(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Vidhan Parishad Election : विधानपरिषदेची खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्येच, काय आहे दोन्ही पक्षांची रणनीती?
MLC Election 2022: विधानपरिषदेची खरी निवडणूक ही काँग्रेसची भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात होणार आहे.
मुंबई: विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी सोमवारी मतदान होत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता भाजपने याही निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला धक्का द्यायची रणनीती आखली आहे. दहाव्या जागेसाठी काँग्रेसचे भाई जगताप आणि भाजपचे प्रसाद लाड यांच्यात लढत होणार आहे. त्यामुळे विधानपरिषदेची खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्येच असल्याचं दिसून येत आहे.
विधानपरिषदेसाठी आज मतदान आणि निकाल
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरू रहाणार का हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. एकूण 10 जागांसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे. तर भाजपनं या निवडणुकीतही चमत्कार करून दाखवण्याचा विश्वास व्यक्त केलाय. या निवडणुकीतही 1996, 2010 सारखी विधान परिषदेच्या धक्कादायक निकालाची परंपरा पहायला मिळणार काय याची उत्सुकता दिसून येतेय.
खरी लढत रंगणार भाजप विरूद्ध कॉग्रेस
विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्ये असल्याचं दिसून येतंय. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप विधानपरिषद निवडणूकीच्या रिंगणात आहेत. विधानपरिषद निवडणुकीत मुख्य लढत भाई जगताप विरूद्ध प्रसाद लाड अशी रंगणार आहे. भाई जगताप मुंबई काँग्रेस अध्यक्ष असल्यानं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकरता ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार भाई जगताप असल्यानं त्यांची मदार प्रेफरन्शिअल व्होटिंग आणि अपक्षांवर आहे. काँग्रेस आमदारांचे संख्याबळ 44 आहे. पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरेंना जिंकण्याकरता 26 मते मिळू शकतील. मात्र भाई जगतापांना जिंकण्याकरता 8 मते कमी पडत आहेत. या 8 मतांकरता काँग्रेसची जुळवाजुळव सुरु आहे. शिवसेनेकडील अतिरिक्त मते काँग्रेसकडे वळवून घेण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न सुरू आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थक असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षांची मते काँग्रेसकडे वळवण्याचेही प्रयत्न सुरू आहेत.
संख्याबळ नसताना भाजप कशी जिंकणार निवडणूक?
भाजपच्या पक्षीय संख्याबळाचा विचार करता भाजपचे 4 उमेदवार कटाकटी निवडूण येतील. पाचव्या जागेसाठी भाजपचे एकही मत शिल्लक नसताना भाजप हा चमत्कार कसा घडवून आणणार? कॉंग्रेसच्या भाई जगताप समोर भाजपनं तुल्यबळ उमेदवार प्रसाद लाड दिला आहे. अशावेळी भाजपची सर्व भिस्त आहे ती अपक्ष आमदार आणि मविआकडून फुटणाऱ्या मतांवर. छोटे पक्ष आणि अपक्ष मिळून 29 आमदार आहे. या सर्वांनी मतदान भाजपला केले तर निवडणूक भाजपसाठी सोपी होईल. मात्र असं होणार नाही. मविआच्या संपर्कात सुद्धा यातले काही आमदार आहेत. भाजप पुन्हा तांत्रिक डावपेच खेळून ही निवडणूक जिंकण्यासाठी प्रयत्न करणार का याचं उत्तर उद्या मिळणार आहे.
दरम्यान, भाजपचे पिंपरीचे आमदार लक्ष्मण जगताप सकाळी सात वाजता मतदानासाठी अँम्ब्युलन्समधून मुंबईला रवाना होणार आहेत. भाजपच्या कसबा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक सकाळी 10.30 वाजता विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्यासाठी मुंबईला अँम्ब्युलन्स मधून रवाना होणार आहेत.