(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sanjay Raut: आमच्यात एकजूट किती ते संध्याकाळी दिसेल, संजय राऊतांकडून विजयाचा दावा
विधानपरिषदेची निवडणूक आमच्यासाठी महत्वाची आहे. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांमध्ये एकजूट असल्याचे वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं.
Sanjay Raut on Vidhan Parishad Election 2022 : आमच्या तीन पक्षांची एकजूट किती आहे ते संध्याकाळी दिसून येईल असं वक्तव्य खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी केलं. ही विधानपरिषदेची निवडणूक महत्वाची आहे. महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांमध्ये एकजूट आहे. महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष हातात हात घालून चालत असल्याचे राऊत यावेळी म्हणाले. आम्हाला धोका आहे आणि समोरच्याला धोका नाही का? असा सवालही राऊत यांनी केला. आमचं काय ठरलं आणि काय नाही ठरलं हे मी आता सांगणार नाही. लोकशाहीला मालक निर्माण झाल्याचे म्हणत राऊत यांनी भाजपला टोला लगावला.
आमदार पक्षाच्या कँम्पमध्ये असतानाही दाब दबाव धमक्यांचे निरोप सातत्यानं येत होते.पण त्याचा काहीही परिणाम होणार नाही. ही लोकशाही असल्याचे राऊत म्हणाले. लोकशाहीला काही मालक निर्माण झाले असले तरीसुद्धा महाराष्ट्रामध्ये आम्ही या सगळ्यांवरती मात करु. महाराष्ट्र आम्ही पुढे घेऊन जाऊ असेही राऊत यावेळी म्हणाले. आजची निवडणूक आमच्यासाठी महत्वाची आहे. स्वत: राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे नेते मल्लिकार्जून खर्गे, मंत्री बाळसाहेब थोरात या सर्व नेत्यांमध्ये संवाद असल्याचे राऊत यांनी सांगितले.
मतदानाला सुरुवात
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेतही धक्कादायक निकालाची परंपरा सुरु राहणार का हे काही तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. एकूण 10 जागांसाठी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरु होणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे. तर भाजपनं या निवडणुकीतही चमत्कार करुन दाखवण्याचा विश्वास व्यक्त केलाय. या निवडणुकीतही 1996, 2010 सारखी विधान परिषदेच्या धक्कादायक निकालाची परंपरा पहायला मिळणार का याची उत्सुकता दिसून येत आहे.
मुख्य लढत भाई जगताप विरूद्ध प्रसाद लाड
विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये खरी लढत ही काँग्रेस आणि भाजपमध्ये असल्याचं दिसून येतंय. काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप विधानपरिषद निवडणूकीच्या रिंगणात आहेत. विधानपरिषद निवडणुकीत मुख्य लढत भाई जगताप विरूद्ध प्रसाद लाड अशी रंगणार आहे. भाई जगताप मुंबई काँग्रेस अध्यक्ष असल्यानं महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकरता ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे. दुसऱ्या क्रमांकाचे उमेदवार भाई जगताप असल्यानं त्यांची मदार प्रेफरन्शिअल व्होटिंग आणि अपक्षांवर आहे. काँग्रेस आमदारांचे संख्याबळ 44 आहे. पहिले उमेदवार चंद्रकांत हंडोरेंना जिंकण्याकरता 26 मते मिळू शकतील. मात्र भाई जगतापांना जिंकण्याकरता 8 मते कमी पडत आहेत. या 8 मतांकरता काँग्रेसची जुळवाजुळव सुरु आहे. शिवसेनेकडील अतिरिक्त मते काँग्रेसकडे वळवून घेण्याचा काँग्रेस नेत्यांचा प्रयत्न सुरु आहे. तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेना समर्थक असलेल्या अपक्ष आणि लहान पक्षांची मते काँग्रेसकडे वळवण्याचेही प्रयत्न सुरु आहेत.