(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mohini Ekadashi: मोह मायेची बंधने तोडणारी एकादशी म्हणजे अश्विन शुद्ध अर्थात मोहिनी एकादशी
एकादशी आज सकाळी पावणे सात वाजता संपून द्वादशी लागत असली तरी सूर्याने पाहिलेली एकादशी ही आजची असल्याने वारकरी संप्रदायात अशा एकादशीला भागवत एकादशी म्हणतात.
Mohini Ekadashi : मानवाच्या सर्व अर्थाचे कारण असते तो त्याच्या मनातील विषयाचा मोह आणि तो मोह नष्ट करणारी एकादशी म्हणजे अश्विन शुद्ध अर्थात मोहिते एकादशी या नावाने प्रचलित आहे. यंदा हजारो वर्षातून येणारा योग्य आला असून याला अश्विन शुद्ध अर्थात मोहिनी एकादशी ही काल सकाळी सव्वा नऊ वाजता सुरु झाली याला वारकरी संप्रदायात स्मार्त एकादशी म्हणतात. ही एकादशी आज सकाळी पावणे सात वाजता संपून द्वादशी लागत असली तरी सूर्याने पाहिलेली एकादशी ही आजची असल्याने वारकरी संप्रदायात अशा एकादशीला भागवत एकादशी म्हणतात. त्यामुळे आज वारकरी संप्रदाय या मोहिनी एकादशीचे व्रत करीत असतो.
सर्व एकादशी एका बाजूला आणि मोहिनी एकादशी एका बाजूला एवढे मोठे पुण्य मोहिनी एकादशीचे धर्मशास्त्रात सांगितले आहे. प्रभू रामचंद्रांनी एकदा वसिष्ठ ऋषींना सीतेच्या विराहानंतर व्याकुळ होऊन मनाच्या शांती आणि समाधानासाठी एखादे व्रत सांगण्याची विनंती केल्यावर वसिष्ठ ऋषींनी रामाला ही मोहिनी एकादशी करण्यास सांगितले होते. देवाने समुद्र मंथनाच्या वेळी घेतलेले मोहिनीचे रूप याच दिवशी घेऊन अमृताचे वाटप केल्याची मान्यताही असल्याने या एकादशीला मोहिनी एकादशी या नावाने संबोधले जाते. अंतःकरणातील सर्व विषारी मोह माया याची बंधने तोडणारी अशी हि मोहिनी एकादशी असते.
पंढरीची वारी आहे माझे घरी !
आणिक न करी तीर्थव्रत !!
संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे भागवत संप्रदायातील लाखो वारकरी केवळ पंढरीची वारी करीत विठुरायाची उपासना आणि एकादशी करत असतात. मोहिनी एकादशीस येणाऱ्या द्वादशीला देखील वारकरी संप्रदायात खूप मोठे महत्व असते. याच दिवशी भगवंत प्रकट झाल्याची मान्यता असून बार्शी येथील भगवंत मंदिरात शेकडो वर्षांपासून भगवंत प्रकट उत्सव साजरा होत असतो. एकादशीचा उपवास केल्यानंतर वारकरी द्वादशीच्या परण्याला म्हणजे उपवास सोडायला बार्शी येथील भगवंताच्या दर्शनाला जातात आणि उपवास सोडतात . वारकरी संप्रदायातील जेष्ठ परंपरा असणारे बोधले घराणे गेल्या 11 पिढ्यापासून भगवंत मंदिरात द्वादशीचे प्रकट कीर्तन सोहळा पहाटे चार ते सहा या वेळेत करीत असतो .
याचीही एक रंजक कथा धर्मशास्त्रात सांगण्यात आली आहे . अंबरीश ऋषी हे एकादशीचे निर्जल व्रत करत असे. संपूर्ण दिवस पाण्याचा थेंबही न घेता द्वादशीला सूर्यदयाला भोजन करून उपवास सोडत असत. एकदा द्वादशीला दुर्वास ऋषी हे अम्बरीश ऋषींच्या आश्रमात आल्यावर दुर्वास ऋषींना त्यांनी द्वादशीच्या भोजनास थांबण्याची विनंती केली. दुर्वास ऋषींनी याला मान्यता देऊन ते नदीवर गेले मात्र सूर्यास्त होऊ लागला तरीही ते परत न आल्याने अंबरीश ऋषींसमोर यक्ष प्रश्न उभा राहिला. अखेर त्यांनी द्वादशी संपण्यापुर्णी थेंबभर जलाचे प्रश्न करून उपवास सोडला आणि यजमानाच्या पूर्वी भोजन न घेता त्यांचाही मान ठेवला. मात्र दुर्वास ऋषींना ही गोष्ट समजल्यावर त्यांनी अंबरीश ऋषींना 10 जन्म घ्यावे लागतील असा शाप दिला. यानंतर भगवंतांनी आपल्या भक्ताला दिलेला शाप स्वतःवर घेतला आणि दहा अवतार घेतल्याची मान्यताही वारकरी संप्रदायात आहे . यामुळेच वारकरी संप्रदायात एकादशीला अनन्यसाधारण महत्व असून हे व्रत प्रत्येक वारकरी मनोभावे करीत असतो .
एकादशी व्रत सोमवार न करी !
कोण त्यांची गती होईल नेऊ !!
म्हणजेच एकादशीचे व्रत न करणाऱ्याची अधोगती होते अशी भावना वारकरी संप्रदायात आहे. मोहिनी एकादशीला यंदा आलेला त्रुस्पर्श वंजूला महाद्वादशी चा दुर्मिळ योग शेकडो वर्षानंतर आल्याने आजच्या दिवसाला वारकरी संप्रदायात फार मोठे महत्व आहे .