Manoj Jarange: काल जरांगे म्हणाले एकनाथ शिंदेंनी दगाफटका केला तर... संदिपान भुमरे अंतरवाली सराटीत भेटीला, उपोषणापूर्वी शेवटचा प्रयत्न?
Sandipanrao Bhumre met Manoj Jarange Patil: शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदिपान भुमरे यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
जालना: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलक मनोज जरांगे पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत, तर आगामी विधानसभा निवडणुकीच्या आधी आपल्या मागण्या पुर्ण करण्यासाठी त्यांनी सरकारला पुन्हा एकदा अल्टीमेटम दिलं आहे, परवापासून (मंगळवारी) मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) पुन्हा उपोषणाला बसणार आहेत. त्याआधी आज शिवसेना शिंदे गटाचे खासदार संदिपान भुमरे यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांच्या भेटीसाठी संदिपान भुमरे अंतरवाली सराटीत पोहचले आहेत. परवापासून जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. त्यापूर्वीच भुमरे यांनी त्यांची भेट घेतली आहे. संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस केली. दोघांमध्ये अंतरवाली सराटी मध्ये सरपंचाच्या घरी चर्चा सुरू आहे. तर संदिपान भुमरे अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंना भेटण्यासाठी गेल्या असल्याने उपोषणापूर्वी शेवटचा प्रयत्न सुरू असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
मनोज जरांगे मराठा आरक्षणासाठी पुन्हा रणशिंग फुंकणार!
मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हे येत्या 17 सप्टेंबरपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी याआधी आपण 29 सप्टेंबरला आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा दिला होता. मात्र, आता मनोज जरांगे हे 17 सप्टेंबरपासून आमरण उपोषण करणार आहेत.
मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंतरवाली सराटीतील यापूर्वीच्या आंदोलनामुळे महायुती सरकारची कोंडी झाली होती. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरले होते. लोकसभा निवडणुकीत याचा फटका महायुतीला बसला होता. मराठा आमदारांनी महायुतीच्या उमेदवारांविरोधात कौल दिल्याने अनेक जागांवर सत्ताधारी आघाडीचे उमेदवार पडले होते. यामध्ये पंकजा मुंडे आणि रावसाहेब दानवे यांच्यासारख्या मातब्बर उमेदवारांचा समावेश होता.
मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांनी मध्यंतरी विधानसभा निवडणुकीत राज्यभरात 288 उमेदवार उभा करण्याची घोषणा केली होती. यानंतर आता मनोज जरांगे पाटील हे घोंगडी सभा घेऊन वातावरण तापवत आहेत. मात्र, आता मनोज जरांगे पाटील हे मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसणार आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्याने तापू शकतात. तसे घडल्यास यावर भाजप आणि महायुती सरकार काय प्रतिक्रिया देणार, हे पाहावे लागेल.
बार्शीत भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत याचं ठिय्या आंदोलन
आमदार राजेंद्र राऊत यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे. बार्शीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आमदार राऊत गेल्या तीन दिवसांपासून शेकडो समर्थकांसह ठिय्या आंदोलन करीत आहेत. मराठा आरक्षण प्रश्नावर सुरुवातीला त्यांनी आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दुसरीकडे जरांगेंनी आमदार राऊत यांचा बोलविता धनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच असल्याचा प्रत्यारोप करून त्यांचे आव्हान स्वीकारले आहे.