(Source: ECI/ABP News/ABP Majha)
PSI Result : नोकरी सोडली आणि धाडस केलं, अखेर बिकट परिस्थितीवर मात करत फौजदार झाला.., औरंगाबादच्या योगेश नाल्टेची कहाणी
MPSC Result : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नुकतंच पीएसआय परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये योगेश कमलाकर नाल्टे याने यश मिळवलं आहे.
औरंगाबाद: हाती असलेली नोकरी सोडून काहीतरी धाडस करायला जावं आणि त्यानंतर परिस्थिती अधिकच बिकट व्हावी याचा अनुभव अनेकांना येतोय. पण या परिस्थितीवरही संयम आणि जिद्दीच्या जोरावर मात करण्याचं धाडस काहीजण दाखवतात. औरंगाबादच्या योगेश कमलाकर नाल्टे याची कथा ही त्यातलीच. योगेशने अत्यंत बिकट परिस्थितीतून पीएसआय परीक्षेमध्ये यश मिळवलं आहे. त्यामुळे त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नुकतंच पीएसआय परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये योगेश कमलाकर नाल्टे याने यश मिळवलं आहे.
नोकरी सोडली अन्...
औरंगाबादच्या योगेशने मास्टर ऑफ फार्मसी केलं आणि नंतर Lupin Ltd या मल्टिनॅशनल कंपनीत नोकरीला सुरुवात केली. याच काळात त्याचा मित्र उद्धव होळकर हा जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी झाला होता. त्याच्याकडे पाहून आपणही अधिकारी व्हावं ही योगेशची इच्छा त्याला काही स्वस्थ बसू देत नव्हती. मग योगेशचं अखेर ठरलं...त्याने नोकरी सोडली आणि तो एमपीएसचीच्या तयारीला लागला.
योगेशने परीक्षेच्या तयारीसाठी पुण्याला न जाता औरंगाबादमध्येच राहण्याचं ठरवलं. त्याने 2017 साली अभ्यास सुरू केला. 2019 च्या पीएसआय परीक्षेमध्ये तो पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाला. त्यानंतर त्याने शारीरिक चाचणी आणि मुलाखतीची तयारी सुरू केली. परंतु 2020 मध्ये आलेली कोरोना महामारी आणि नंतर मराठा आरक्षणाला आलेली स्थगितीमुळे 2019 च्या परीक्षेची शारीरिक चाचणी आणि मुलाखत व्हायला 2022 साल उजाडलं. त्यामुळे त्याला जवळपास अडीच वर्षे मैदानी चाचणीची तयारी करावी लागली.
हा काळ योगेशसाठी अत्यंत वेदनादायी असल्याचं त्याने एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. या काळात त्याला आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. लॉकडाऊनमुळे वडिलांचा पेटिंगचा व्यवसाय बसला. त्यामुळे आपण परत एकदा नोकरी करावी का असा विचार सातत्याने मनात येत होता. मग यातून मार्ग काढत एका मेडिकलमध्ये काम सुरू केलं आणि शारीरिक चाचणीची तयारी सुरू ठेवली.
या अडचणीच्या काळात योगेशला त्याच्या सोबत असलेल्या मित्रपरिवाराची साथ लाभली. शुभ्रा, मुरली शिंदे, रमेश गोपाळे गोपाल, गजू, उमेश, अभिजीत, तुषार, सचिन यांनी आपल्याला या काळात खूप मदत केली असल्याचं योगेशने सांगितलं. शारीरिक चाचणीच्या तयारीसाठी भरत रेड्डी सर, मित्र अशोक पाखरे, विजय सोनवणे याची साथ मिळाल्याचं तो सांगतोय.
पीएसआय परीक्षेमध्ये मिळालेल्या यशानंतर एबीपी माझाशी बोलताना योगेश नाल्टे म्हणाला की, "या प्रवासात खूप काही गोष्टी माझ्या हातून निघून गेल्या. ते म्हणतात ना 'मंजिल को खबर भी नही, सफर ने क्या-क्या छिना है हमसे' हे माझ्या बाबतीत लागू होतं. पण त्यातून सावरूनच आपल्याला पुढे जायचे आहे. मिळालेल यश हे संयमाच्या जोरावर प्राप्त केलंय. इतक्या अडचणींच्या काळात तो पण माझा साथीदार होता.
तसेच मला मिळालेल्या संधीचे मी नक्कीच सोनं करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेन."
संबंधित बातम्या :