(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खासदार नारायण राणेंचा गौप्यस्फोट, महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष भाजपमध्ये विलीन करणार
नारायण राणे यांचे निलेश व नितेश हे पुत्रही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सध्या नारायण राणे भाजपच्या माध्यमातून राज्यसभेवर खासदार आहेत.
मुंबई: महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांचा अखेर भाजपमध्ये अधिकृत प्रवेश निश्चित झाला आहे. याबरोबरच त्यांचा 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' हाही भाजपमध्ये विलीन करण्यात येईल. नारायण राणे यांचे निलेश व नितेश हे पुत्रही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. सध्या नारायण राणे भाजपचे सहयोगी सदस्य असून राज्यसभेवर खासदार आहेत. भाजपमधल्या प्रवेशानंतर ते अधिकृत आणि औपचारिकरित्या भाजपवासी होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाध्यक्ष अमित शाहांच्या उपस्थितीत पक्षप्रवेशाचा हा सोहळा होईल.
राणे भाजपसोबत राहणार की नाही याचा निर्णय येत्या दहा दिवसात घेणार असल्याचं त्यांनी मागील आठवड्यात सांगितलं होतं. एबीपी माझाच्या तोंडी परीक्षेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली होती. भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी नारायण राणेंना भाजपप्रवेशासाठी ग्रीन सिग्नल दिला होता, मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं काय मत आहे या प्रतीक्षेत राणे असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. कॉंग्रेस सोडल्यापासूनच राणे भाजपप्रवेशाच्या प्रतीक्षेत होते.
नारायण राणे करणार भाजपात प्रवेश, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षसुद्धा होणार भाजपात विलीन
गेल्या चार दशकांपासून नारायण राणे महाराष्ट्राच्या राजकारणात कार्यरत आहेत. कोकणातले सर्वात प्रभावशाली नेते ठरलेल्या राणे यांनी शिवसेनेमधून राजकारणाची सुरुवात केली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वरदहस्तामुळे शाखाप्रमुख ते युती सरकारच्या शेवटच्या वर्षात मुख्यमंत्रिपद अशी चढती कमान राणेंनी सांभाळली. पुढे सत्तांतरानंतर विरोधीपक्ष नेतेपदावरुन झालेल्या वादामुळे आणि तेव्हा शिवसेनेत उदयाला येऊ लागलेल्या उद्धव ठाकरेंशी न जुळल्यामुळे त्यांनी शिवसेना सोडली. शिवसेना सोडून राणे पूर्णपणे विरुद्ध विचारधारेच्या काँग्रेसमध्ये गेले. तिथे त्यांना मंत्रिपदं मिळाली मात्र मुख्यमंत्रिपदाची महत्वाकांक्षा लागून राहिलेल्या राणे यांचे यावरुन काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी सदैव खटके उडाले. केंद्रात आणि राज्यात 2014 च्या झालेल्या सत्तांतरानंतर काँग्रेसमध्ये वाव राहिला नसल्याचं राणेंनी ओळखलं. मात्र, भाजपमध्ये थेट प्रवेश न करता त्यांनी भाजपच्या माध्यमातून राज्यसभेवर जाणं पसंत केलं. त्याचवेळी 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा'द्वारे वेगळी मोट बांधण्याचाही प्रयत्न त्यांनी केला. दुसरीकडे निलश राणे यांचे दोन्ही पुत्र निलेश आणि नितेश हेसुद्धा काँग्रेसच्या माध्यमातून संसदेत आणि विधिमंडळात गेले. त्यांच्यापैकी सध्या नितेश राणे आमदार आहेत. भाजपमधल्या प्रवेशानंतर हा राणेंचा चौथा पक्ष ठरेल. भाजपमध्ये आधीच असलेली नेत्यांची प्रभावळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सत्ता, प्रशासन व पक्षावर मांड असताना महत्वाकांक्षी राणे तिथे कसे रमतील, युतीतला मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेशी ते जुळवून घेतील का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.संबंधित बातम्या
भाजप प्रवेशासंदर्भात चर्चा करण्यासाठी नारायण राणे 'वर्षा'वर