Amol Kolhe : खासदार अमोल कोल्हे नेमके कोणाचे; दोन्हीकडे प्रतिज्ञापत्र दिल्याने अजूनही काठावर? निकालावर अजूनही प्रतिक्रिया नाही!
Amol Kolhe : अमोल कोल्हे यांनी दोन्ही गटाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्राने मात्र राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. इतकंच नव्हे तर पाच आमदारांनी सुद्धा दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत.
Amol Kolhe : राष्ट्रवादीला खिंडार पाडल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चर्चेत असलेले एक नाव म्हणजे डॉ. अमोल कोल्हे. अमोल कोल्हे अजूनही द्विधा मनस्थितीत आहेत का? असाच प्रश्न त्यांच्या संशयास्पद भूमिकेवर निर्माण झाला आहे. निवडणूक आयोगाने आज राष्ट्रवादी काँग्रेस चिन्ह आणि पक्ष अजित पवार गटाला दिल्यानंतर जी प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत त्यामध्ये एकमेव अमोल कोल्हे असे आहेत ज्यांनी दोन्ही गटाकडे प्रतिज्ञापत्र दिल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. इतकंच नव्हे तर अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्यानंतर ज्यावेळी त्यांचा शपथविधी सोहळा झाला त्यावेळी सुद्धा अमोल कोल्हे उपस्थित राहिले होते.
मात्र, त्यांनी भूमिका स्पष्ट करताना शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अजित पवार यांनी जाहीरपणे अमोल कोल्हे यांना पाडण्याची भाषा केली होती. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. इतकं राजकीय घमासान होऊन सुद्धा अमोल कोल्हे यांनी दोन्ही गटाकडे दिलेल्या प्रतिज्ञापत्राने मात्र राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत. इतकंच नव्हे तर पाच आमदारांनी सुद्धा दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र सादर केली आहेत. अन्य पाच आमदारांमध्ये अशोक बापू पवार आहेत.
राजकीय भूमिकेवर संशयास्पद वातावरण?
दुसरीकडे राष्ट्रवादीचा निर्णय अजित पवार गटाच्या बाजूने गेल्यानंतर शरद पवार गटातील नेत्यांकडून कडाडून प्रतिक्रिया आल्या आहेत. त्यांनी भाजप आणि अजित पवार यांच्यावरती घणाघाती हल्ला चढवला आहे. मात्र, डॉ. अमोल कोल्हे यांची कोणती प्रतिक्रिया न येणं, त्याचबरोबर सोशल मीडियामध्ये सुद्धा प्रतिक्रिया न देणे यामुळे सुद्धा त्यांच्या एकंदरीतच राजकीय भूमिकेवर संशयास्पद वातावरण निर्माण झालं आहे.
अमोल कोल्हे गेल्या काही दिवसांपासून भाजप विरोधात बोलत असले, तरी त्यांची पक्षाबद्दलची भूमिका अजूनही स्पष्ट झालेली नाही हेच त्यांच्या मौनातून सूचित होत आहे का? अशी सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राष्ट्रवादीचा निर्णय अजित पवार गटाच्या बाजूला गेल्यानंतर सर्वच नेत्यांकडून प्रतिक्रिया सुरू असताना अमोल कोल्हे यांच्या ट्विटर हँडलवरती मात्र अजूनही एकही ट्विट झालेलं नाही. त्यामुळे अमोल कोल्हे नेमके कोणाचे? असे विचारण्याची वेळ आता आली आहे. असं म्हटल्यास अवघड ठरणार नाही.
इतर महत्वाच्या बातम्या