MNS Party Workers Join BJP : एकीकडे युतीचा प्रस्ताव अन् दुसरीकडे फोडाफोडी! भाजपचा मनसेला मुंबईत मोठा धक्का; एकाचवेळी 650 पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश
Maharashtra Politics : मुंबईत एकाचवेळी मनसेचे 650 पदाधिकारी भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार व आमदार प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत भाजपात आज संध्याकाळी जाहीर प्रवेश करणार आहे.
मुंबई : महायुतीकडून (Mahayuti) मनसेला (MNS) सोबत घेण्यासाठी मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत. यासाठी भाजप (BJP) आणि शिंदेसेना आग्रही आहे. मात्र, भाजपकडून एकीकडे युतीचा प्रस्ताव दिला जात असून, दुसरीकडे मनसेत दुसरीकडे फोडाफोडी केली जात आहे. कारण मुंबईत एकाचवेळी मनसेच्या 650 पदाधिकाऱ्यांनी भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) व विधान परिषद गटनेते आमदार प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत आज संध्याकाळी जाहीर प्रवेश करत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मनसेला मुंबईत मोठा धक्का दिला आहे. मनसेच्या प्रदेश उपाध्यक्षांसह शेकडो कार्यकर्ते आज भाजपात प्रवेश करणार आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, प्रवीण दरेकर यांच्या उपस्थितीत आज हा प्रवेश सोहळा पात पडणार आहे. मनसे प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण मर्गज यांच्यासह शेकडो कार्यकर्ते मनसेला जय महाराष्ट्र करणार असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.
एकूण 650 पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतुन भाजपात प्रवेश...
मनसेमधून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रदेश उपाध्यक्ष प्रविण मर्गज, विभाग अध्यक्ष बाबूभाई पिल्ले, दोन विभागसचिव, पाच उपविभाग अध्यक्ष महिला-पुरुष, दोन उपसचिव, 11 महिला-पुरुष शाखाध्यक्ष, 80 महिलापुरुष उपशाखाध्यक्ष, 26 इतर सेलचे पदाधिकारी, गटाअध्यक्ष व राजदूत कार्यकर्ते असे एकूण 650 पदाधिकाऱ्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतुन भाजपात आशिष शेलार व प्रविण दरेकर यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश होत असल्याची माहिती भाजपकडून देण्यात आली आहे.
शिरसाटांनी घेतली राज ठाकरेंची भेट....
राज ठाकरे यांनी महायुतीत सहभागी व्हावेत यासाठी भाजप आणि शिंदेसेनेच्या नेत्यांकडून मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरु आहेत. दरम्यान, राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या घडामोडींना दोन आठवड्यांपूर्वी वेग आले होते. स्वतः राज ठाकरेंनी दिल्ली गाठत अमित शाह यांची भेट देखील घेतली होती. मात्र, पुढे या चर्चांना ब्रेक लागल्याचे पाहायला मिळाले. अशात शनिवारी शिंदे गटाचे नेते तथा आमदार संजय शिरसाट यांनी अचानक राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा देखील झाली. त्यामुळे राज ठाकरेंच्या महायुतीसोबत जाण्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या आहेत. पण, आमच्या भेटीत अशी कोणतेही राजकीय चर्चा झाली नसल्याचं शिरसाट म्हणाले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या :