(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mohammad Siraj : क्रिकेटर पोलिस अधिकारी कसा बनतो? आरोपीला अटक करण्याचा त्याला अधिकार असतो का?
Mohammad Siraj Appointed As DSP : गोलंदाज मोहम्मद सिराजची तेलंगणा पोलिसात डीएसपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. क्रिकेटर पोलीस अधिकारी कसा बनतो आणि त्याला कोणते अधिकार आहेत का हे पाहुयात.
Mohammad Siraj Appointed As DSP : भारतीय संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजला तेलंगणा पोलिसांनी डीएसपी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. मोहम्मद सिराजच्या क्रिकेट खेळातील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव करण्यासाठी राज्य सरकारने त्याला डीएसपी पद दिलं आहे. म्हणजेच आता मोहम्मद सिराजला डीएसपी मोहम्मद सिराज म्हटलं जाईल. कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला पोलिस अधिकार पद देण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याच्याआधी 2007चा टी-20 विश्वचषक विजेता जोगिंदर शर्मालाही हरियाणा पोलिसात डीएसपी बनवण्यात आलं होतं.
भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगलाही पंजाब पोलिसात डीएसपी पद देण्यात आलं होतं. दरम्यान, भारतीय महिला संघाची सध्याची कर्णधार हरमनप्रीत कौर हिलाही पंजाब पोलिसांनी डीएसपी पदाची जबाबदारी दिली आहे. या घोषणेनंतर आता अनेकांच्या मनात प्रश्न येत आहे की, डीएसपी झाल्यानंतर मोहम्मद सिराजकडे कुणालाही अटक करण्याचा अधिकार असेल का?
क्रिकेटर पोलिस कसा बनतो?
भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याची तेलंगणाच्या रेवंत रेड्डी सरकारने तेलंगणा पोलिसांच्या डीएसपी पदावर नियुक्ती केली आहे. आता अशा परिस्थितीत क्रिकेटर पोलिस कसा बनतो, हा प्रश्न अनेकांच्या मनात येत आहे. यासाठी काही विशेष नियम करण्यात आला आहे का?
कोणत्याही क्रीडा शाखेत उत्कृष्ट कामगिरी केल्यानंतर सरकार अनेकदा खेळाडूंचा अशा प्रकारे सन्मान करतात. क्रिकेटपटूला पोलिस पद देण्याची ही पहिलीच वेळ नाही. बलविंदर संधू, हरभजन सिंग, जोगिंदर शर्मा आणि हरमनप्रीत कौर यांनाही पोलिस पदे देण्यात आली आहेत.
यांना अटक करण्याचा अधिकार आहे का?
मोहम्मद सिराजला डीएसपी बनवल्यानंतर आता हा प्रश्न अनेकांच्या मनात येत आहे, मोहम्मद सिराज कोणाला अटक करू शकतो का? तर त्याचं उत्तर होय असं आहे. पोलिस झाल्यानंतर मोहम्मद सिराज हा कोणालाही अटक करू शकतो. मोहम्मद सिराज तेलंगणा पोलिसात डीएसपी म्हणून रुजू झाला आहे. त्याला डीएसपीचे सर्व अधिकार मिळाले आहेत. डीएसपींना दिले जाणारे भत्तेही त्याला मिळणार आहेत.
मात्र, मोहम्मद सिराजची नेमणूक कुठे होणार याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. सध्या तो तेलंगणा पोलिसात पूर्णवेळ काम करणार नाही. क्रिकेटमधून निवृत्तीनंतर त्याला हवे असल्यास तो 2007 च्या विश्वचषक विजेत्या जोगिंदर शर्माप्रमाणे पोलिस कारकीर्द पूर्णपणे स्वीकारू शकतो.
ही बातमी वाचा: