नटीच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यापेक्षा देशातील अन्य प्रश्न महत्वाचे : डॉ. अमोल कोल्हे
कुठल्यातरी नटीच्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिल्याने फरक पडणार नाही, असं खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटलं आहे. ते एबीपी माझाच्या 'प्रश्न महाराष्ट्रा'चे या विशेष कार्यक्रमात बोलत होते.यावेळी त्यांनी कोरोना, देशातील महत्वाच्या समस्या, चित्रपटसृष्टीतील ड्रग्ज कनेक्शन, कंगना वाद याबाबत भाष्य केलं.

मुंबई : एखाद्या नटीच्या वक्तव्यावर रिअॅक्ट व्हावं इतकी ती मोठी व्यक्ती नाही. तिच्यावर रिअॅक्ट न झाल्यानं आपल्या जीवनावर काही फरक पडणार आहे का? असा सवाल खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आहे. देशासमोरचे महत्वाचे प्रश्न काय आहेत, त्यामुळं माझ्या आणि आपल्या जनतेच्या जीवनावर फरक पडणार आहे. कुठल्यातरी नटीच्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिल्याने फरक पडणार नाही, असंही कोल्हे म्हणाले. ते एबीपी माझाच्या 'प्रश्न महाराष्ट्रा'चे या विशेष कार्यक्रमात बोलत होते.
सध्या बॉलिवूडमध्ये सुरु असलेल्या घडामोडी आणि कंगना वादावर प्रश्न विचारला असता डॉ. कोल्हे म्हणाले की, या विषयावर चर्चा केली जावी एवढा मोठा विषय नाही. एखाद्या अभिनेत्रीनं एखादी गोष्ट केली तर तिला किती महत्व द्यायचं. सध्या कोरोनाची स्थिती बिकट आहे, अर्थव्यवस्था डुबली आहे, चीन घुसखोरी करतंय बाकीचे अनेक पक्ष आहेत, त्यावरुन लक्ष हटवण्यासाठी इतर असे वाद निर्माण केले जात आहेत का? अशी शंका आल्याशिवाय राहात नाही, असं खासदार कोल्हे यांनी म्हटलं आहे. यावर रिअॅक्ट व्हावं इतकी ती मोठी व्यक्ती नाही. तिच्यावर रिअॅक्ट न झाल्यानं आपल्या जीवनावर काही फरक पडणार आहे का? असा सवाल त्यांनी केला. देशासमोरचे महत्वाचे प्रश्न काय आहेत, त्यामुळं माझ्या आणि आपल्या जनतेच्या जीवनावर फरक पडणार आहे. कुठल्यातरी नटीच्या ट्वीटवर प्रतिक्रिया दिल्याने फरक पडणार नाही, असं ते म्हणाले.
ड्रग्ज प्रकरण अत्यंत निषेधार्ह
चित्रपटसृष्टीतील ड्रग्ज प्रकरणावर बोलताना कोल्हे म्हणाले की, हे अत्यंत निषेधार्ह आहे. यामुळं तरुणाई बर्बाद करणारी कुठलीही गोष्ट होणे हे चुकीचेच आहे. पंजाबसारख्या घटना जर महाराष्ट्रात घडत असतील तर ते वाईट आहे, असं कोल्हे म्हणाले. या सर्व प्रकरणाची पाळंमुळं शोधली जातील. त्याच्या चौकशीचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत, असं ते म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक तोडगा काढला जाईल
महाविकास आघाडीचं सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. त्यावर सर्वजण मिळून काम करत आहेत. राज्यातल्या तरुणांनी मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा. राज्य सरकार सांगत आहे की आम्ही मराठा समाजासोबत आहोत, तर आंदोलनाची गरज काय. यावर सकारात्मक तोडगा काढला जाईल असं सरकार सांगत आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार आणि सर्वच नेते बैठका घेत आहेत. राज्याचे प्रमुख आपल्याला आश्वासन देत आहेत, त्यावेळी एकजुटीनं त्यांच्या पाठिशी राहाणं आवश्यक आहे, असं कोल्हे म्हणाले.
आरोग्य सुविधांमध्ये मनुष्यबळ वाढवणं आवश्यक
महाराष्ट्रात कोरोना वाढतोय ही चिंताजनक बाब आहे. आरोग्याच्या सुविधेकडे वर्षानुवर्ष दुर्लक्ष झालेलं आहे. आपण तांत्रिक बाजू पुरवल्या तरी कुशल मनुष्यबळ मात्र मिळत नाही. तात्काळ असं मनुष्यबळ उभारणं कठिण आहे. प्रत्येक जिल्ह्यात एक मेडिकल कॉलेज ही पॉलिसी आपल्याला बदलावी लागेल. तरीही सातत्याने प्रयत्न सुरु आहेत की आरोग्य सुविधा उभ्या केल्या जाव्यात. पुण्याचा डेथ रेट कमी झाला आहे, ही सक्सेस स्टोरी आहे. ग्रामीण भागात कोरोना रोखण्यासाठी प्रयत्न केला जावा, असं कोल्हे म्हणाले.
ते म्हणाले की, अनेकांचे रोजगार गेले आहेत. देशाच्या अर्थमंत्र्यांनी कोरोना ही देवाची करणी हे धक्कादायक वक्तव्य होतं. अर्थव्यवस्था ढासळली आहे, बेरोजगारी आहे, याबाबत केंद्र सरकार अपयशी आहे, असं ते म्हणाले. मराठा आरक्षण, कोरोना आणि तरुणाईला रोजगार, ढासळलेली अर्थव्यवस्था हे महत्वाचे प्रश्न आहेत, असं खासदार कोल्हे सुरुवातीला म्हणाले.
- प्रश्न महाराष्ट्राचे या विशेष कार्यक्रमातील अन्य महत्वाच्या बातम्या
राज्यात कोरोनाची संख्या वाढत असताना केंद्रानं मदत देणं बंद केलं : आरोग्यमंत्री राजेश टोपे
महाराष्ट्र, मुंबई पोलिसांना ठरवून बदनाम केलं जात आहे : संजय राऊत
इतर राज्यांच्या तुलनेत केंद्रानं महाराष्ट्राला दुप्पट दिलंय : प्रवीण दरेकर
सरकारसाठी कोरोना हाच मुख्य मुद्दा, बदनामीसाठी काहींनी कंगना-सुशांतचा मुद्दा आणला : गुलाबराव पाटील
...तोवर उसतोड कामगारांनी कोयता म्यान ठेवावा, पंकजा मुंडेंचं आवाहन























