तुम्ही भोंग्याला हात लावाल तर..., PFI संघटनेचा मनसेला इशारा
मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरुन पीएफआय या संघटनेने मनसेला इशारा देत भोंग्यांना हात लावल्यास आपण सोडणार नाही असं म्हटलं आहे.
![तुम्ही भोंग्याला हात लावाल तर..., PFI संघटनेचा मनसेला इशारा MNS Raj Thackeray Masjid loudspeaker issue mumbra PFI organization warns MNS तुम्ही भोंग्याला हात लावाल तर..., PFI संघटनेचा मनसेला इशारा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/04/15/30b665a84f6a0fa3e3ff18b84d306cca_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: मशिदींवरील भोंग्यावरुन आता महाराष्ट्राचं राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यासंबंधी 3 मे पर्यंत अल्टिमेटम दिल्यानंतर आता त्याविरोधात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय या संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. छेड़ोगे तो छोडेंगे नही असं म्हणत लाऊडस्पीकरला हात लावल्यास आम्ही शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी मनसेला दिला आहे.
ठाण्यातील मुंब्रा या ठिकाणी अनेक लोक एकत्र आले आणि त्यांनी आंदोलन केलं. त्यावेळी लाऊडस्पीकरच्या मुद्द्यावरुन त्यांनी मनसेला इशारा देत भोंग्यांना हात लावल्यास आपण सोडणार नाही असं म्हटलं आहे.
पीएफआयचं पूर्ण नाव पॉपुलर फ्रंट ऑफ इंडिया असं आहे. 17 फेब्रुवारी2007 मध्ये पीएफआय संस्थेची स्थापना झाली असून ती देशातल्या 23 राज्यांमध्ये सक्रिय आहे. राजकीय हत्या आणि लव्ह जिहाद या प्रकरणात या संघटनेचं नाव आहे. कर्नाटकातील हिजाब प्रकरण तापवण्यामागे या संघटनेचा हात असल्याचं सांगितलं जातंय.
दरम्यान, मनसेकडून या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यात आली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले आहेत की, 3 मे पर्यंत आपण शांत बसू. त्यानंतर आपण काय उत्तर द्यायचं ते देऊ. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्याचं काम हे राज्य सरकारचं असून ते त्यांनी करावं.
सदर प्रकरणानंतर पीएफआयचे नेते अब्दुल मतीन शेखानी आणि 25 ते 30 जणांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रजि. नंबर 352/2022 कलम 188 भादवि सह म. पो. कायदा कलम 37(3), 135 या कायद्यांतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशातील विविध भागातील रामनवमी मिरवणुकांवर हल्ल्यांच्या घटना घडल्या होत्या. या हल्ल्यांमागे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजे पीएफआय ही संघटनाल असल्याचा संशय केंद्र सरकारला आहे. त्यामुळेच येत्या काही दिवसात या संघटनेवर बंदी घातली जाऊ शकते असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)