेऊन लाखनी, साकोलीपर्यंतचा प्रवास केला. बसच्या समोरील लाईट बंद असताना बस भरधाव महामार्गावरून धावत असल्याचा धक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ बसमधीलचं एका प्रवाशानं त्याच्या मोबाईलमध्ये काढला. बसच्या समोरील लाईटबाबत चालकाने गोंदिया आगार प्रमुखाकडे दोन तीनदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, ते दुरुस्त नं करताच बस प्रवासी वाहतुकीसाठी देण्यात आल्याचं चालकानं सांगितले. पण, या घटनेमुळे महामंडळाच्या बसची दूरवस्था पुन्हा समोर आली असून चक्क स्ट्रीट लाईटच्या भरवशावरच ही लालपरी धावत असल्याचं पाहायला मिळालं.
हेही वाचा
बाळा मी इथेच आहे; पुस्तक प्रकाशनावेळी आईचा आवाज ऐकताच मुख्यमंत्री शिंदेंच्या डोळ्यात पाणी