(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mla Raju Patil : मनसेचं एक मत नेमकं कोणाला? कोणी गृहीत धरु नये, आमदार राजू पाटलांचं वक्तव्य
विधानपरिषदेच्या मतदानाबाबत मनसेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी सस्पेन्स निर्माण केला आहे. कोणी गृहीत धरु नये असे राजू पाटील यांनी सांगितलं.
Mla Raju Patil : राज्यसभेच्या मतदानावेळी मनसेचे एकमेव आमदार असलेले राजू पाटील (Raju Patil) खूप चर्चेत आले होते. त्यांचं मत भाजपला गेल्याची खूप चर्चा होती. मात्र, काही वेळापूर्वीच प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना विधानपरिषदेच्या मतदानाबाबत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी सस्पेन्स निर्माण केला आहे. कोणी गृहीत धरु नये असे राजू पाटील यांनी सांगितलं. मागच्या वेळेस आम्ही व्यक्ती बघून मतदान केलं होतं. राज ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही मतदान केल्याचं राजू पाटील यांनी सांगितलं.
लोकशाहीत मतदान हे पवित्र कर्तव्य आहे. एका मताचं किती महत्त्व असतं हे मागे राज्यसभेच्या निवडणुकीत पाहिलं असेल. राज साहेबांना रात्री हॉस्पिटलला भेटायला गेलो होतो. त्यांनी मला निर्देश दिल्याप्रमाणं मतदान होईल, असं यावेळी राजू पाटील यांनी स्पष्ट केलं. त्यामुळं मनसेचं मत नेमकं कोणाला याचा सस्पेन्स कायम आहे. हे एकमेव मत खूप महत्वाचे आहे. मागच्या वेळेस आम्ही व्यक्ती बघून मतदान केलं होत असे राजू पाटील म्हणाले.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरु राहणार का हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. एकूण 10 जागांसाठी सकाळी 9 वाजल्यापासून मतादानाला सुरुवात झाली आहे. 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरु होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे. तर भाजपनं या निवडणुकीतही चमत्कार करुन दाखवण्याचा विश्वास व्यक्त केलाय. या निवडणुकीतही 1996, 2010 सारखी विधान परिषदेच्या धक्कादायक निकालाची परंपरा पहायला मिळणार का याची उत्सुकता दिसून येत आहे.
मुख्य लढत भाई जगताप विरूद्ध प्रसाद लाड
विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्ये असल्याचं दिसून येतंय. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप विधानपरिषद निवडणूकीच्या रिंगणात आहेत. विधानपरिषद निवडणुकीत मुख्य लढत भाई जगताप विरूद्ध प्रसाद लाड अशी रंगणार आहे. भाई जगताप मुंबई काँग्रेस अध्यक्ष असल्यानं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकरता ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार भाई जगताप असल्यानं त्यांची मदार प्रेफरन्शिअल व्होटिंग आणि अपक्षांवर आहे. काँग्रेस आमदारांचे संख्याबळ 44 आहे. पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरेंना जिंकण्याकरता 26 मते मिळू शकतील. मात्र भाई जगतापांना जिंकण्याकरता 8 मते कमी पडत आहेत. या 8 मतांकरता काँग्रेसची जुळवाजुळव सुरु आहे. शिवसेनेकडील अतिरिक्त मते काँग्रेसकडे वळवून घेण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न सुरु आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थक असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षांची मते काँग्रेसकडे वळवण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.
महत्वाच्या बातम्या: