Aurangabad : मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते 1 मे रोजी आमने-सामने येण्याची शक्यता
येत्या 1 मे रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं राज्यभर शांती मार्च काढण्यात येणार असल्याची माहिती पक्षाने दिली आहे.
औरंगाबाद: राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या सभेवरून राज्यातील वातावरण तापल्याचं चित्र आहे. आता 1 मे रोजीच्या या सभेवेळी मनसे आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आमनेसामने येण्याची शक्यता आहे. 1 मे रोजी वंचित बहुजन आघाडीने औरंगाबाद मध्ये 'शांती मार्च' काढण्यासाठी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवलं आहे.
वंचित बहुजन आघाडीकडून 1 मे रोजी संध्याकाळी 7 वाजता क्रांती चौक ते भडकल गेट येथील बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात येणार असल्याचा या पत्रात उल्लेख आहे. राज ठाकरे यांच्या सभेच्या ठिकाणापासून वंचित बहुजन आघाडीचा हा मोर्चा जाणार असल्याने पोलिसांसाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या 'शांती मार्च'ला परवानगी मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.
1 मे हा महाराष्ट्र दिन चांगल्या पद्धतीने साजरा होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. देशात महागाई आणि कोरोनासारखे प्रश्न असताना धार्मिक मुद्द्यावरून दंगली घडवण्याचं आणि सामाजिक वातावरण बिघडवण्याचं काम जर कुणी करत असेल तर त्याला आमचा विरोध असेल असं वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकुर यांनी सांगितलं.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. या सभेवर बंदी घालावी यासाठी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती. रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांनी ॲड. अजय टी. कानवडे यांच्या मार्फत ही याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. फक्त राजकीय भूमिकांना विरोध म्हणून ही याचिका दाखल केली आहे असं निदर्शनास येतंय असं सांगत न्यायालयाने याचिकाकर्त्याला एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.